जग गाजविणारे तीन भारतीय सीईओ

larry-page
फॉर्च्युन या मासिकाने जगातल्या नामवंत कंपन्यांच्या काही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्स् मासिकात अशा याद्या येत असतात, पण त्या याद्यांचे संदर्भ वेगळे असतात. जगातील प्रभावी व्यक्ती, प्रभावी महिला असे निकष त्यांना लावलेले असतात. पण फॉर्च्युन मासिकाने प्रसिद्ध केलेली ही सीईओंची यादी, फुल स्पिड अहेड या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली आहे. म्हणजे या यादीतले सीईओ आपल्या कंपन्यांना वेगाने पुढे नेत आहेत आणि अशा ५० जणांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यातला पहिल्या क्रमांकाचा सीईओ लॅरी पेज हा गुगलचा सीईओ आहे. मात्र या ५० जणांच्या यादीमध्ये तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुळात भारतीय असलेल्या तिघा सीईओंचा समावेश झालेला आहे. त्या तिघांचा भारतीयांना अभिमानच वाटेल यात काही शंका नाही.

लॅरी पेज हा जगातला सर्वात धाडसी सीईओ आहे. त्याने इंटरनेटचे जाळे उभे केले आहे आणि ते भरपूर नफ्यात चालवलेले आहे. हे करताना त्याने संदेश दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती आणलेली आहे. एवढेच नव्हे तर त्याने या माध्यमातून ई-कॉमर्सला बढावा देऊन अनेक वस्तूंच्या आणि सेवांच्या व्यापारात क्रांती घडवली आहे. या यादीमध्ये अजय बांगा, सत्य नडेला आणि दिनेश पालीवाल या तिघांच्या नावांचा समावेश झालेला आहे. अजय बांगा हे मास्टर कार्डचे सीईओ आहेत आणि या यादीत त्यांचा २८ वा क्रमांक आहे.

सत्य नडेला हे बिल गेटस्च्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ असून यादीत ३८ व्या क्रमांकावर आहेत. दिनेश पालीवाल हे हर्मन इंटरनॅशनलचे चेअरमन कम् सीईओ असून ते या यादीत ४२ व्या क्रमांकावर आहेत. या प्रत्येकाच्या नावाचा समावेश करताना फॉर्च्युन मासिकाने त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे आणि त्यांचा समावेश या यादीत का केला आहे याची योग्य कारणमीमांसा केली आहे. अजय बांगा हे योग्य जागी बसलेली योग्य व्यक्ती असल्याचे मासिकाने म्हटले आहे. त्यांच्या मास्टर कार्ड कंपनीमुळे मोबाईल फोनवरून पैशाची देवाणघेवाण सोपी झाली आहे आणि बांगा यांच्या कारकिर्दीतच मास्टर कार्डचा चीन आणि भारतासह अनेक आशियाई देशात प्रसार झाला आहे.

सत्य नडेला यांनी स्टीव्ह बाल्मेर यांच्या हातून मायक्रोसॉफ्टची सूत्रे हाती घेतली आहेत आणि कंपनीचे आपदमस्तक परिवर्तन घडवले आहे. पालीवाल हे हर्मन इंटरनॅशनलचे सीईओ म्हणून २००७ पासून कार्यरत आहेत. क्लॅरी-फाय या तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या बाबतीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. या यादीमध्ये ऍपलचे सीईओ टिम कूक, वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब आयगर, अलीबाबा फौंडरचे जॅक मा, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, ऍमॅझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांच्याही नावांचा समावेश आहे.

Leave a Comment