मलमपट्टी नको, कायम इलाज करा

vidhansabha
महाराष्ट्रातले नवे सरकार आता मराठवाड्याच्या दुष्काळाला तोंेड देणार आहे. या सरकारकडून बर्‍याच अपेक्षा आहेत पण, दुष्काळाबाबत हे सरकार काही वेगळे काम करील की नाही याबाबत शंका आहेे. नाही तर आजवर सत्तेवर आलेल्या सरकारांनी दुष्काळावर वरवरचे इलाज केले आहेत. दुष्काळ हे संकट आहे पण त्याचे मूळ कारण वेगळेच आहे. शेतीतल्या तंत्रांविषयी अज्ञान, अनास्था, नकारात्मक दृष्टीकोन आणि सरकारची या समस्येच्या मुळाशी जाण्याबाबतची उदासीनता ही दुष्काळामागची खरी कारणे आहेत. आता मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या समोर मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळाचे सर्वात मोठे आव्हान उभे आहे. गेल्या काही दशकात सत्तेवर आलेल्या प्रत्येकच सरकारलाही या प्रश्‍नाने सतावले आहे. मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी अडचणीत आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये शेतकरी काही फार सुखी आहे असे नाही. त्याला काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या दोन फटक्यातून जे वाचले त्यांना गारपिटीने ग्रासले आहे. या सर्वातून जे बचावले त्यांना सोयाबिनवर पडलेल्या अळीने त्रस्त केले आहे. परंतु याही सर्व संकटातून ज्यांच्या शेतातले पीक हातात पडले त्यांना लुटायला व्यापारी तयारच आहेत.

एकंदरीत शेतकरी चारही बाजूंनी संकटात आहे. दुष्काळ, लहरी हवामान आणि लुटारू व्यवस्था यामुळे शेतकर्‍यांचा शेती व्यवसाय करण्यातला रस कमी होत चालला आहे. या शेतकर्‍यांनी शेती सोडून देऊन मुंबई-पुण्यासारखी शहरे गाठायला सुरुवात केली तर या शहरांची अवस्था काय होईल, याचा विचारही न केलेला बरा. किंबहुना सध्या या शहरांची नागरी व्यवस्था कोलमडून पडेल एवढे मनुष्यबळ खेड्यातून शहराकडे वळलेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा प्रश्‍न हा केवळ शेतकर्‍यांचा प्रश्‍न राहिलेला नाही तर तो नागरी व्यवस्थांचा सुद्धा प्रश्‍न झाला आहे. शेती व्यवसायाच्या बाबतीत आपण गेल्या साठ वर्षांमध्ये एक मोठी चूक करत आलो आहोत, ती मोठी चूक म्हणजे दुष्काळ पडल्या‘नंतर’ उपाययोजना करणे. दुष्काळ पडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी दुष्काळ पडूच नये असे प्रतिबंधात्मक उपाय का योजले जात नाहीत, हा एक प्रश्‍नच आहे. मी मुख्यमंत्री असे पर्यंत निसर्गाने कितीही फटके दिले तरी या राज्यात दुष्काळ पडू देणार नाही असा मनाचा निर्धार करणारा युगप्रवर्तक मुख्यमंत्री या राज्याला हवा आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची वारंवार पडणार्‍या दुष्काळाच्या संकटातून सुटका होणार नाही. दुष्काळ पडल्यानंतर उपाय योजण्याऐवजी दुष्काळ हा शब्द आपल्या आयुष्यातून क ायमचा नाहीसा करण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची गरज आहे. ती येत्या काही वर्षातली जोरदार सामाजिक चळचळच ्रझाली पाहिजे. आपल्या देशामध्ये सातत्याने इस्रायलचे उदाहरण सांगितले जाते. इस्रायला हा वाळवंटातला देश आहे आणि तिथे केवळ सात इंच पाऊस पडतो. भारतात मात्र सरासरी ५० इंच पाऊस पडतो. मग महाराष्ट्रात दुष्काळ का ? दुष्काळचे कायमचे निवारण केले पाहिजे पण ते करताना पाऊस किती पडतो याला महत्व नाही. प्रश्‍न पावसाचा नाही तर पावसाच्या नियोजनाचा आहे. शेतीचा प्रश्‍न मोठा गुंतागुंतीचा आहे, परंतु त्या प्रश्‍नातली बरीच गुंतागुंत आपणच निर्माण केलेली आहे. त्यामुळे या दुष्काळाला निसर्गाइतकेच किंबहुना निसर्गापेक्षाही अधिक आपण जबाबदार आहोत. आपली मानसिकता ही दुष्काळी झालेली आहे. तिच्यात बदल करण्यासाठी आधी तर दुष्काळाचे कायमचे निवारण होेऊ शकते असा विश्‍वास राज्यकर्त्यांपासून शेतकर्‍यांपर्यंत सर्वांच्याच मनात जागा होण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळाच्या अशा निवारणासाठी केवळ शासन प्रयत्न करत असते आणि ते शासनाचेच काम आहे अशी शेतकर्‍यांची समजूत झाली आहे. ती समजूत आधी दूर केली पाहिजे.

जोपर्यंत शेतकरी कंबर कसत नाहीत आणि दुष्काळाशी झुंजण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत दुष्काळाचे कायमचे निवारण हे स्वप्नच राहणार आहे. तेव्हा सरकारची मदत न घेता आपण काही करू शकतो का? असा विचार शेतकर्‍यांनी केला पाहिजे. महाराष्ट्राच्या बर्‍याच खेड्यांमध्ये या दिशेने प्रयत्नही झालेले आहेत आणि त्या प्रयत्नातून दुष्काळ निवारणाचे चांगले मॉडेल विकसित झाले आहे. शिरपूर पॅटर्न हा शब्द त्यादृष्टीने अतीशय महत्वाचा आहे. त्याचे अनुकरण शेतकर्‍यांनी केले पाहिजे. जिथे शक्य असेल तिथे सरकारच्या मदतीने आणि शक्य नसेल तर सामूहिक प्रयत्नातून शिरपूर पॅटर्नचे बंधारे गावागावात उभारले पाहिजेत आणि गावच्या ओढ्याचे पाणी अडवले गेले पाहिजे. या गोष्टी जिथे घडल्या आहेत तिथे आधी शेतकर्‍यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी दुष्काळाला आपल्या मनातून काढून टाकले, त्यामुळे त्यांना ते शक्य झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या दिशेने विचार करायला सुरुवातही केली आहे. परंतु त्यांच्या लक्षात आले आहे की, या कामासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. मात्र पैसा लागणार आहे आणि तो उपलब्ध होणार नाही असे म्हणून गप्प बसून चालणार नाही. युक्ती करायची झाली तर अनेक प्रकारे पैसा उभा करता येतो.

Leave a Comment