मराठी संस्कृतीची खूण

panchanf
१९९८ साली भारतीय शास्त्रज्ञांनी पोखरणच्या वाळवंटात पाच अणुचाचण्या घेतल्या. जगात कोठेही अशी महत्त्वाची घटना घडत असली की ती अमेरिकेच्या उपग्रहांना समजल्याशिवाय रहात नाही कारण पृथ्वीवरची कोणतीही घटना नांेंदवण्याची क्षमता असलेले उपग्रह त्यांनी अवकाशात सोडले आहेत. मग भारतीयांनी या उपग्रहांना हुलकावणी देऊन हे स्फोट कसे घडवले असा प्रश्‍न अनेकांना पडला. या स्फोटांचे काम डॉ. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. परदेशातल्या काही पत्रकारांनी डॉ. कलाम यांना हा प्रश्‍न विचारला. तेव्हा डॉ. कलाम यांनी, आपण अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी पंचांगाचा वापर केला, असे उत्तर दिले. पंचांग हे काहीतरी पुरातन संस्कृतीचे साधन आहे असे आपल्याला वाटते पण पंचांगात आकाशातल्या तार्‍यांच्या स्थानांचे चित्र उमटलेले असते. ते ज्ञान भारतीयांना अनेक शतकांपासून माहीत आहे. त्यामुळेच अनेक आधुनिक शास्त्रज्ञांना पंचांगकत्याच्या ज्ञानाचे आणि माहितीचे आश्‍चर्य वाटत असते.

महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षांपासून दाते पंचांग प्रसिद्ध होत आहे. ते याबाबत मान्यता प्राप्त आहे. १९१६ साली ते प्रथम निघाले आणि १९४६ ते १९९५ अशी पन्नास वर्षेे ते काम धुंडिराजशास्त्री दाते यांनी काढले. त्यांचे ग्रहस्थानांचे ज्ञान फार सखोल होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान झाल्यानंतर १९५४ साली राष्ट्रीय पंचांग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पंचांग समिती नेमली. तिच्यावर धुंडिराजशास्त्री यांची निवड झाली होती आणि ते तहहयात या समितीवर होते. गुढी पाडवा आला आणि नवे वर्ष सुरू झाले की बहुसंख्य मराठी घरांत दाते पंचांग आणले जाते. ते दाते पंचांग आता आपल्या सवयीचा भाग झाले आहे. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरीही तो आपल्या आयुष्यातली महत्त्वाची कामे चांगल्या मुहूर्तावर करीत असतो. तशी त्याची सवय आहे. जग कितीही पुढे गेले आणि विज्ञानाने आपले बाहू पसरले असले तरी मराठी माणसाची मुहूर्त पाहून काम करण्याची सवय काही कमी झालेली नाही. तो मुहूर्त पाहतो आणि त्यासाठी आपल्या घरात दाते पंचांग ठेवतो. मराठी माणसाने महाराष्ट्रात वास्तव्य असो की परदेशात स्थलांतर करणे असो आपल्या सोबत ज्या मराठी संस्कृतीच्या खुणा ठेवल्या आहेत. त्यात दाते पंचांग हमखास आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यातही मराठी माणसाच्या घरात प्रवेश केला की, त्याच्या समोरच्या भिंतीवर दाते पंचांग लटकवलेले दिसतेच. या दाते पंचांगाने आता परदेशात गेलेल्या मराठी माणसा सोबतही प्रवास केला आहे. असे हे जगप्रसिद्ध दाते पंचांग आता शतक पुरे करून दुसर्‍या शतकात प्रवेशत आहे.

१९१६ साली सोलापूरच्या लक्ष्मण गोपाळ दाते यांनी पहिले पंचांग प्रसिद्ध केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात काही पंचांगे होती. पण त्यांच्यात मनभिन्नता होती. लोकमान्य टिळकांनी, आकाशातले तारे तर तेच आहेत मग त्यांचा नकाशा मांडताना प्रत्येक पंचांगकर्त्याचे गणित वेगळे का येते ?’ असा सवाल केला. त्यांंच्या या उद्गारापासून प्रेरणा घेऊन लक्ष्मणराव दाते यांनी आकाशातल्या तार्‍यांचा नेमकाआणि जास्तीतजास्त अचुक नकाशा चितारणारे पंचांग तयार करण्याचा निश्‍चय केला. त्यातून हे दाते पंचांग जन्मास आले. लक्ष्मणशास्त्री हे गणितज्ञ होते पण त्या काळात गणिते करायला संगणक उपलब्ध नव्हते. तरीही लक्ष्मणशास्त्री दाते यांनी हे काम केले आणि बिनचूक पंचांग तयार केले. हे पंचांग विकायला ते सायकलवर गावोगाव फिरत असत. सुरूवातीला हे पंचांग घ्यायला कोणी तयार होत नसे पण हळुहळू त्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागले आणि पंचांगाची विक्री व्हायला लागली. आता हे पंचांग जगभरात विकले जाते. धुंडीराजशास्त्री दाते यांनी खर्‍या अर्थाने हे पंचांग जगप्रसिद्ध केले कारण तेे केवळ पंचांगकर्ते गणिती नव्हते तर धर्मशास्त्राचे भाष्यकार होते. त्यांना आधुनिक कालगणनेच्या शास्त्राचेही अद्ययावत ज्ञान होते.

या घराण्यातली चौथी पिढी आता हे काम करीत आहे पण प्रत्येक पिढीने आपल्या काळानुसार या पंचांगात बदल केले आहेत. धुंडिराजशास्त्री यांनी केलेला एक बदल फारच नेमका ठरला. त्यांनी पंचांगात इंग्रजी तारखाही द्यायला सुरूवात केली. दिवाळीत लक्ष्मी पूजन किती वाजता करायचे, गणपती किती वाजता बसवायचा, गौरी आगमन कधी आणि घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर या सगळ्या गोष्टी देणारे हे एकमेव पंचांग आहे. मोहन दाते आणि विनय दाते या पुढच्या पिढीने पंचांगाची दिनदर्शिका तयार केली. खिशात बसेल असे छोटे पंचांग तयार केले. हे पंचांग हिंदी, कन्नड याही भाषांत काढायला सुरूवात केली. पंचांगाची वेबसाईट तयार केली. आता त्यांचे चिरंजीव ओंकार हे आय.टी. इंजिनियर आहेत. मोहन दाते यांनी पंचांग लोकांच्या खिशात आणले. पण आता आता लोक खिशात मोबाईल फोन ठेवत असतात. म्हणून त्यांचे चिरंजीव ओंकार दाते यांनी या पंचांगाला लोकांच्या खिशातल्या मोबाईल फोन मध्ये घातले आहे. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक चांगल्या वाईट प्रसंगात आपल्याला या पंचांगाचा संदर्भ घ्यावा लागतो. आपल्या जीवनाचे ते अंगच झाले आहे. त्याला आता १०० वर्षे पूर्ण झाली असून गेल्या आठवड्यात शंभरावे दाते पंचांग म्हणजेच सोलापूरच्या दाते पंचांगकर्त्याचे शंभरावे पंचांग प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment