शिवसेनेची दिल्लीला धडक

shivsena
शिवसेनेने गेला महिनाभर दिल्लीच्या नावाने शिमगा केला आणि आता दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेला कोठेही जाऊन निवडणूक लढवता येते पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तिथे आपला मराठी बाणा कसा दाखवणार ? कालच एका पोर्टलवर राज आणि उद्धव ठाकरे हे इंग्रजी बोलण्याचे कसे टाळत असतात हे दाखवणारा एक लेख आला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काही राष्ट्रीय राजकारण करायचे झाले तर इंग्रजी आणि हिंदी अवगत असली पाहिजे. या दोन्ही भाषांत म्हणावी तशी पारंगतता न आल्यामुळे शरद पवार यांना राष्ट्रवादी नेता होण्याच्या ऐवजी महाराष्ट्रवादी नेता म्हणून कसा काळ काढावा लागला आणि कसलीही राष्ट्रीय महात्वाकांक्षा पूर्ण करून घेता आली नाही हे आपण पहात आहोत. आता ठाकरे हे दिल्लीच्या पत्रकार परिषदेत कोणत्या भाषेत बोलणार आहेत ? शिवसेनेने अशा रितीने अधले मधले प्रदेश सोडून मुंबईतून झेप घेऊन आपले रॉकेट दिल्लीतच लँड करायचे ठरवले आहे. खरे तर आपल्या पक्षाचा विस्तार वाढवायचा त्यांचा विचार असेल तर त्यांना हळुहळू पुढे जायला हवे.

केवळ निवडणुका लढवल्या म्हणजे पक्ष वाढत नसतो. तिथे काही तरी काम केले पाहिजे. कार्यकर्ते उभे केले पाहिजेत पण दिल्लीत शिवसेनेला औषधालाही कार्यकर्ता सापडणार नाही. तरीही त्यांनी निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे कारण त्यामागे भाजपाला खिजवण्याशिवाय कसलाही हेतू नाही. यापूर्वी शिवसेनेने असा प्रकार केला आहे आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढवल्या आहेत. पण त्याचा कसलाही परिणाम भाजपावर झाला नाही आणि आताही होणार नाही कारण शिवसेना दिल्लीत येऊन भाजपावर कसलाही परिणाम करू शकणार नाही. उलट तिथे निवडणुका लढवण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेचेच हसे होईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेेचे नेते दिल्लीपतींसमोर झुकणार नाही अशा गर्जना करीत आहेत. आता दिल्लीत गेल्यावर आपल्या या गर्जनेचा ते कसा खुलासा करणार आहेत? सारेच हास्यास्पद. पण हास्यास्पद असले तरीही सेनेला अखिल भारतीय होण्याची उबळ आली आहे. एकदा आपले प्रादेशिक पक्ष हे स्थान पक्के झाल्यावर त्याच भूमिकेत राजकारण करीत राहण्याऐवजी शिवसेनेने आता आपल्या मनाची संभ्रमावस्था प्रकट करीत महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकण्याचा मनोदय प्रकट केला आहे. खरे तर शिवसेनेने मराठी माणूस हा आपला आधार मानला आहे. हा आधार त्यांना आता महाराष्ट्राच्या बाहेर कसा मिळणार आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शिवसेना उदयास आली. महाराष्ट्र हे मराठी भाषक राज्य म्हणून अस्तित्वात आले त्यामागे मराठी माणसाला महाराष्ट्रात तरी न्याय मिळावा हा हेतू होता. त्यातल्या त्यात मुंबईत मराठी माणसाला नोकर्‍या मिळाव्यात अशी अपेक्षा होती. पण संयुक्त महाराष्ट्र होऊनही आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली असूनही मुंबईत तामिळ लोकांनाच नोकर्‍या मिळायला लागल्या. द्वैभाषिक महाराष्ट्रात आणि त्या द्वैभाषिक राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत होताच पण, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य असूनही तिथे मराठी माणसावरच अन्याय व्हायला लागला. त्यातून शिवसेनेची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आदोलनात शिवसेना असण्याचा प्रश्‍नच नव्हता कारण तेव्हा शिवसेना स्थापनच झाली नव्हती. पण नंतर नोकर्‍यांतल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना स्थापन झाली. मराठी माणसाला नोकर्‍या मिळवून देणारी संघटना असे तिचे स्वरूप होते. आणि हा प्रश्‍न मुंबई ठाण्यातच होता त्यामुळे शिवसेना याच शहरांपुरती मर्यादित राहिली. स्थापनेनंतरच्या काही वर्षात शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला. पण या पक्षाला ुमुंबई ठाण्यापलीकडे स्थान नव्हते.

त्यामुळे पक्षाचा महाराष्ट्राच्या अन्य भागांत काहीच प्रभाव नव्हता. पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी घेतला. आधी ते तामिळनाडूतून मुंबईत आलेल्या हिंदूंच्या विरोधातच होते पण पुढे त्यांनी हिंदुत्वाचा विषय हाती घेतला तेव्हा अनेक प्रश्‍न निर्माण झाले. शिवसेना हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यांचा मेळ कसा घालणार असा मुख्य प्रश्‍न पुढे आला पण शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने या प्रश्‍नाचा खुलासा केला नाही. १९७० च्या दशकात शिवसेनेने मुंबईतल्या उडुपी हॉटेलांवर हल्ले केले होते. ते उडुपी हॉटलवाले हिंदूच होते ना ? मग आता त्यांच्या विरोधात शिवसेनेची भूमिका काय हे कळलेच नाही. नंतरच्या राजकारणात शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा बुलंद केला आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर फारसे काही केलेच नाही. कधीतरी असा मराठी मुद्दा पुढे केला की. ज्यामुळे कोणताही परप्रांतीय माणूस दुखावणार नाही. पुढे पुढे असे लक्षात यायला लागले की, मराठी मराठी करीत बसण्याने कसलाही राजकीय लाभ होणार नाही कारण अशा प्रकारच्या प्रादेशिक भावनांना आता काही अर्थ राहिलेला नाही. देशात स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि कोणत्याही राज्यातले लोक कोणत्याही राज्यात जाऊन तिथे आपला व्यापार उदीम करीत आहेत. तरीही शिवसेना मराठी बाणा बाळगून आहे आणि त्यासह दिल्लीत जाण्याचे मनाचे मनोरे रचत आहे.

Leave a Comment