भारताचा विकास दर काय राहील ?

narendra-modi
भारतात मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली तेव्हापासून विकास दर हा शब्द उच्चारला जायला लागला कारण तोपर्यंतच्या काळात भारताची अर्थव्यवस्था साडे तीन टक्क्याने वाढत होती. हा विकास दर पुरेसा नव्हता कारण विकास दर साडेतीन टक्के होता आणि लोकसंख्या त्यापेक्षा वेगाने वाढत होती. म्हणजे या विकास दराने देशाचे दारिद्रय वाढत होते. साडे तीन टक्के विकास दराला भारतातले अर्थतज्ज्ञ हिंदू ग्रोथ रेट असे म्हणत असत. मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली तेव्हाचे अर्थमंत्री डॉ. मनमोेहनसिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था दहा टक्क्यांनी वाढवण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यासमोर हे उद्दिष्ट आहे आणि आता हा वेग निदान आठ टक्के तरी असेल अशी खात्री त्यांनी दिली होती. पण त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात फार कमी वेळा हे उद्दिष्ट गाठले गेले. दहा टक्के तर आपले कायमच स्वप्न राहिले.

मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात तर त्यांना आपली अर्थव्यवस्था सहा टक्क्यांच्या पुढे वाढवता आली नाही. त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटी शेवटी तर त्यांनी त्या पुराण्या साडे तीन टक्के वाढीच्या अर्थव्यवस्थेलाच शरण जायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांना आपली अर्थव्यवस्था सहा टक्क्यांच्या पुढे कधी वाढवता आली नाही. आता नरेन्द्र मोदी हे परदेशी गुंतवणुकीला चालना देणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी काही धोरणे आखायलाही सुरूवात केली आहे. त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन दहा टक्के विकास दर गाठता येईल का असा प्रश्‍न विचारला जायला लागला आहे. सुदैवाने आपले काही अर्थतज्ञ आशावादी आहेत. दीपक पारेख यांनी मोदी दहा टक्के विकास दर गाठण्यात यशस्वी होतील अशी आशा व्यक्त केली आहे.

आपल्या अर्थव्यवस्थेत सध्या सुरू असलेल्या हालचाली आणि काही सूचकांक पाहता दहा टक्के दर शक्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भारताची अर्थव्यवस्था कधी नव्हे एवढ्या चांगल्या स्थितीत आहे असे ते म्हणाले. पण असे असले तरी लगेच येत्या सहामाहीत किंवा तिमाहीत हे स्वप्न सत्यात येईल असे काही सांगता येत नाही असे ते म्हणाले. आपल्या आठवणीत तरी एवढी अनुकूल वेळ आणि अर्थव्यवस्थेची सुस्थिती आपण पाहिलेली नाही असे त्यांनी नमूद केले.

अर्थव्यवस्थेत तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे केन्द्रातले स्थिर सरकार. आपल्या देशात आज गेल्या तीस वर्षातले सर्वात स्थिर सरकार आहे. १९९० पासून सारी सरकारे अस्थिर आणि लहान लहान पक्षांच्या पाठींब्यावर अवलंबून होती. पण आता केन्द्रात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहेे. सतत वाढत असलेला शेअर बाजार हे एक चांगले लक्षण आहे. शेअर बाजाराचा सूचकांक एवढा वाढल्याचे अलीकडच्या इतिहासात तरी दिसले नव्हते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खनिज तेलांच्या सतत घसरणार्‍या किंमती. गेल्या काही वर्षात या तेलांच्या किंमती सतत वाढत होत्या. ती किंमत घसरणे हा अपवाद असायचा पण गेल्या चार महिन्यांत या किंमती सतत घसरत आहेत.

अशी सारी स्थिती अनुकूल असली तरीही सरकारने अनेक कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय हा दहा टक्क्यांचा टप्पा गाठता येणार नाही. न्यायव्यवस्था, सरकारी यंत्रणा आणि कायदे यांच्यात काही बदल करणे गरजेचे आहे. मोदी सरकारने त्याही दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे असे पारेख म्हणाले. आता येत्या तिमाहीत मात्र साडे पाच ते सहा टक्के विकास दर दिसेल असे त्यांनी नमूद केले. जगभरातले अर्थतज्ञ येत्या वर्षाभरात भारत पुढे जाईल असे निदान करीत आहेत. या बाबतीत ब्रिक देशात म्हणजे ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि आफ्रिका यांच्यात भारत आघाडीवर आहे असे ते म्हणाले. येत्या काही महिन्यांत भारतात ३७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

Leave a Comment