गुलामगिरी सुरूच; पण आधुनिक पद्धतीने

protest
साधारण दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत जगभरामध्ये कमी-जास्त प्रमाणात गुलामीची प्रथा जारी होती. जनावरांना पकडून बाजारात नेऊन विकावे त्या पद्धतीने माणसांनाही पकडून, बांधून विकले जात असे. अशा गुलामांच्या खरेदी-विक्रीचे बाजार भरवले जात असत. त्यात पैसेवाले लोक शेकडो गुलामांना विकत घेत असत अणि हे गुलाम नंतर आपल्या धन्याची जन्मभर सेवा करत असत. एखादा बैल विकत घ्यावा आणि त्याला केवळ चारा-पाणी करण्याच्या बोलीवर जन्मभर राबवून घेतले जावे तसे या गुलामांना राबवून घेतले जात असे. गुलामीच्या या गुप्त रुढीला मान्यता होती आणि या रुढीमध्ये काही चूक आहे असे कोणी समजत नसे.

परंतु जग बदलत चालले तस तसे गुलामीचे उच्चाटन होत गेले आणि आता तर वर सांगितल्याप्रमाणे निर्दयपणे गुलामीची प्रथा अजिबात पाळली जात नाही. असे असले तरी अजूनही गुलामी वेगळ्या पद्धतीने चालूच आहे. आपण कोणावर तरी वर्चस्व गाजवावे आणि ज्याच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे त्याला आपण सांगू तसे वागायला लावावे ही माणसाची प्रवृत्ती असते आणि तिच्यातूनच गुलामीच्या प्रथेचा उदय झालेला असतो. जोपर्यंत माणसाची ही प्रवृत्ती जारी आहे तोपर्यंत गुलामी पूर्णपणे संपणार नाही. ती वेगळ्या पद्धतीने का होईना पण अस्तित्वात राहीलच. तशी ती राहिलेली आहे आणि आधुनिक पद्धतीने तिचा अंमल केला जात आहे.

पॅरिसमधल्या एका स्वयंसेवी संघटनेने ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्स तयार केला आहे. अजूनही मानवी जातीमध्ये गुलामीची प्रथा कशी रूढ आहे आणि ती कशी कशी राबवली जात आहे तसेच तिच्यात किती लोक भरडून निघत आहेत याचा एक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जगात अजूनही ३ कोटी ५८ लाख लोक निरनिराळ्या प्रकारच्या कामांमध्ये वेठबिगाराप्रमाणे राबवून घेतले जात आहेत. त्यांच्या गरिबीमुळे ते श्रीमंतांचे निरनिराळे चोचले पुरविण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देत आहेत. या प्रथांच्या विरोधामध्ये अनेक संघटनांनी आवाज उठवला असला तरी फारसा फरक पडलेला नाही आणि आधुनिक गुलामांची संख्या घटण्याच्या ऐवजी गेल्या काही वर्षात २० टक्क्यांनी वाढलेली आहे.

गुलामीच्या प्रथेचे उच्चाटन झाले असल्याचा कितीही दावा केला तरी ते काही खरे नाही आणि ज्या देशामध्ये अजूनही गरिबी आहे तसेच जे देश युद्धग्रस्त आहेत आणि यादवीने खिळखिळे झाले आहेत अशा देशातल्या लोकांना अजूनही गुलामीच्या प्रथेला बळी पडावे लागते. फरक एवढाच की जुन्या काळातली गुलाम ही केवळ शारीरिक कष्ट करून घेण्याच्या स्वरूपात व्यक्त होत होती आणि आताची गुलामी काही वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहे. आताच्या गुलामीत शारीरिक कष्ट तर आहेतच, पण त्यामध्ये शरीरविक्रयाचाही आंतरभाव झालेला आहे. हे सर्व्हेक्षण करणारे ऍन्ड्रू फॉरेस्ट यांनी या निरनिराळ्या पद्धतींचे वैशिष्ट्य सांगितले.

घेतलेल्या कर्जाबद्दल राबवून घेणे, लहान मुलांना कामाला लावणे या जुन्या पद्धती अजूनही अमलात आणल्या जातातच, परंतु घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात कर्ज घेणार्‍यांच्या मुलींना भोगदासी म्हणून जन्मभर राबवले जाते किंवा काही दिवस राबवून घेऊन वेश्या म्हणून विकले जाते. १६७ देशांमध्ये अशा प्रथा अजून जारी आहेत आणि अशा गुलामांकडून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादने करवून घेतली जात आहेत. गुलामांच्या हातून दरवर्षी १५० अब्ज डॉलर्स किंमतीचे उत्पादन करून घेतले जाते आणि त्याच्या बदल्यात त्यांना केवळ जगण्यापुरते अन्न दिले जाते. मासेमारीसाठी, कापूस वेचण्यासाठी, क्रीडा साहित्य तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या वेठबिगारांचा वापर केला जातो.

पश्‍चिम आफ्रिकेतील मॉरिटानिया या देशात गुलामांचे प्रमाण मोठे आहे. तिथे अरब लोकांकडून कृष्णवर्णीय मूर वंशाच्या लोकांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. तिथे अशा गुलामीच्या विरोधात कायदे आहेत. परंतु ते अमलात आणले जात नाहीत. उझबेकिस्तानमध्ये दहा लाख गुलाम असून त्यांना सरकारनेच गुलाम बनवलेले आहे. त्यात लहान मुलांची संख्या मोठी आहे. कतार आणि मध्य पूर्वेतील अन्य काही देशांमध्ये आफ्रिका आणि आशिया खंडातील लोकांना चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून आणले जाते आणि तिथे त्यांना घरकामासाठी तसेच बांधकामासाठी नगण्य वेतनावर राबवून घेतले जाते. यूरोप खंडातील देशांमध्ये मात्र अशी गुलामगिरी संपुष्टात आणली गेली आहे. जगभरातल्या पाहणीमध्ये असे आढळले आहे की, या गुलामीमध्ये ७० टक्के लोकांना वेश्या म्हणून वापरले जाते तर १९ टक्के लोकांना कामगार म्हणून राबवले जाते. भारतात अशा लोकांची संख्या १ कोटी ४२ लाख म्हणजे जगात सर्वात जास्त आहे. परंतु ही संख्या मुळात भारताची लोकसंख्याच जास्त असल्यामुळे सर्वाधिक दिसते. प्रत्यक्षात भारतीयांनी या गुलामीचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी पावले टाकली आहेत असे या अहवालात म्हटले आहे आणि भारताच्या अशा प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.

Leave a Comment