विश्वनाथन आनंदचा मॅग्नस कार्लसनवर थरारक विजय

anand
सोची – जगज्जेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या विद्यमान जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर भारताचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने ३४ चालींमध्ये थरारक विजय मिळवला. आनंदच्या या विजयामुळे ही लढत तिस-या डावा अखेरीस १.५-१.५ अशी बरोबरीत आली आहे. चौथा डाव आज खेळवला जाईल. पांढ-या मोह-यांशी खेळताना आनंदने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि आत्मविश्वासाने खेळ केला. त्याच्या एकाहून एक सरस चालींपुढे कार्लसन हतबल ठरला.

पहिल्या डावाप्रमाणेच याही डावात आनंदने वजिरासमोरील प्यादे सरकवून डावाची सुरुवात केली. रविवारी झालेल्या पराभवाचा कोणताही परिणाम आनंदने आपल्या खेळावर होऊ दिला नाही आणि तो आत्मविश्वासाने चाली खेळू लागला. मॅग्नस कार्लसनने क्वीन्स गँबिट डिक्लाइन्ड प्रकाराने आनंदला प्रत्युत्तर दिले. या व्हेरिएशनमध्ये सहसा शांत खेळ होतो आणि कार्लसन पुन्हा एकदा आनंदला दीर्घ डावामध्ये खेचू इच्छित होता. परंतु आनंदने झटपट चाली खेळत आपली तयारी दाखवून दिली. सातव्याच चालीला त्याने केलेली सी-५ ही खेळी आनंदचे आक्रमक इरादे दाखवून गेली. जिंकू किंवा मरू या जिद्दीने आनंद खेळला.

Leave a Comment