पेट्रोलच्या अर्थकारणाला कलाटणी

petrol
पेट्रोेल म्हणजेच खनिज तेल मानवतेच्या जीवनात महत्त्वाचे आहे याचा साक्षात्कार दुसर्‍या महायुद्धानंतर झाला. हे तेल मागासलेल्या अरबस्तानात सापडले होते आणि त्याचा वापर सुधारलेल्या यूरोप अमेरिकेत होत होते. म्हणून या सुधारलेल्या देशांनी आशिया खंडातल्या तेल उत्पादक राष्ट्रांना राजकारणात असे काही अडकवून टाकले आहे की, त्यांच्या तेलाच्या किंमती अमेरिकेतच ठरतात. पण तेलाचे हे राजकारण एक वर्तुळात फिरत होते. तेल उत्पादक राष्ट्रांनी तेल महाग करून पैसा मिळवावा आणि अमेरिकेने त्यांचे नाक दाबून तेलाच्या किंमती ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करावा असे नेहमी होत होते. डॉलरचा किंमत, तसेच काही कारणाने होणारे कमी उत्पादन आणि सोन्याची किंमत यांचाही परिणाम या तेलाच्या दरावर होत असे. शिवाय जागतिक तेजी आणि मंदी यामुळेही तेलाच्या किंमतीत दहा पाच टक्के कमी जास्त होत होते पण आता हे दर तीन महिन्यांत ३० टक्क्यांनी घसरले आहेत. कारण आता तेलाच्या व्यापारात नवे घटक समाविष्ट झाले असून त्यामुळे तेलाशी संबंधित राजकारणाला आणि अर्थकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे.

गेल्या जूनपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले आहेत. मनमोहनसिंग यांच्या सरकारने पेट्रोलचे दर सतत वाढवून आपल्याला त्रस्त केले होते पण आता तर मोदी सरकारने गेल्या चार महिन्यांत सहा वेळा पेट्रोलचे दर कमी केले आहेत. अर्थात हा काही मोदी सरकारच्या कार्यकुशलतेचा परिणाम नाही. तो जागतिक बाजारात होत असलेल्या काही बदलांचा परिणाम आहे. हे बदल म्हणजे तेलाच्या भावात वेगाने झालेली घसरण. ही घसरण किती नाट्यमय आहे हे काही आकडे पाहिल्यावर लक्षात येते. चार वर्षापूर्वी जगातच तेलाच्या दरात तेजी आली होती. त्यावेळी तेलाचा दर १५० डॉलर्स प्रति बॅरल असा झाला होता आणि तो २०० डॉलर्स प्रति बॅरल होईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. तो २०० डॉलर्स असा झाला तर जगाच्या आणि विविध देशांच्या अर्थकारणावर काय काय आणि किती किती गंभीर परिणाम होतील याचेही अंदाज व्यक्त केले जात होते पण काही कारणांनी हा दर तेवढा वाढला नाही. उलट हा दर कमी झाला. तीन वर्षे हा दर १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास टिकून राहिला. त्यानंतर म्हणजे २०१२ साली हा दर ११० डॉलर्स असा झाला आणि तो त्या वर्षात टिकला. २०१३ साली हा दर ११५ डॉलर्स प्रति बॅरल असा झाला आणि तो टिकला. पण २०१४ साल या दरांसाठी नाट्यमय ठरले. कारण हा दर घसरत गेला.

जूनपर्यंत हा दर ११० डॉलर्स असा कमी झाला. ऑगष्टमध्ये तो १०२, सप्टंेंबरमध्ये ९८ डॉलर्स तर आता तो ८० डॉलर्स प्रति बॅरल झाला आहे. म्हणजे आपण आता २०१३ सालच्या दराच्या ६० टक्के एवढ्या दराने खनिज तेल विकत घेत आहोत. आपल्या देशाच्या अर्थकारणावर पेट्रोलच्या दराचा किती परिणाम होत असतो हे आपणास माहीत आहेच. तेव्हा पेट्रोलचे दर एवढे कमी झाल्याने आपल्याला महागाईच्या पातळीवर थोडा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलचे दर एवढे का घसरले ? आजवर पेट्रोल हे पश्‍चिम आशियातल्या राजकारणाचा केन्द्रबिेंदू होते. त्यावर रशिया आणि अमेरिका यांचे जागतिक राजकारण चालत असे पण आता रशिया आणि अमेरिका हेही दोन देश पेट्रोलचे उत्पादक म्हणून बाजारात उतरले आहेत. त्यामुळे आता केवळ प. आशियाच नाही तर पूर्ण जगाचेच राजकारण तेलावर ठरायला लागले आहे. जगात तयार होणार्‍या तेलाचा २३ टक्के एवढा वापर एकटी अमेरिका करीत असते. तेेलाचे तीन मोठे ग्राहक आणि आयातक देश आहेत. त्यात अमेरिकेच्या खालोखाल चीन आणि भारत यांचा समावेश आहे. जागतिक उत्पादनापैकी ८ टक्के तेल चीन तर तीन टक्के तेल एकटा भारत देश वापरत असतो.

तेव्हा जगातले एक तृतियांश तेल या तीन महाशक्तींकडून वापरले जाते आणि त्यांच्या वापराचा, मागणीचा, त्यांच्या उत्पादनाचा आणि एकूणच त्यांच्या अर्थकारणाचा जगातल्या तेलाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत असतो. आता तो तसाच दिसत आहे. चीनच्या अर्थकारणात थोडी मरगळ आली आहे. विकास दर १० टक्क्यांवरून सात टक्क्यांवर खाली घसरला आहे. त्यामुळे चीनकडून होणारी मागणी घटली आहे. अमेरिकेत लोक तेलाचा वापर कमी करीत आहेत आणि त्याचा परिणाम अरबस्तानातून अमेरिकेत होणार्‍या मागणीवर झाला आहे. मागणी कमी झाल्याने दर घसरले आहेत. पण या घसरणीत आणखी एक घटक आहे. तो म्हणजे अमेरिकेचे तेल उत्पादन. आपण अमेरिकेला तेलाचा केवळ ग्राहक आणि आयातक मानतो पण अमेरिकेतही स्वत:साठी तेल तयार करण्याची प्रचंड क्षमता आहे. शेल ऑईल या प्रकारचे तेल तयार करण्याची ही क्षमता अमेरिकेने आजवर वापरली नव्हती. ती आता अमेरिकेने वापरली आहे. त्यातून अमेरिकेने सौदी अरबस्तान वगळता अन्य तेल निर्यात करणारे देश जेवढे तेल तयार करतात तेवढे तेल एकट्याने यंदा तयार केले आहे. अशाच रितीने ब्राझीलही या प्रकारे शेल ऑईलच्या क्षेत्रात उतरणार आहे.

अमेरिकेची ही तेल उत्पादन करण्याची क्षमता रशियाचा नक्षा उतरवण्यासाठी वापरली आहे कारण गेल्या काही वर्षात रशियाही तेल उत्पादक देश म्हणून जगाच्या बाजारात उतरला आहे. साम्यवादी अर्थकारणाने डबघाईस आलेल्या रशियाच्या अर्थकारणाला तेलाने झळाळी दिली आहे. १९९० पासून रशियाचे वट्ट राष्ट्रीय उत्पन्न दुपटीने वाढले आहे. ताकद वाढलेला रशिया जगाच्या राजकारणात अमेरिकेच्या डोळ्याला डोळा भिडवायला लागला आहे. तेव्हा रशियाच्या ताकदीवर घाव घातल्याशिवाय रशिया गप्प बसणार नाही म्हणून अमेरिकेने जगाच्या बाजारातले तेलाचे दर घसरावेत अशी चाल खेळायला सुरूवात केली आहे. अमेरिकेने स्वत:च तेल तयार करायला सुरूवात केल्याने जगाच्या बाजारातले दर ढासळले आहेत.

Leave a Comment