राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम!

raj
पुणे: आज पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षात कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही. वाढदिवसानिमित्त मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं होर्डिंग लावल्यास दुसऱ्या दिवशी त्याची पदावरून हकालपट्टी करणार असल्याचा सज्जड दम कार्यकर्त्यांना दिला.

प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांनी आंदोलन करणे, मारहाण करणे इतक्यानेच सर्व कामे होत नाहीत. चांगले संबंध प्रस्थापित करूनही कामं करून घेता येतात, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. पुढे बोलताना राज म्हणाले, केवळ मतदार यादी हातात असून उपयोग नाही, मतदारांचा डेटा आपल्याकडे असायला हवा. तसेच लोके आपल्यापासून दूर गेली नाहीत, लोकांशी तुमचा संपर्क तुटला असल्याचे जळजळीत अंजनही त्यांनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात घातले.

केवळ मत मिळवण्यासाठी जनतेकडे जाऊ नका. जनतेची मने जिंका मग मते आपोआप मिळतात. केवळ मतांच्या मागे लागू नका. एका माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून समाजाकडे पाहा असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना द्या.

आपल्यापैकी बरेच जण मला म्हणतात की, सहा महिन्यातून एकदा मला भेटत चला. मात्र मी म्हणतो की, दर महिन्याला भेटूया. प्रत्यक्ष भेटलो नाही तरी इमेलच्या माध्यमातून भेटूया. आपल्या भागात कोणते उपक्रम राबवता येतील, भागातील समस्या काय आहेत याची माहिती माझ्याकडे इमेलद्वारे द्या. मात्र केवळ पक्षातील तक्रारी नका पाठवू असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यासाठी त्यांनी [email protected] या मेल आय़डीवर माहिती पाठवण्यास सांगितले.

Leave a Comment