साधूंचे आर्थिक साम्राज्य

note
हरियानातील रामपाल बाबाच्या अटकेच्या प्रकरणामध्ये देशातील साधू आणि संन्याशी यांच्या प्रभावाची चर्चा सुरू झाली. देशातल्या काही साधूंनी प्रचंड माया कमावली असल्याचे दिसून आले. रामपाल बाबा याची वाटचाल एक इंजिनिअर म्हणून झाली, परंतु त्याने पुढे नोकरी सोडून देऊन मठ स्थापन करून भरपूर पैसा कमावला. आज त्याचा हिस्सारजवळ १२ एकरावर पसरलेला मोठा बंगला असून त्याची मालमत्ता १०० कोटी रुपयांची आहे. त्याच्या या आश्रमामध्ये त्यांनी स्वत:ची खाजगी सेना सुद्धा तैनात केली होती. केवळ रामपालच नव्हे तर देशातल्या अनेक साधू-संन्याशांनी अशाच प्रकारे प्रचंड पैसा कमावलेला आहे. रामपाल बाबा याचे २५ लाख अनुयायी आहेत आणि ते उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि दिल्ली या राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

आसाराम बापू
आसाराम बापूचे नाव तर सर्वांना माहीत झालेलेच आहे. त्याच्यावर काही महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. परंतु या छळाच्या चर्चा होत असतानाच त्याच्या संपत्तीची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. प्रत्यक्षात आसाराम बापूचे देशात आणि परदेशात ४२५ आश्रम आहेत आणि ५० गुरुकुले आहेत. त्याची संपत्ती काही अब्ज रुपयात मोजता येईल एवढी आहे. त्याने दिल्लीजवळ आणि इतरत्र मिळून ७०० एकरपेक्षाही अधिक जागा बळकावलेली आहे.

स्वामी नित्यानंद
स्वामी नित्यानंद हा सर्वाधिक लोकप्रिय साधू आहे. अमेरिकेतल्या माईंड बॉडी स्पिरीट या मासिकाने स्वामी नित्यानंदाचा जगातल्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला आहे. यू ट्यूबवर त्याच्या साईटला १ लाख ४० हजार निटिजन्स्नी भेट दिलेली आहे. नित्यानंदांनी ३०० पुस्तके लिहिली आहेत आणि ती २७ भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. स्वामी नित्यानंदचे आर्थिक साम्राज्य सुद्धा प्रचंड मोठे आहे. स्वामी नित्यानंद हा काही महिलांशी असलेल्या संबंधांमुळे कुप्रसिद्धीस आला. एका चित्रपट तारकेशी शरीरसंबंध असल्याचे आरोप त्याच्यावर आले.

बाबा रामदेव
योग आणि ध्यानाचा टीव्ही वरून प्रसार करण्याच्या बाबतीत बाबा रामदेव प्रसिद्धीस आले. मात्र या बाबांचेही मोठे आर्थिक साम्राज्य आहे. वीज कनेक्शनच्या बाबतीत गैरव्यवहार आणि वीज चोरी याचे त्यांच्यावर बरेच आरोप आलेले आहेत. हरिद्वार येथे त्यांची बरीच मोठी जमीन आहे आणि औषध विक्रीतून मिळणार्‍या त्यांच्या उत्पन्नाचा बराच कर चुकवला गेलेला आहे.

स्वामी अग्निवेश
मुळात हरियानातले राहणारे असलेले स्वामी अग्निवेश हे आर्य समाजाचे आहेत. ते पूर्वी हरियाना विधानसभेवर निवडूनही आले होते. ते अण्णा हजारे यांच्या गटात सामील झाले, मात्र पुढे त्या गटात राहूनच अण्णा हजारेंच्या विरोधात कारवाया करायला लागले. त्यात त्यांचा स्वार्थी हेतू आहे असे त्यांच्यावर आरोप झाले. अण्णा हजारे यांचे आंदोलन फसावे यासाठी त्यांनी बराच आटापिटा केला. अमरनाथच्या शिवलिंगाबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दलही त्यांच्यावर टीका झाली. मात्र स्वामी अग्निवेश यांचे कसलेही आर्थिक साम्राज्य नाही.

ओशो रजनीश
गेल्या शतकातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले जगप्रसिद्ध धर्मगुरु म्हणून रजनीश यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे सारे आर्थिक साम्राज्य परदेशात पसरलेले आहे आणि बरेच अब्जाधीश त्यांचे शिष्य आहेत. त्यात काही राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेतेही आहेत. आचार्य रजनीश यांच्याकडे ९६ नव्या कोर्‍या रोल्स् राईस गाड्या होत्या आणि त्यांनी एकेवर्षी एकदम ३० अशाच गाड्या खरेदी केल्या होत्या.

चंद्रास्वामी
चंद्रास्वामी हे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे गुरू होते आणि ते बर्‍याच आर्थिक गुन्ह्यात गुंतलेले होते. परदेशी चलनाचा गैरव्यवहार केल्याबद्दल त्यांच्यावर १३ गुन्हे दाखल झाले होते आणि अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना नऊ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. लंडनमध्ये वास्तव्य करणार्‍या एका उद्योगपतीला १ लाख डॉलर्सची टोपी घातल्याबद्दल चंद्रास्वामी यांना १९९६ साली अटकही झाली होती.

जयेंद्र सरस्वती
आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या कांची कामकोटी पिठाचे ६९ वे वारस असलेले जयेंद्र सरस्वती खुनाच्या दोन खटल्यांमध्ये अडकले होते. त्यांचेही आर्थिक साम्राज्य मोठे आहे. त्यांनी ६५ किलो सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले होते.

गुरमित राम रहिम
गुरमित राम रहिम हे पंजाबमधल्या डेरा सच्चा सौदा या पिठाचे अधिकारी असून त्यांनी अनेक बाबतीत जागतिक विक्रम नोंदलेले आहेत. त्यांचेही साम्राज्य देश-विदेशात विखुरलेले आहेत.

सत्य साईबाबा
सर्वात धनवान साधू म्हणून सत्य साईबाबांचा उल्लेख करावा लागेल. १२६ देशात त्यांचे आश्रम आणि अनुयायी आहेत. २०११ साली त्यांचे निधन झाले. त्यांचे आर्थिक साम्राज्य ४० हजार कोटी रुपयांचे असल्याचे त्यांच्या निधनानंतर उघड झाले. त्यांच्या वैयक्तिक बसण्या-उठण्याच्या खोलीतून त्यांच्या निधनानंतर ११ कोटी ५० लाख रुपये, ९८ किलो सोने आणि ३०७ किलो चांदीचे अलंकार हस्तगत करण्यात आले. त्यांच्या आश्रमातली संपत्ती मोजायला ३६ तास लागले.

Leave a Comment