सहाव्या डावात आनंदचा पराभव

anand
सोची (रशिया)- शनिवारी आव्हानवीर विश्वनाथन आनंदला सहाव्या डावात मिडलगेम आणि एंडगेमला केलेल्या घोडचुकांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबरच सहाव्या डावाअखेरीस १२ डावांच्या जगज्जेतेपदाच्या लढतील अर्धा टप्पा संपला. या महत्त्वपूर्ण टप्यावर जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. कार्लसनचे आता साडेतीन गुण असून आनंदचे अडीच गुणच आहेत. २६व्या चालीला कार्लसनने केलेल्या एकमेव घोडचुकीचा फायदा आनंदने उठवला असता, तर अनपेक्षित आघाडी घेऊन त्याला लढतीवरही पकड घेता आली असती.

काळ्या मोह-यांनिशी खेळताना आनंदला सहाव्या डावात भक्कम बचाव करत किमान बरोबरी राखण्याचे आव्हान होते. कारण त्याच्याकडे सातव्या डावातही सोमवारी काळ्या मोह-याच आहेत. मात्र सुरुवातीपासून वेळेचे गणित जुळवण्यात येत असलेले अपयश, कार्लसनच्या मिडलगेमला झालेल्या एका चुकीच्या चालीचा आनंद फायदा घेऊ शकला नाही. २६व्या चालीला कार्लसनने (केडी२) राजाला पुढे करण्याच्या चालीच्या घोडचुकीचा आनंदला फायदा घेता आला नाही. इतकेच नाही तर त्याने त्याची २६वी चालही (ए४) प्यादे पुढे सरकवत चुकीची केली. येथेच डावाचे चित्र स्पष्ट झाले. आता या दोन चुकांनंतर डाव बराच वेळ सुरू राहतो की काय असे चित्र होते. मात्र ३३व्या चालीत (बीएक्सजी६) सारख्या उंटाला पुढे नेण्याच्या कार्लसनच्या चाली प्रभावी ठरल्या. त्याला आनंदने थोडेफार उत्तर दिले असले तरी वेळेचे गणित पुन्हा डोके वर काढत होते. त्यातच ३७व्या चालीला उंटाला चुकीच्या दिशेने हलवण्याची केलेली चूक त्याला पराभव मान्य करायला लावून गेली. कार्लसनने ३८व्या चालीत हत्तीद्वारे आनंदच्या राजाला ‘चेक’ दिला. तेथेच आनंदने पराभव मान्य केला.

Leave a Comment