अखेर घावामीला न्याय मिळाला

Ghoncheh-Ghavami
इराणमध्ये महिलांना पुरुषांचे फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे सामने पाहण्यास बंदी असतानाही ते पाहण्यास गेलेल्या आणि त्यामुळे एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेल्या घोनचेह घावामी या महिलेला अखेर न्याय मिळाला असून तिची शिक्षा रद्द झाली आहे. तिला ही शिक्षा होताच जगभरात खळबळ माजली. महिलांवर अशी बंदी कशी काय घातली जाते यावर जगभरात चर्चा सुरू झाली. मुळात घावामी ही महिला ब्रिटनमध्ये रहात होती. ती अनिवासी इराणी असल्यामुळे आपल्या मायदेशी काही दिवसांसाठी आली होती. त्यामुळे तिच्या या शिक्षेचे पडसाद ब्रिटनमध्येही उमटले. शेवटी तिची शिक्षा न्यायालयाने रद्द केली आणि तिला सोडून दिले. काही मुस्लिम देशात अजूनही किती तरी अन्यायी कायदे आहेत. अजूनही तिथल्या शासकांच्या डोेक्यात मध्ययुगीन कल्पना घट्ट बसलेल्या आहेत त्यामुळे कोणी विचारही करणार नाही असे महिलांशी दुजाभाव करणारे अनेक कायदे तिथे राबवले जातात.

इराणमध्ये महिलांना फूटबॉल आणि व्हॉलीबॉलचे सामने पाहण्यास बंदी आहे. असा कायदा जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात नाही. घावामी या महिलेने तेहरानमध्ये सुरू असलेली एक व्हॉलीबॉलची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असा तिच्यावर आरोप होता. तिथे ब्राझील विरुद्ध इराण असा व्हॉलीबॉलचा सामना होता. ब्राझील हा देश इराणपासून बराच दूर असूनही ब्राझीलच्या अनेक महिला हा सामना पहायला आल्या होत्या पण सामना इराणमध्ये असूनही त्याला उपस्थित राहण्यास इराणी महिलांना बंदी होती. त्यामुळे अनेक महिलांनी हे सामने पहायला जाण्याचा हट्टच धरला. महिला मैदानावर आलेल्या पाहताच त्यांना हाकलण्यात आले. त्या पळून गेल्या. घावामीही त्यात होती पण, नंतर तिची पर्स मैदानावरच राहिली म्हणून ती परत आली. तेव्हा तिला अटक करण्यात आले आणि तिला ही शिक्षा सुनावण्यात आली. खटला चालेपर्यंतचे दोन तीन महिने ती तुरुंगातच होती.

१९७९ साली तिथे सत्तेवर असलेल्या धार्मिक नेत्यांनी पहिल्यांदा फूटबॉलचे सामने पहायला महिलांना बंदी केली होती. इराणमध्ये फूटबॉल हा खेळ फार लोकप्रिय आहे आणि त्यामुळे लोक त्याचे सामने पहायला फार गर्दी करतात. पण ते बेहोेश होऊन चिअरिंग करतात आणि तसे करताना अचकट विचकट शिव्याही देतात. महिलांच्या उपस्थितीत अशा शिव्या देऊ नयेत हे त्यांना समजत नाही. त्यामुळे हा प्रकार रोखता येत नाही. त्यापेक्षा महिलांना असे सामने पहायला बंदी केलेली बरी असा विचार करून ही बंदी लादण्यात आली.

त्यामुळे इराणी महिलांत मोठा असंतोष आहे आणि त्या आपला विरोध नाना मार्गांनी व्यक्त करीतही असतात. पण त्यांना फूटबॉलचे सामने पाहण्यास अनुमती मिळाली नाही. उलट २०१२ साली फूटबॉलसोबत व्हॉलीबॉलचेही सामने पाहण्यास बंदी घातली गेली. त्यामुळे तर महिलांचा असंतोष आणखीनच वाढला. २०१४ च्या जूनमध्ये काही महिलांनी हा व्हॉलिबॉलचा सामना बघण्याचे धाडस केले. त्यात घावामीला पकडण्यात आले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिच्यावर रितसर खटला चालवून आता तिला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती आता माफ झाली आहे.

सौदी अरबस्तानमध्ये महिलांना कार चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक पाहता या देशाच्या कायद्यामध्ये महिलांनी कार चालवू नये असे म्हटलेले नाही. देशात राजेशाही आहे आणि किंग अब्दुल्ला इस्लामी कायदा अमलात आणल्याचा दावा करत आहेत. पण या इस्लामी कायद्यात सुद्धा महिलांनी कार चालवू नये अशा अर्थाचा कसलाही नियम नाही. परंतु राजे अब्दुल्ला यांनी आपल्या मनानेच हा नियम लागू केला आहे. तो कायदाबाह्य आहे आणि इस्लामबाह्य सुद्धा आहे. त्यामुळे एखाद्या महिलेला कार चालवताना पकडलेच तर तिला नेमकी काय शिक्षा करावी, असा प्रश्‍न पोलिसांनाही पडलेला असतो आणि धार्मिक पोलिसांनाही पडलेला असतो. त्यामुळे एखाद्या महिलेने कार चालवली तर तिला काही दंड ठोठावून सोडून दिले जाते. मात्र एखाद्या लहरी न्यायाधीशाला हा गुन्हा अधिकच गंभीर वाटला तर तो त्या महिलेला शंभर फटके मारण्याची शिक्षा देऊ शकतो.

या जुलमी कायद्याच्या विरोधात महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यांनी हळू हळू या कायद्याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. तिथल्या महिलांनी २६ ऑक्टोबर २०१३ रोजी निषेध दिन पाळला. त्यातून महिलांना प्रोत्साहन मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर महिला बिनदिक्कतपणे कार चालवून कायदेभंग करायला लागल्या. २६ ऑक्टोबर २०१४ रोजी पूर्ण देशात निषेध दिनाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याला मिळालेला प्रतिसाद बघून किंग अब्दुल्ला यांना कायदेशीर सल्ला देणार्‍या समितीने आता महिलांना कार ड्रायव्हिंग करायला अनुमती द्यावी अशी शिफारस केली आहे. काही निर्बंध लादून का होईना पण महिलांना आता ड्रायव्हिंगची अनुमती मिळण्याची शक्यता दिसायला लागली आहे.

Leave a Comment