एका सायकलयात्रीचे मनोगत

cycle
बंगळूरचा एक सायकलयात्री सोबत पाच जणांना घेऊन भारताच्या सायकलयात्रेवर निघाला. आधी त्याने एकट्यानेच हा प्रवास करायचे ठरवले होते पण आपल्या या निर्धाराची माहिती त्याने सोशल मीडियावर टाकली आणि त्याला चार मित्र मिळाले. त्यांनी बंगळूर ते नवी दिल्ली असा दोन हजार ४०० किलो मीटर्सचा प्रवास केला. या यात्रेची कल्पना आणि पुढाकार सिद्धार्थ दहारिया याची होती. ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांना आरामात जगता आले असते पण आपल्या समाजातल्या विसंगती आणि विषमता यांनी अस्वस्थ झालेल्या दहारिया यांनी ही विषमता आपल्या डोळ्यांना पहायचे ठरवले. त्यांचा प्रवास सहा राज्यांतून झाला. पण या सहा राज्यांतून त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासाचा ८० टक्के हिस्सा कापला. त्यांना काय आढळले ? त्यांनी आपल्या समाजातल्या काही कमतरता आढळल्याच पण अजूनही आपल्या देशात चांगुलपणा शिल्लक आहे हेही दिसून आले. त्यांना या प्रवासात एकही वाईट माणूस भेटला नाही. कोणी त्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे काढले नाहीत आणि कोणीही त्यांना चुकीची माहिती देऊन फशी पाडले नाही. त्यांना जे अनुभव आले ते चांगलेच आले. आपल्या दाराशी आलेल्या अतिथीला आपल्या एका भाकरीतली अर्धी भाकरी देेऊन त्याची भूक भागवून त्याचे आदरातिथ्य करण्याची मानसिकता अजूनही या देशात शिल्लक आहे हे त्यांना अनुभवायला आले.

ते ज्या गावाला गेले त्या गावात त्यांना आधी अनोळखी असल्याने कोणी वाईट वागणूक तर दिली नाहीच पण आपण देशभरात सायकलवरून फिरत आहोत हे कळले तेव्हा त्यांना आनंद झाला. अनेकांनी चहा पिल्याशिवाय पुढे जायचे नाही असा आग्रह धरला. आपल्यापासून दूर असलेल्या भागातून पण आपल्या देशातूनच हे पाहुणे आले आहेत असे कळताच त्यांनी अधिकच अगत्याने वागवले. अगदी खेड्यांतूनही असाच अनुभव आला. हे सायकल यात्री आपल्या गावातून भारत देश पहात जात होते. त्यांना देशातल्या जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. त्यांच्या लक्षात आले की आपल्या देशातल्या दोन समस्या फार गंभीर आहेत. एक आहे ती आरोग्याची आणि दुसरी आहे ती शिक्षणाची. या दोन समस्या सोडवल्या तर समाजातल्या बहुसंख्य लोकांना सौख्य लाभेल असे त्यांना आपल्या प्रवासात आढळले. आरोग्याच्या अनेक समस्या उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीतून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांना शौचालय बांधून घेण्याचा आग्रह केला. दक्षिण भारतात या मुद्याला अधिक प्रतिसाद मिळाला.

ओरिसातल्या मुलांत त्यांना शिक्षणाची उर्मी जास्त प्रकर्षाने आढळली. चांगले शिक्षण घेेतल्याशिवाय आपला उत्कर्ष नाही ही जाणीव त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसली. दौर्‍यावर गेलेले तरुण चांगल्या घरातले होते. त्यांना शिक्षणाची संधी मिळाली होती. शौचालय हा काही त्यांचा प्रश्‍न नव्हता. पण हीच मुले आपल्या प्रवासात सामान्य स्थितीत जीवन जगण्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या घरात रहायला लागली तेव्हा त्यांना या लोकांचे जीवन किती बिकट आहे याचा अनुभव आला. आपण नशीब घेऊन जन्माला आलो पण भारताच्या खेड्यापाड्यांत गरिबीत कसेबसे जीवन गुजारणारे हे लोक नशीब घेऊन जन्माला आलेले नाहीत. त्यांना आपल्या साामान्य आणि हलाखीच्या जगण्यात परिवर्तन करायचे असेल तर किती तरी अडथळे पार करावे लागतात. अडथळे पूर्णपणे समाजावर अवलंबून असतात. अशा अडथळ्यांना तोंड देतानाही त्यांना आपल्या मनातली सकारात्मक भावना जिवंत ठेवावी लागते ती जिवंत ठेवणे हे किती कठीण आहे याचा अनुभव या मुलांंना आला. या समाजासाठी आपणही काही तरी केले पाहिजे हे खरे पण ते देणे फार अवघड नाही हेही त्यांना समजले. एखादा कोट्याधीश समाजासाठी लाखो रुपये देतो पण त्यात नवल नाही आणि त्याचा फार फायदाही नाही. त्या ऐवजी पायात घालायला चप्पल नसल्यामुळे अनवाणी पायांनी शाळेत जाणार्‍या एखाद्या मुलाला चप्पल घेऊन देणे हे काम जास्त उपयुक्त आहे असे त्यांच्या लक्षात आले.