भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग १२

bharatpur
भरतपूर अभयारण्य
राजस्थानातील केवलादेव या नावाने ओळखले जात असलेल्या या जंगलाचे नामकरण आता भरतपूर असे केले गेले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे अभयारण्य हजारो जातींच्या स्थलांतरीत पक्षांसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध ब्रिटीश पक्षीतज्ञ सर पीटर स्कॉट यांनी या अभयारण्याचे वर्णन जगातील सर्वात सुंदर पक्षी ठिकाण असे केले आहे. हे जंगल २५० वर्षांपासूनचे असून जंगलात असलेल्या शिवमंदिरावरून त्याला केवलादेव असे नांव पडले होते. हे शंकराचे एक नाव आहे. १० मार्च १९८२ या दिवशी त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला गेला व १९८५ साली ते जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले.

नेहमी आढळणार्‍या पक्ष्यांबरोबरच येथे बदके, ग्रेटर स्पॉटेड इगल्स ( गरूड), इस्टर्न इंपिरियल ईगल्स, आढळतात तसेच नामशेष होऊ घातलेले सायबेरियन क्रेन यांचे हे ब्रिडींग ठिकाण आहे. त्याबरोबरच पेलिगन, रेड काईट, गिधाडे, मार्बल्ड टील, बैकल टील या पक्षांचा हा स्वर्ग म्हणून ओळखला जातो. सस्तन प्राण्यांत लांडगे, तरस, नीलगाई, ठिपक्यांची हरणे आढळतात.

या जंगलाच पक्षी इतक्या प्रचंड संख्येने आहेत की १९३८ साली तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड लिडिग्लो यांनी एकाच शिकारीत ४२७३ पक्षी मारले होते अशी कथा सांगतात. अभयारण्य घोषित होण्यापूर्वी हे जंगल भरतपूर च्या महाराजांचे शिकारस्थळ म्हणून ओळखले जात होते. या पक्षीजंगलाचे मुख्य आकर्षण आहेत सारस पक्षी. अभयारण्याची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त अशी असली तरी पक्षी पाहायचे असतील तर अगदी पहाटेच म्हणजे सूर्योदयापूर्वीच येथे पाहोचायला हवे.

येथे जाण्यासाठी जवळचा विमानतळ जयपूर आणि दिल्ली आहेत. रेल्वेने भरतपूर स्टेशनला उतरता येते. हिवाळा येथील चांगला हंगाम. नोव्हेबंर ते मार्च या काळात येथे स्थलांतरीत पक्षी खूप मोठ्या संख्येने येतात.

Leave a Comment