भाजप सरकार सावरण्यास सेना सरसावली

sharad
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकार कधीही कोसळेल, पुन्हा निवडणुकांना तयार रहा असा आदेशच आपल्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर त्याला सेनेचे नेते संजय राऊत यांनी परस्पर उत्तर दिले असून भाजप सरकार अस्थिर होऊ देणार नाही असे विधान केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी पक्षाच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात बोलताना अलिबाग येथे आज भाजप सरकार अस्थिर आहे व कधीही ढासळेल त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागा असा आदेश कार्यकर्त्यांना देऊन राजकीय भूकंप घडविला. भाजपला अधिक जागा मिळाल्यावर पवार यांनी भाजपने मागितला नाही तरी आम्ही पाठिबा देऊ, राज्यात अस्थिर सरकार येऊ देणार नाही असे कांही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.

पवारांच्या या वक्तव्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया येण्याअगोदरच सेनेच्या संजय राऊत यांनी परस्पर प्रतिक्रिया दिल्याने सेना भाजप दिलजमाई होत असल्याचे स्पष्ट संकेतच दिले गेल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. फडणवीस यांनीही सेनेबरोबर चर्चेची दारे अजूनही खुली असल्याचे नुकतेच सांगितले आहे तसेच सरसंघचालक मोहन भागवत उद्धव यांच्याबरोबर फोनवरून बोलल्याच्या बातम्याही आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांचे सेना भाजपला पाठिबा देईल, सरकार अस्थिर होऊ देणार नाही हे विधान विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.

Leave a Comment