डोकी एकत्र येतील, पण विश्‍वासार्हतेचे काय?

combo
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एल्गार केला आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे पसरायला लागली आहेत. देशातल्या सगळ्या मोदीविरोधी पक्षांनी एकत्र यायचे ठरवले तर मोदींना शह देता येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला केवळ २९ टक्के मते मिळाली आहेत आणि एवढ्या कमी मतांच्या जोरावर मोदी देशावर राज्य करत आहेत. बाकीच्या ७१ टक्के मतांचे एकत्रिकरण केले तर मोदींचा पराभव करता येतो असे गणित ममता बॅनर्जी यांनी मांडले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६० वर्षांमध्ये असाच विचार कॉंग्रेसच्या बाबतीत मांडला जात होता. मात्र कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग केले गेले आणि त्यातले काही प्रयोग फसले. भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्यायी पक्ष उभा राहताच मात्र कॉंग्रेसचा पराभव झाला. ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच मोदीविरोधी पक्ष एकत्र आले तर मोदींना शह देता येतो आणि ते काही खोटे नाही. परंतु अशा प्रकारच्या एकत्रिकरणात जवळ येणारे राजकीय नेते विश्‍वासार्हता बाळगून नाहीत. डोकी एकत्र येऊन पर्याय निर्माण होत नाही, पर्यायाची विश्‍वासार्हताही असण्याची गरज आहे.

भारतात तिसर्‍या आघाडीची गरज आहे हे कोणी नाकारत नाही. मोदींचा विजयीरथ मात्र सुसाट सुटलेला आहे. मोदींचा हा अश्‍वमेधाचा घोडा कोणी अडवला नाही तर आपल्या राजकारणाचे नेमके काय होणार या चिंतेने देशातल्या अनेक राजकीय नेत्यांना ग्रासले आहे. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, मुलायमसिंग यादव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे अशा अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे आणि ही कोंडी फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी वगळता सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असा विचार पुढे यायला लागला आहे. गेल्या महिन्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या विरोधातले सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी चांगले यश मिळवले. त्यामुळे मोदींचा अश्‍वमेधाचा घोडा अडवता येतो असा विश्‍वास त्या लोकांच्या मनात जागा झाला आहे. अशा मोदीविरोधी एकत्रिकरणाचा एक भाग म्हणून लवकरच बिहारमधील दोन जनता दलाचे गट एकत्र येत आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (अ) आणि लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल हे दोन पक्ष एकत्रित करून नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रयोगात यश आल्यास दुसरेही काही पक्ष अशा मोदीविरोधी जमवाजमवीत सहभागी होतील अशी आशा लालूप्रसाद यादव यांना वाटत आहे.

अशा सहभागी होणार्‍या पक्षांमध्ये मुलायमसिंग यादव यांची समाजवादी पार्टी आणि देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (सेक्युलर) हे पक्ष प्रामुख्याने आहेत. हे सगळे लोक १९९० पूर्वी जनता दलातच होते. परंतु आपापल्या राज्यांमध्ये सवतासुभा उभा करून सत्ता मिळविण्याच्या लालसेपोटी हे सगळे लोक वेगळे झाले. जनता दलाचे जवळपास आठ तुकडे झाले. त्यामध्ये नवीन पटनायक, अजितसिंग, ओमप्रकाश चौताला, रामकृष्ण हेगडे, रामविलास पासवान यांचेही गट होते. १९८९ साली मात्र या सर्वांनी एकत्र येऊन सत्ता प्राप्त केली. भाजपा आणि कॉंग्रेसला वगळून एक गट स्थापन करता येतो हेही सिद्ध केले. नंतरच्या काळात १९९६ साली डावी आघाडी आणि काही प्रादेशिक पक्ष यांच्या मदतीने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली. परंतु त्यानंतरच्या काळात कॉंग्रेसला पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष जोरकसपणे पुढे आला आणि या सगळ्या जनता दलाच्या तुकड्यांचे राजकारणातले महत्व कमी झाले. आता पुन्हा एकदा भाजपाला शह देण्यासाठी हे पक्ष एकत्र येण्याचा विचार करत आहेत. कारण भाजपाला कॉंग्रेसने शह द्यायला पाहिजे आणि कॉंग्रेस पक्ष ती उमेद गमावून बसला आहे.

भाजपाला टक्कर देण्याची इच्छाशक्ती कॉंग्रेसमध्ये शिल्लक राहिली नसल्यामुळे देशाच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढण्यासाठी तिसरी आघाडी बळकट करण्याची गरज आहे. जनता दलाचे नेते त्यादृष्टीने कार्यरत झाले आहेत. भारतीय जनता पार्टीला टक्कर देण्याची ताकद एकट्या जनता दलात नाही. त्यामुळे या कामासाठी अन्य काही प्रादेशिक पक्षांनाही सोबत घ्यावे असा विचार जनता दलाच्या काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. द्रमुक, अण्णा द्रमुक, शिवसेना, तेलुगू देसम, तृणमूल कॉंग्रेस असे हे पक्ष आहेत. या सर्वांना एकत्र आणण्याची ताकद असणारा कोणी समर्थ नेता या आघाडीला मिळाला तर देशातली विरोधी पक्षाची गरज पुरी होऊ शकते. परंतु दुर्दैवाने तसा नेता आज तरी उपलब्ध नाही. ममता बॅनर्जी यांनी कालच केलेल्या एका विधानानुसार सगळे प्रादेशिक पक्ष आणि जनता दलाचे गट एकत्र आले तर भाजपाला शह देता येतो, परंतु त्यांना एकत्र आणणारा नेता उपलब्ध नाही. या सगळ्या तिसर्‍या पक्षांची एक अडचण अशी आहे की, त्यातल्या प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता पंतप्रधान होण्याचा गांभीर्याने विचार करत असतो. ममता बॅनर्जी, नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना शह देण्याच्या चाली सुद्धा खेळत होते. लालूप्रसाद तर फार पूर्वीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. जयललिता यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना स्वत:चे चित्र संसदेच्या चित्राच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केले होते. एकंदरीत देशाला तिसर्‍या आघाडीची गरज आहे, परंतु अहमन्य नेत्यांमुळे ते शक्य होत नाही.

Leave a Comment