शस्त्रक्रिया शिबिरे म्हणजे जीवाला धोका

bilaspur
भारतात कुटुंब नियोजनाच्या शिबिरांची ख्याती काही चांगली नाही. घाई घाईने शिबिरे आयोजित करण्याबाबत आणि त्यात कसेही करून शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट साध्य करण्यात सारी सरकारी यंत्रणा अशी काही गुंतलेली असते की तिला आपल्या उद्दिष्टपूर्तीपुढे लोकांच्या जीवाची काही पर्वाच नसते. छत्तीसगडच्या बिलासपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका अशाच घाई घाईच्या शिबिरात सहा तासात ८३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एवढ्या वेगाने शस्त्रक्रिया करून त्या संबंधित डॉक्टराला विक्रमाची नोंद करायची होती की काय हे माहीत नाही पण त्याच्या या त्वरेने १४ महिलांचा जीव गेला. अशी शिबिरे का आयोजित करावी लागतात याचा शोध घेतला पाहिजे. एखाद्या महिलेला मुले नको असली आणि तिला शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर तिला ज्या क्षणाला हा विचार सुचला असेल त्या क्षणाला एखाद्या सुसज्ज हॉस्पिटमध्ये जाऊन व्यवस्थित शस्त्रक्रिया करून घेता आली पाहिजे. पण तसे हा होत नाही. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया या शिबिरांच्या गर्दीतच घेतल्या जातात. ज्यांच्यावर अशा शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी असतेे पण ते लोक जनतेत मिसळत नाहीत. आणि आपले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करीत नाहीत. मग वर्षातल्या कोणत्या तरी काळात त्यांना जाग येते. ते मग आपल्या हाताखालच्या लोकांना केसेस आणण्याचा आदेश देतात आणि त्यांचे सहकारी बायकांना पकडून आणतात.

मग अशा अनेक शस्त्रक्रिया एका दिवसात किंवा दोन दिवसांत करून आपले उद्दिष्ट पूर्ण केले जाते. या शस्त्रक़्रिया किमान प्राथमिक आरोग्य केन्द्राशी समकक्ष सोयी असलेल्या दवाखान्यातच झाल्या पाहिजेत असा नियम आहे. पण बिलासपूरच्या या शस्त्रक्रिया शिबिरात म्हणजे तंबू ठोकून तिथेच केल्या गेल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या एक निर्णयात एका डॉक्टरने एका दिवसात किती शस्त्रक्रिया केल्या पाहिजेत यावर काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार एका डॉक्टराने एका दिवसांत फारतर दोन शस्त्रक्रिया कराव्यात असे ठरले आहे पण या ठिकाणी सहा तासात ८३ म्हणजे तासाला १४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी १४ महिला शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंती होऊन मरण पावल्या. या प्रकाराची चौकशी करण्यात आली तेव्हा या शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरने आपल्यावरचा आरोप फेटाळून लावला. या महिलांच्या मृत्यूला आपण जबाबदार नाही असा दावा त्याने केला. या शस्त्रक्रियांसाठी वापरली जाणारी शस्त्रे निर्जंतुक करण्यात आली नव्हती असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.

हाही आरोप त्याने नाकारला. या मृत्यूला तिथे वापरले गेलेले औषध कारणीभूत आहे असा त्यांचा दावा आहे. पण हे सांगताना त्याने नकळतपणे एक सत्य सांगून टाकले. ऐेकल्यावर कुणीही हादरल्याशिवाय राहणार नाही. या डॉक्टरने सांगितले, ‘मी आजवर माझ्या २५ वर्षांच्या सेवेत ५० हजारावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजवर माझ्या चुकीने एकही रुग्ण दगावलेला नाही.’ या हैवान डॉक्टरने एवढ्या शस्त्रक्रिया केल्या असूनही एकही रुग्ण मेला नसेल तर ते त्या रुग्णांचे नशीबच म्हटले पाहिजे. पण नियमांना सोडून हा डॉक्टर एवढ्या शस्त्रक्रिया करीत असेल आणि ो रुग्णांच्या जीवाशी असा भयानक खेळ खेळत असेल तर त्याच्या हातून अजून एकही रुग्ण मेला नसला तरीही त्याला ताबडतोब अटक व्हायला हवी. कारण त्यांने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासून चक्क त्याला अनुमती असलेल्या वेगापेक्षा १०० पट जादा काम केले आहे. अशा घिसाडघाईच्या शस्त्रक्रिया करताना शस्त्रे नीट निर्जंतुक केलेली नसतात. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. या ठिकाणी अशा शस्त्रक्रियांच्या बाबतीत शिबिरेच का घ्यावी लागतात हा तर प्रश्‍न आहेच पण कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया बायकांच्याच का कराव्या लागतात हाही मूलभूत प्रश्‍न आहे. शस्त्रक्रिया म्हणजे काही तरी असे काम आहे की ज्यामुळे ज्याच्यावर शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच्यात काही तरी दोष निर्माण होतो आणि तसा तो होतच असेल तर तो बाईत झालेला बरा. पुरुषाला कशाला कमीपणा आणायचा असा विचार केला जातो आणि ती करायचीच तर बाईची केलेली बरी असे मानले जाते.

या प्रवृत्तीमुळे भारतात शस्त्रक्रिया शिबिरात मरणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे. भारतात दरसाल १८० महिला मरण पावतात. २००९ ते २००१३ या पाच वर्षांत ९०० पेक्षाही अधिक महिला अशा मरण पावल्या आहेत. हे प्रमाण वर्षाला १८० आणि दर महिन्याला १५ असे पडते. म्हणजे आपल्या देशात दर दोन दिवसाला एक महिला शस्त्रक्रिया शिबिरातल्या हलगर्जीपणामुळे मरतात. याची सरकारला काही काळजी नाही. सरकारचा आपला घिसाडघाईने शस्त्रक्रिया करण्याचा प्रघात काही मोडला जात नाही. या शिबिरांत डॉक्टरांना फार कमी मोबदला दिला जातो आणि हेही एक या हलगर्जीपणाचे कारण आहे. अशा शिबिरांत मरणार्‍या महिलांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. छत्तीसगड सारख्या घटना घडल्यावर तरी सरकारने जागे व्हायला पाहिजे.

Leave a Comment