स्वच्छता दिनाचा संदेश

clean-india
आपल्या देशामध्ये स्वच्छतेचे महत्व लोकांना पटलेले नाही, मात्र अस्वच्छतेवर चर्चा सुद्धा करणे अस्वच्छ मानले जाते. म्हणूनच आपल्या देशातले लोक मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौच्याला बसतात याची फार कोणी शहानिशा केली नाही आणि त्यामुळे अस्वच्छता दूर झाली नाही, तिचे परिणाम आपण भोगत आहोत. आता मात्र या चर्चेला गती आली आहे आणि काल देशात टॉयलेट डे साजरा केला गेला आहे. देशात टॉयलेट हा शब्द विलक्षण लोकप्रिय झाला आहे. शब्द लोकप्रिय आहे पण टॉयलेट मात्र म्हणाव्या तेवढ्या संख्येने उपलब्ध नाहीत. हा प्रश्‍न फार गंभीर आहे याचीही जाणीव आपल्याला नाही. आपल्याला ती जाणीव नसली तरी या क्षेत्रातले तज्ञ आपल्याला या प्रश्‍नाचे गांभीर्य वांरवार आणि आपल्याला पटेल अशा शब्दात सांगत असतात. आपल्या देशात दररोज ९०० लहान मुले केवळ त्यांना खाजगी शौचालये उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पणे मरत असतात. उघड्यावर शौचाला जाणे त्यांना इतके अंगवळणी पडले आहे की, ते आपल्यासाठी एवढे घातक आहे हेही त्यांना माहीत नाही.

पण आपण या प्रश्‍नाचा सखोलपणे विचार करायला लागतो तेव्हा असे लक्षात येते की आपल्या ग्रामीण भारतातल्या अनेक प्रश्‍नांचा आणि समस्यांचा उगम या अभावात आहे. असे असूनही या प्रश्‍नाकडे देशातल्या मी मी म्हणणार्‍या नेत्यांचे लक्ष वेधले गेले नव्हते. त्यामुळे आपल्या देशात अशी काही समस्या आहे याचाच आपल्याला विसर पडला होता. त्याची आपल्याला आठवण द्यावी म्हणून सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने काल भारतात अनेक ठिकाणी टॉयलेट डे साजरा केला. दिल्लीतून एक टॉयलेट रथ निघाला असून तो तीन दिवस देशात फिरणार आहे. भारतातले ६४ टक्के लोक उघड्यावर शौचाला बसतात याचे जगातल्या अनेक देशातल्या लोकांना आश्‍चर्य वाटते. बांगला देश, पेरु आणि इथिओपिया अशा काही जगातल्या सर्वात गरीब देशांतली या बाबतची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. तिच्यातून असे कळत आहे की, या गरीब देशात टॉयलटचे प्रमाण भारतापेक्षा चांगले आहे. बांगला देशातल्या लोकांना खायला मिळत नाही पण त्या देशात ९० टक्के कुटुंबांकडे स्वत:ची शौचायले आहेत. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावणारी आहे. उघड्यावर शौचाला बसल्याने सर्वत्र घाण होते. गावात शिरताना नाकाला पदर लावूनच यावे लागते. त्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो. याच घाणीचा नीट निचरा झाला नाही तर ती गायी खातात आणि त्यांच्या दुधातून या विष्ठेतल्या रोगजंतूंचा प्रसार होतो.

ग्रामीण भागात मोकळी हवा असल्याने तिथल्या लोकांना निरोगी जीवन लाभलेले असते. शिवाय या भागातले जीवन म्हणावे तसे म्हणजे शहराइतके धावपळीचे नसते. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब असे विकारही ग्रामीण भागात कमी असतात पण या उघड्यावर शौचाला बसण्याने तिथे त्याच्याशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणावर होतात. शौचालये नसल्याने या भागातल्या महिलांची मोठी कुचंबणा होते. शौचाचा आवेग आवरावा लागल्याने त्या पोटाच्या अनेक विकारांनी त्रस्त असतात. ग्रामीण भागातल्या लोकांसाठी रोगनिदान शिबिरे आयोजित करून त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात विशेषत: पोटाचे विकार मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसते ते त्यामुळेच होय. हे सारे शौचालये नसण्याचे प्रत्यक्ष आणि आरोग्यावर होणारे परिणाम आहेत पण, त्याचे अनेक अप्रत्यक्ष आणि सामाजिक परिणामही होत असतात. ते यापेक्षाही गंभीर असतात. गावात स्वच्छता गृहे नसतात मग शाळांत ते आहेत की नाही हे कोण पाहणार आहे ? नसले तरी त्याची कोण दखल घेणार आहे ?

काही गावांत शाळांत मुलींसाठी स्वच्छता गृहे नाहीत हे माहीत आहे पण ती काही समस्या आहे असे म्हटले तर गावकरी आपल्याला वेड्यात काढतात. पण मुली मोठ्या व्हायला लागल्या आणि सहावी सातवीत आल्या की त्यांना या स्चच्छतागृहाची समस्या जाणवायला लागते. शाळेत स्वच्छतागृह नसल्याच्या कारणावरून अनेक मुली शाळेत येण्याचे बंद करतात. आपल्या समाजात आधीच तर मुलींना शिकवण्याबाबत उल्हास आहे त्यात हा स्वच्छतागृह नसण्याचा फाल्गुन मास. त्याचा परिणाम मुलींच्या शाळांतील गळतीवर होत असतो. हा स्वच्छतागृहांच्या अभावाचा समाजावर होणारा गंभीर परिणाम नाही का? मुंबईसारख्या शहरात तर महिला नोकरीनिमित्त दहा ते बारा तास घराबाहेर असतात. या काळात त्यांना म्हणाव्या तेवढ्या संख्येने स्वच्छतागृहे उपलब्ध होत नसतात. त्याचा त्यांना किती त्रास होत असेल याचा कोणी विचार करीत नाही. संकोचामुळे त्या आपली ही अडचण कोणाला सांगूही शकत नाहीत. उत्तर प्रदेशात एका खेड्यात दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाला तेव्हा या प्रश्‍नाची निकड सर्वांना जाणवली. तरुण मुलींना शौचासाठी घराबाहेर पडावे लागते. तेही रात्री पडावे लागते. त्याचवेळी त्यांना कोणाच्या तरी वासनेचे शिकार व्हावे लागते. बलात्काराच्या समस्येचा विचार करताना अनेकांनी ही बाब लक्षात आणून दिली की, घरात स्वच्छता गृहे नसल्यामुळे मुलींवर ही वेळ येते. आपल्या देशाने आजवर हा प्रश्‍न फारच दुर्लक्षित केला आहे हे आता जाणवत आहे. आपण आपल्या देशातल्या महिलांचा सन्मान राखू शकत नाही. पण आपण अंतरिक्ष संशोधनात जगात पहिल्या तीन देेेशांत क्रमांक लावला आहे. या प्रश्‍नावर प्रकाश टाकणार्‍या एका लघुपटात हा प्रश्‍न विचारला आहे. महिलांना ही प्राथमिक सोय पुरवू शकत नसतानाही आपल्याला आपल्या मंगळावरच्या स्वारीचा अभिमान वाटतो का ?

Leave a Comment