नरेंद्र मोदी यांचे बिहारवर लक्ष

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना बिहार आणि उत्तर प्रदेश यांना अधिक महत्व दिलेले आहे. कारण २०१७ साली बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि ती जिंकणे भाजपासाठी आवश्यक आहे. बिहारची निवडणूक जिंकणे हे पूर्णपणे जातीय समीकरणांवर अवलंबून आहे. त्यामुळे बिहारमधले तीन मंत्री मंत्रिमंडळात घेताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जातींचा आवर्जून विचार केलेला आहे.

मंत्रिमंडळात घेतलेले बिहारचे एक मंत्री म्हणजे गिरीराज सिंह. ते नावदा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. ते भूमीहार समाजाचे आहेत. या समाजाचे बिहारच्या राजकारणावर जबरदस्त वर्चस्व आहे. बिहारमध्ये जनता दल (यू) आणि भाजपा यांच्या युतीचे सरकार सत्तेवर असतानाच्या काळात गिरीराज सिंह हे पशू संवर्धन मंत्री होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांना विरोध करायला सुरुवात केली तेव्हा गिरीराज सिंह यांनी नितीशकुमार यांना न घाबरता मोदींचा पुरस्कार केला.

बिहारमधून घेतलेले दुसरे मंत्री म्हणजे रामकृपाल यादव. ते लालूप्रसाद यादव यांचा उजवा हात म्हणून ओळखले जात होते. ते यादव समाजाचे असले तरी समाजाच्या सर्व वर्गांमध्ये त्यांना मान दिला जातो आणि त्यांचा शब्द मानला जातो. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी पाटलीपुत्र मतदारसंघातून राजदची उमेदवारी मागितली होती. परंतु लालूप्रसाद यादव यांनी आपल्या या निष्ठावंत सहकार्‍याचा हा अर्ज नामंजूर केला आणि पाटलीपुत्र मधून आपली कन्या मीसा भारती हिला उभे केले. त्यावर चिडलेल्या रामकृपाल यादव यांनी पक्ष सोडला. ते भाजपात आले. त्यांना भाजपाने पाटलीपुत्रची उमेदवारी दिली आणि ते लालूप्रसाद यादव यांच्या कन्येचा पराभव करून निवडून आले. बिहारमधल्या यादव समाजाला भाजपाकडे आकृष्ट करण्यासाठी रामकृपाल यादव यांचा उपयोग होऊ शकतो म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.

बिहारच्या राजकारणामध्ये राजपूत समाजाचा प्रभाव आहे. या समाजाचे राजीव प्रताप रुडी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रामकृपाल यादव यांनी लालूप्रसाद यादव यांच्या मुलीचा पराभव केला, परंतु राजीव प्रताप रुडी यांनी लालूप्रसादांच्या पत्नी राबडीदेवी यांचा सारन मतदारसंघात पराभव केला. रुडी हे व्यवसायाने पायलट असून राजकारणात येण्यापूर्वी ते एअरबस ए-३२० हे विमान चालवत असत. ते इंडिगो एअरलाईन्समध्ये नोकरीला होते. अगदी तरुण वयात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते हजरजबाबी आहेत. त्यामुळे दूरचित्रवाणीवरच्या विविध चर्चांमध्ये ते भाजपाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होत असतात. ते शिक्षणाने वकील आहेत. मगध विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. मुळात ते जनता दलाचे कार्यकर्ते होते आणि १९९० साली तरैय्या मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते.

त्यांनी १९९५ च्या सुमारास भाजपात प्रवेश केला आणि २००४ आणि २००९ या दोन लोकसभा निवडणुकांत त्यांनी लालूप्रसाद यादव यांना छापरा मतदारसंघात आव्हान दिले. ते दोन्ही वेळा पराभूत झाले. २०१४ साली ते छापरा मतदारसंघातूनच निर्माण झालेल्या सारंग मतदारसंघात उभे राहिले आणि राबडीदेवी यांचा पराभव करून निवडून आले. १९९८ ते २००४ या काळात केंद्रात सत्तेवर असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते दोन वर्षे व्यापार आणि उद्योग मंत्री होते. नंतर २००३ ते २००४ असे वर्षभर ते हवाई वाहतूक मंत्रीही होते.

Leave a Comment