बेकाबू बाबा

rampal
सध्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी लोक आपल्या आयुष्यातल्या समस्या स्वत:च्या बौद्धिक ताकदीवर सोडवू शकत नाहीत. त्यासाठी कोणा तरी बाबाच्या किंवा साधूच्या नादी लागतात आणि त्यामुळे अशा भोंदू साधूंचे समाजातले वर्चस्व वाढत राहते. एकदा लोकांमध्ये त्यांचे वजन वाढले की, राजकीय पक्षही त्यांच्यासमोर लोटांगण घालायला लागतात. हरियाणात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डेरा सच्चा बाबा या साधूने भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यामुळे भाजपाला सत्ता मिळाली. या ऋणातून उतराई व्हायचे असेल तर अशा साधूच्या दुष्कृत्याकडे सरकारचे दुर्लक्ष होणे साहजिकच ठरते. जसा हरियाणामध्ये या साधूंचा प्रभाव आहे तसाच कर्नाटकात मठांच्या मठाधिशांचा प्रभाव आहे. या प्रभावामुळे मुळातले राजकारण धार्मिक अंगाने व्हायला लागते आणि बाबा आणि साधू कायदा जुमानेनासे होतात. हरियाणाच्या सतलोक आश्रमात बुवागिरी करीत बसलेल्या रामपाल बाबा नावाच्या स्वघोषित साधूला अटक करायला गेलेल्या पोलिसांना असाच अनुभव आला. आपल्यामागे खूप लोक उभे असल्यामुळे आपल्याला कायदा लागू होत नाही या भ्रमातल्या या साधूने कायद्याला आव्हान दिले आहे.

त्याला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर बाबाच्या शिष्यांनी एवढा जोरदार हल्ला केला की, पोलिसांनाही क्षणभर माघार घ्यावी लागली. २००६ सालच्या एका खुनाच्या प्रकरणात बाबावर अटक वॉरंट होते पण हा बाबा न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नव्हता. अशा प्रकरणात बाबा आणि साधू यांना कोणी फार त्रास देत नाहीत. वॉरंट घेऊन कोर्टाचा माणूस जातो आणि बाबा त्याला परत पाठवतात. बाबा भेटले नाहीत म्हणून सांगावे असे त्याला बजावले जाते आणि त्या बदल्यात त्याला कसला तरी प्रसाद मिळतो. अशी अनेक वॉरंटे परत आल्यामुळे उच्च न्यायालयाने बाबाला अटक करून आणण्याचा आदेश काढला. तो आदेश बजावायला पोलीस गेले तेव्हा तिथे बाबाचे हजारभर अनुयायी जमले होते. त्यांनी पोलिसांवर जबरदस्त हल्ला केला. पोलिसांवर झालेला हा हल्ला अनपेक्षित होता. कारण या धार्मिक कार्य करणार्‍या बाबाच्या आश्रमात पोलीस आलेच तर त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती आणि त्यासाठी पेट्रोल बॉंबही जमा करून ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी जमवाजमव करण्यात आली होती. धार्मिक आश्रमात ही सारी सामुग्री जमा केली जाते ही बाब मोठीच चिंतेची आहे. ऍसिडने भरलेले छोटे छोटे फुगेही जमा केलेले होते. या सर्व सामग्रीनिशी आपल्याला सुरक्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा हल्ला होईल अशी पोलिसांची अपेक्षा नव्हती. शिवाय या पोलिसांवर आतून गोळीबारही करण्यात आला. ही तर हद्दच झाली.

यातली जमवा जमव करणार्‍यांची प्रवृत्ती तर काळजी वाटावी इतकी गंभीर आहेच पण आपल्या गुरुला अटक होतेय म्हणजे ती अन्यायकारकच असणार तेव्हा त्याचा प्रतिकार अशा हिंसक प्रकारे करावा असे त्याच्या शिष्याला वाटते ही बाब त्यापेक्षा अधिक काळजीची आहे. आजकाल असे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांना नादाला लावणारे गुरू फार बोकाळले आहेत. हे लोक या बाबाच्या आहारी जातात. बाबाने मुक्तीचा काही मार्ग दाखवला किंवा मोक्षाचे साधन समजावले तर या लोकांनी बाबाच्या भजनी लागायला काही हरकत नाही पण असे शिष्य त्यांच्या चमत्काराला नमस्कार करीत असतात. या रामपाल बाबांची गोष्ट काही वेगळी नाही. हा बाबा इंजिनियर आहे. इंजिनियर असूनही धर्माच्या गोष्टी बोलतो याचा भोळ्या भाबड्या लोकांवर फार प्रभाव पडत असतो. पण अशा लोकांचे प्रमाण किती असावे याला काही मर्यादा आहे की नाही ? या रामपाल बाबाला पक्ष्यांची भाषा येते असा भ्रम होता. त्यामुळे त्याच्या नादी लागायला लोकांना एक निमित्तच मिळाले. आपल्या सभोवती असलेल्या काही बाबांवर नजर टाकली तर असेच दिसते. बाबाला धर्माचे ज्ञान काय आहे आणि त्याची कुवत काय आहे याचा विचार लोक करीत नाहीत.

बडे बडे राजकीय नेतेही अशा भोंदू बाबांच्या नादी लागलेले असतात. कोणी हातातून अंगारा काढून देतो तर कोणी बगलेतून अंगठ्या काढून देतो. अशा चमत्काराच्या माध्यमातून लोकांना फशी पाडून हे ढोंगी बाबा करोडो रुपयांच्या मालमत्ता कमावतात. ऐषारामात राहतात. संतांना आणि साधूंना एवढी संपत्ती लागते कशाला असा प्रश्‍न त्यांच्या कोणत्याही शिष्याला पडत नाही. बाबा तर काय बाबाच पण शिष्यांनाही धर्म म्हणजे नेमके काय हे माहीत नसते. हरियाणात अनेक बाबा आहेत आणि त्यांच्या कच्छपी लागलेल्या अनुयायांची संख्या काही लाखांत आहे. अशा बाबांना दुखावणे म्हणजे त्यांच्या अनुयायांची सहानुभूती गमावणे पर्यायाने तेवढी मते गमावणे. त्यामुळे राजकीय पक्षही बाबांच्या काळ्या कारवायांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. हे संरक्षण एवढे असते की, या बाबांनी फासावर लटकावले जावे एवढी कृष्णकृत्ये केली तरीही त्यांना कोणी हटकत नाही. रामपाल बाबा तर खुनातला आरोपी आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्रीच त्यांचे अनुयायी आहेत. अशा बाबांचा हात मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर आशीर्वादासाठी पडत असेल तर पोलीस त्याच्या पापाचा घडा भरला तरी त्याला हात कसा लावतील ? रामपाल बाबाने तर खाजगी सेना उभी केली होती. पण पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही. एकदा सरकारने अशा बाबांच्या कारवायांची चौकशी करून त्यांचा धर्माच्या नावावर चाललेला नंगानाच संपवला पाहिजे. बाबा असो की साधू असो त्याला कायदा सामान्य माणसाप्रमाणेच लागू राहील याची जाणीव त्यांना दिली पाहिजे. भले मग त्यामुळे काही लोकांची मते गेली तरीही त्याची चिंता करता कामा नये. शेवटी मते महत्त्वाची नाहीत तर समाजातली शांतता महत्त्वाची आहे.

Leave a Comment