असा झाला राजेशाही समाजवादी अमृत महोत्सव

mulayam-singh1
थोर समाजवादी नेते मुलायमसिंह यादव यांनी खास लंडनवरून मागवलेल्या विंटेज बग्गीमध्ये बसून उत्तर प्रदेशाच्या रामपूर शहरामध्ये प्रचंड मोठी मिरवणूक काढली आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनतेने त्यांना अभिवादन केले. या राजेशाही थाटामुळे मुलायमसिंह यांचे गुरु म्हणवणार्‍या आचार्य नरेंद्र देव आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांचे आत्मे तळमळले असतील. काही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा पार पाडला गेला, अन्यथा नेताजी मुलायमसिंह यादव यांचा वाढदिवस लोकांना माहीत सुद्धा नव्हता.

या राजेशाही अमृत महोत्सवात ७५ फूट लांबीचा केक कापण्यात आला. मिरवणूक आणि मुख्य समारंभ यामध्ये वैभवाचे बिभत्स प्रदर्शन करण्यात आले. आझम खान आणि मुलायमसिंह यांच्या डिजिटल फलकांनी सारे रामपूर शहर व्यापून गेले होते. मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या मुख्य बग्गीच्या मागे ५० मोटार कारचा ताफा होता. ज्या मोटारींमध्ये उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातले ४० मंत्री सवार होते. ही मिरवणूक १४ कि.मी. अंतर कापत गेली.

राज्य सरकारने मिरवणूक आणि अमृत महोत्सव यासाठी १२ पोलीस कॉन्स्टेबल आणि २७ पोलीस उपअधीक्षक आणि २ पोलीस अधीक्षक असा ताफा सुरक्षेसाठी तैनात केला होता. रस्त्यातली दुकाने बंद ठेवण्यात आली होती आणि मिरवणुकीच्या मार्गांवरील उंच इमारतींवर सुद्धा पोलीस बसविण्यात आले होते. मुख्य सत्काराचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार होता त्या ठिकाणचे व्यासपीठ चार क्विंटल फुलांनी सजवले होते. हा कार्यक्रम जोहर विद्यापीठाच्या आवारात झाला.

मुख्य गावापासून १५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ पूर्ण विजेच्या दिव्यांनी सजविण्यात आले होते आणि १० हजार लोकांची बैठक व्यवस्था असणारा वॉटर प्रूफ मंडप टाकण्यात आला होता. यासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपये मंजूर केले असल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासनानेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यावर ३० लाख रुपये खर्च केला. नगर विकास खात्यानेही या कार्यक्रमावर मोठा खर्च केला.

या निमित्ताने कापण्यात आलेला ७५ फूट लांबीचा केक तयार करण्यासाठी दिल्ली, लखनौ आणि मुंबईवरून बेकरीवाल्यांना मुद्दाम पाचारण करण्यात आले होते. पाहुण्यांसाठी मेजवानी देण्यात आली. या मेजवानीची व्यवस्था करण्यासाठी दिल्ली आणि लखनौच्या आचार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. लखनौचा कबाब आणि बिर्याणी, त्याचबरोबर जेवणानंतर केशरमिश्रीत दूध अशी व्यवस्था होती. २०१७ साली होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा थाटमाट करण्यात आला होता.

Leave a Comment