भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग ११

gir
गीर अभयारण्य
आशिया सिंहांचे घर म्हणून प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य गुजराथ राज्यात असून सर्व जगात ते प्रसिद्ध आहे. १९६५ साली ते अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. नामशेष होऊ घातलेले आशियाई सिंह जिवंत ठेवण्याचे व त्यांची संख्या वाढविण्याचे फारच महत्त्वाचे काम येथे केले गेले आहे.१९९० साली केवळ १५ सिंह येथे होते त्यांची संख्या आज ४११ वर गेली आहे. याशिवाय या अभयारण्यात ३८ प्रजातींचे सस्तन प्राणी पाहायला मिळतात. त्यात चित्ते, बिबटे, पट्टेरी वाघ, तरसे, अस्वले, चारशिंगा, चिंकारा, चितळ, सोनलांडगे, नीलगाई यांचा समावेश आहे.

या अभयारण्यात ३७ जातींचे सरपटणारे प्राणी आहेत. त्यात अनेक जातींच्या पाली, सुसरी, अजगरे यांचा समावेश आहे. या शिवाय येथे ३०० जातींचे पक्षीही दिसतात त्यात सहा जातींची गिधाडे आहेत. सुमारे २००० प्रकारचे किटकही येथे आढळतात. म्हणजे या जंगलातील प्राण्यांच्या प्रजातींची संख्या जाते २३७५ वर. येथे केवळ प्राणीच आहेत असे नाही तर ५०७ जातींचे विविध वृक्षही जंगलाची शोभा वाढवत आहेत.

या अभयारण्यात पर्यटकांसाठी विशेष एरिया नाही. अभयारण्यातील एका भागातच पर्यटक प्राणीदर्शन करू शकतात. मात्र बस टॅक्सीनेही या अभयारण्यात येता येते. जवळचा विमानतळ आहे राजकोट. जुनागढ येथूनही या अभयारण्यात येता येते. डिसेंबर ते मार्च या काळात पर्यटकांची संख्या प्रचंड असते मात्र मार्च ते मे या कालावधीत मोठ्या संख्येने जंगलाचे वैभव असलेला जंगलचा राजा सिंह दिसू शकतात. येथे राहण्यासाठी फॉरेस्ट विभागाची रिसॉर्टही आहेत.