रामपाल याच्या संबंधातील सात सत्ये

baba-rampal
हरियानातील हिस्सारच्या गुरू रामपाल बाबा याच्या नावाच्या गवगवा सुरू आहे. त्याला आता अटक झाली आहे, परंतु तो नेमका कोण आहे आणि त्याचा इतिहास काय आहे याची पुरेशी माहिती अजून लोकांना झालेली नाही. त्यामुळे त्याच्या चारित्र्यावर प्रकाश टाकणारी माहिती देणे आवश्यक वाटते.

रामपाल बाबाचा जन्म हरियानाच्या सोनेपत जिल्ह्यातील ठनाना या गावी ८ सप्टेंबर १९५१ रोजी झाला आहे. रामपाल बाबा स्वत:ला संत कबीर यांचा अवतार मानतो.

कबिराचा अवतार असला तरी त्याने अभियांत्रिकीची पदविका प्राप्त केली आहे, त्याशिवाय हरियाना राज्य सरकारच्या आरोग्य खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीही केलेली आहे. त्याची नोकरी सुरू असतानाच त्याला आपला जन्म आध्यात्मिक जागरणासाठी झाला असल्याचा साक्षात्कार झाला आणि त्याने अठरा वर्षे नोकरी करून ती सोडून दिली. मात्र त्याच्या निकटचे काही लोक सेवेतून बडतर्फ केले असल्याचे सांगतात.

रामपाल बाबाचा नोकरी सुरू असतानाच रामदेवानंद बाबा या संताशी संबंध आला आणि त्यांनी रामदेवानंद बाबाचा गुरूमंत्र घेतला. १९९९ साली त्यांनी रोहतक जिल्ह्यातील करोंटा गावी आश्रमासाठी जागा खरेदी केली. काही लोकांच्या मते ती जमीन त्यांना कमलादेवी नावाच्या महिलेने दान म्हणून दिली आहे.

रामपाल बाबाने करोंटा इथला आश्रम स्थापित झाल्यानंतर स्वत:ला संत म्हणून जाहीर केले आणि हरियानात सर्वत्र आश्रम स्थापन करण्याची टूम सुरू केली. त्यांच्या अनुयायांची संख्या वाढत गेली. ते कबिराचा अवतार असल्याची जाहिरात जाणीवपूर्वक केल्यामुळे हे घडले.

२००६ साली त्यांनी आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी बदनामीकारक उद्गार काढले. त्यामुळे चिडलेल्या आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. बाबा रामपाल यांनीही प्रतिहल्ला केला. या चकमकीमध्ये एकजण मरण पावला. तिथून रामपाल यांच्यामागे पोलीस आणि कोर्ट यांचा तगादा सुरू झाला. बाबाला अटक करण्यात आली. दोन दिवसांनी ते जामीनावर सुटले आणि त्यांनी हिस्सार येथे कायम रहायचे ठरवले.

सध्या ६३ वर्षे वय असलेल्या रामपाल बाबावर या चकमकीच्या संदर्भात सातत्याने वॉरंट निघाले. पण ते चुकवा चुकवी करत राहिले. शेवटी उच्च न्यायालयाने त्यांना अटक करण्याचा आदेश दिला आणि अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर त्यांच्या अनुयायांनी हल्ला केला. त्यातून वादग्रस्त प्रकरण उद्भवले. आता बाबा अटकेत आहेत.

या एका चकमकीशिवाय बाबावर अनेक खटले जारी आहेत. कोर्टाचा अवमान करणे, खून, खुनाचा प्रयत्न असे आरोप असून त्यांच्यावर पकड वॉरंट काढलेले आहे. मात्र यापूर्वी त्यांनी विविध खटल्यांच्या संदर्भातील समन्सचा ४२ वेळा अवमान केला म्हणून त्यांच्यावर अटकेची पाळी आली.

Leave a Comment