हाती धुपाटणे आले

shivsena
शिवसेनेची अवस्था ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले‘, अशी झाली आहे. त्यांनी स्वाभीमानाने विरोधी बाकांवर बसण्याचा आव आणला आहे पण केन्द्रीय मंत्रिमंडळातले त्यांचे मंत्री अनंत गीते मंत्रिपदाला चिकटून बसले आहेत. धड स्वाभीमानही नाही आणि धड सत्ताही नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. इधर ना उधर बिचमे अधर. त्यांना स्वाभीमान राखून सत्ता प्राप्त करता आली नाही आणि आता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर त्यांनी विधानसभेची निवडणूक भाजपाच्या विरोधात लढवली होती. त्यांनी प्रचार सभांत सर्वाधिक कडाडून टीका भाजपावरच केली होती. त्यामुळे त्यांनी सत्तेचा किंवा भाजपाशी पुन्हा युती करण्याचा विचारही करायला नको होता. मात्र निवडणुका झाल्यावर त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि सत्तेत जाता येते का हे पहावे असे त्यांना वाटायला लागले. ताक तरी मागायचे आहे पण त्यासाठी सोबत आणलेले भांडेही दिसता कामा नये असा पवित्रा घेऊन त्यांनी भाजपाशी एकदा तुटलेली युती जोडण्याचा पवित्रा घेतला पण तोही सरळ घेतला नाही. युती व्हावी पण ती आपल्या अटींवर झाली आहे असे चित्र निर्माण व्हावे आणि आपण भाजपावर उपकार करण्यासाठी युतीत जात आहोत असे सांगता यावे अशी चाल ते खेळायला लागले.

शिवसेना आणि भाजपाची युती तर होत नाही हे तर कळत आहे पण त्यासाठी अमित शहा आणि मोदी हेेच कारणीभूत आहेत असे भासवून शिवसेनेने शहाजोगपणा सुरू केला. तसे काही करायचेच होते आणि सत्तेची समीकरणे काहीही असोत विरोधी बाकांवरच बसायचे होते तर त्यांनी सुरूवातीलाच तसे जाहीर करायला हवे होते. पण उद्धव ठाकरे यांचा खाक्याच सारा निराळा आहे. जागावाटपावरून युती मोडायची आणि नंतर आपल्याला जागांची काही चिंता नव्हती असे म्हणायचे, सत्तेसाठी गळ तर टाकायचा पण आपल्याला मंत्रिपदांची हाव नाही असे म्हणून शिष्टपणा करायचा असा त्यांचा बाणा आहे. त्यांनी केन्द्रीय मंत्रिमंडळात आपले नवे मंत्री समाविष्ट तर केलेेच नाहीत पण मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीलाही हजेरी लावली नाही. राज्यातले समीकरण पक्के झाल्याशिवाय केन्द्रात आमचा नवा मंत्री जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली. उद्धव ठाकरे असे काही तरी बोलत असतात आणि त्या बोलण्याशी पूर्णपणे विसंगत वर्तन त्याचवेळी करीत असतात. राज्यातले समीकरण नीट होत नाही म्हणून केन्द्रातही रहायचे नाही या त्यांच्या बाण्यातही अशीच विसंगती आहे. त्यांचा हा बाणा खरा नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातले समीकरण स्पष्ट झाले होते. शिवसेना आणि भाजपा यांच्यात आता काही संबंध नाहीत, हे दोन पक्ष निराळे आहेत, २५ वर्षांच्या वाटचालीनंतर त्यांच्या वाटा आता भिन्न झाल्या आहेत हे काही अस्पष्ट राहिलेले नव्हते. दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या मग राज्यातले समीकरण मोडले असताना त्यांनी केन्द्रात आपला एक मंत्री तरी कशाला ठेवला होता ? राज्यात युती नाही तर केन्द्रातही आपला काही संबंध नाही असे म्हणून त्यांनी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना तत्काळ राजीनामा द्यायला सांगायला हवे होते. उद्धव ठाकरे सत्तेसाठी हपापलेले नाहीत तर अनंत गीते यांचा राजीनामा चार ऑक्टोबरलाच यायला हवा होता. पण राज्यातली समीकरणे बिघडली होती. ठाकरे आणि त्यांचे सहकारी केन्द्रातल्या मोदी सरकारवर टीका करीत होत. ज्या सरकारमध्ये शिवसेनेचा एक मंत्री होता. आताही ठाकरे मोठ्यामोठ्या गप्पा मारत आहेत पण अनंत गीते यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही. काही तरी आपण सन्मान राखून राज्यातल्या फडणवीस सरकारमध्ये जात आहोत असे चित्र निर्माण झाले तर ते अजूनही सरकारमध्ये जायला तयार आहेत. त्यांची मंत्रिपदांवर आणि सत्तेवर आशाळभूत नजर आहे पण त्यांचा कथित सन्मान आडवा येत आहे.

आताही आपण भाजपाला खडसावून सरकारमध्ये जात आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी शिवसेनेने भाजपाला, राष्ट्रवादीशी तुमचा संबंध काय हे स्पष्ट करा असा सवाल टाकला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर दिल्यास आपण सरकारमध्ये जाण्यास तयार आहोत असे त्यांचे म्हणणे आहेे. भाजपाचा आता राष्ट्रवादीशी काय संबंध आहे हे काही ठाकरे यांना कळत नाही का? पण ते तसा प्रश्‍न करीत आहेत याचा अर्थ त्यांना निरर्थक प्रश्‍न विचारून कसला तरी भास निर्माण करायचा आहे आणि नजर मात्र पदांवर ठेवायची आहे. आता ते विरोधी बाकांवर बसले असले तरीही ते बसणे अजून निश्‍चयाचे नाही. अजूनही गीते यांनी राजीनामा दिलेला नाही. ते भाजपाला एका मागे एक निर्वाणीचे इशारे देत आहेत. आतापर्यंत त्यांनी असे तीन इशारे दिले आहेत पण त्यातल्या एकाही इशार्‍याची मुदत स्वत:च पाळलेली नाही. असे इशारे देताना त्यांनी, शनिवारपर्यंत उत्तर द्या, दोन दिवसांत कळवा, तीन दिवसांत न कळवल्यास आम्ही पाठींबा देणार नाही असे म्हटले पण या इशार्‍याची मुदत संपली तरीही केन्द्रातला मंत्री काढला नाही. त्यामुळे आपण हास्यास्पद ठरत आहोत याची त्यांना जाणीव नाही.