भरतभेट…….

combo1
महाराष्ट्रातल्या काही माध्यमांना नेहमीसाठी एक चघळायला एक विषय लागतो. राज्यातले असे काही विषय त्यांना उपलब्धही होत असतात. असाच एक विषय म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होणार का? काही निमित्त मिळाले की ही चर्चा उपस्थित करायची आणि त्यावर चार दोन नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन चर्‍हाट विणत बसायचे असा त्यांचा उद्योगच होऊन बसला आहे. आता कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. उद्धव ठाकरे तिथे अनेकांना भेटले. राज ठाकरेही आले. बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व होते आणि त्यांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसासाठी तसेच नंतर हिंदुत्वासाठी म्हणून प्रदीर्घ काळ राजकारण केले. १९९५ साली त्यांनी भाजपाच्या युतीत काही अपक्षांची मदत घेऊन सत्ता हस्तगत केली पण हा अपवाद वगळता त्यांना सत्ता प्राप्त करता आली नाही. पण तरीही बाळासाहेब हे राजकारणातले आयकॉन होते आणि त्यांना मुंबई ठाणे या भागात फार लोकप्रियता मिळालेली होती.

त्यांना श्रद्धांजली वाहण्यास शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी गर्दी केली. पण या प्रसंगी राज आणि उद्धव हे दोघे एकत्र आल्याचीच जास्त चर्चा सुरू झाली कारण हे दोघे बर्‍याच दिवसांनी एकत्र आलेले होते. त्यांच्या एकत्र येण्याने आता ते राजकारणातही एकत्र येणार का यावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला एक आधार आहे ते राज ठाकरे यांंना बाळासाहेबांच्या अंत्यविधीच्या वेळी मिळालेल्या वागणुकीचा. आता या घटनेला दोन वर्षे झाली आहेत पण बाळासाहेब गेले तेव्हा राज ठाकरे त्यांच्या अंत्ययात्रेत केवळ चार पावले चालले होते आणि अग्नी देताना ते हजर होते तरीही त्यांची दखल कोणी घेतली नव्हती. खरे तर भाऊबंदकी कितीही तीव्र असली तरीही मरणदारी आणि तोरणदारी जायला चुकू नये असे म्हणतात आपल्या संस्कृतीत ही गोष्ट पाळलीही जात असते. पण ठाकरे बंधूंची कटुता मरणदारीही कमी झाली नव्हती. आज ते जवळ आले असले तरीही ते जवळ येणे हाही मरणदारी एकत्र येण्याचाच अप्रत्यक्ष प्रकार आहे कारण ते स्मृतीदिनाला एकत्र आले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली तेव्हाही हे दोघे एकत्र आले होते. आपल्या माध्यमांना एक खोड जडली आहे. हे दोघे चुकून आणि निर्हेतुकपणे एकत्र आले तरीही लगेच राजकीय चर्चा सुरू करतात. दोघे एकत्र येणार का, मनसे बरखास्त करणार का, आता त्यांच्यात राजकीय समेट घडणार का अशा चचार्र्ंना ऊत येतो.

राजकीय नेत्यांच्या लहान सहान हालचालीही बातम्यांच्या विषय होत असतात याचे दर्शन अशा चर्चांतून घडत असते.
माध्यमांनी अशी चर्चा करण्याला काही औचित्य असते असे नाही. खरे तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांच्या एकत्र येण्याला काही महत्त्वही नाही आणि त्यांच्या एकत्र येण्याने राजकारणात कसला बदलही होणार नाही. मुळात शिवसेना ही राजकारणात दखल घ्यावी अशी शक्ती म्हणून पुढे तरी आली आहे. पण मनसेचे या राजकारणातले स्थान नगण्य आहे. राज ठाकरे यांना जवळ केल्याने उद्धव ठाकरे यांना कसलाही लाभ होणार नाही. तेव्हा ते राज ठाकरे यांना जवळ करण्यास अजीबात उत्सुक नाहीत. त्यांचा फायदा तर होणार नाहीच पण उलट डोकेदुखी मात्र होणार. तशी ती होती म्हणूनच तर बाळासाहेबांच्या हयातीतही हे दोघे वेगळे झाले होते. माध्यमांनी कितीही चर्चा केली तरीही राज ठाकरे यांनाही हे नक्की माहीत आहे की, आपले दादू आपल्याला जवळ करणार नाहीत. कारण दादूंना अ आपला स्वभाव किती अहंकारी आहे हे चांगलेच माहीत आहे. एखाद्या भावनिक क्षणी मनावर काही तरी परिणाम होऊन त्यांचा अहंकार वितळेल अशी शक्यता नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला तब्बल ६३ जागा मिळाल्या आहेत पण त्यांनी प्रचाराच्या काळात केलेल्या वल्गनांच्या तुलनेत त्या कमीच आहेत. कारण निवडणुका झाल्यावर भाजपाचे नेते आपल्या पाया पडत येतील असे त्यांना वाटत होते. तसे झाले नाही आणि जनतेने शिवसेनेचे स्थान तिला दाखवले. असे असले तरीही शिवसेनेने आपल्या या कामगिरीचे योग्य मूल्यमापन केलेले नाही. कधी ना कधी महाराष्ट्रात आपल्याला स्पष्ट बहुमत मिळेल आणि आपला राज्याभिषेक होईल असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. राज ठाकरे यांचीही मनोवस्था फार वेगळी नाही. त्यांना तर विधानसभेची केवळ एक जागा मिळाली आहे पण आपण या राजकारणात नगन्य आहोत, आपण राज्याच्या राजकारणाची चर्चाही करण्याचे औचित्य नाही ही वस्तुस्थिती त्यांना अजूनही कळलेली नाही. तेही एक दिवस मनसेचा झंझावात येईल आणि बाकी सगळे वाहून जातील या कल्पनेत आहेत. काही लोकांना असे वाटते की दोघांचाही पराभव झाला असल्याने ते आता जवळ येतील आणि हातात हात घालून लढून शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस यावेत म्हणून प्रयत्न करतील. पण ही शक्यता नाही कारण ते स्वत:ला पराभूत मानत नाहीत. त्यामुळे ते एकत्र येण्याच्या मन:स्थितीत नाहीत. तेव्हा प्रतिकूल स्थितीत ते एकत्र येण्याची वगैरे शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात काही अर्थ नाही.

Leave a Comment