शिवसेनेचा फायदा कशात ?

shivsena
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे भाजपाच्या संबंधाबाबत जे काही राजकारण चालले आहे ते आपल्या राजकीय हिताचा विचार करून चालले आहे का याचा विचार केला असता त्यांनी आता चुकीच्या दिशेने पावले टाकली आहेत असे लक्षात येते. त्यांनी भाजपाशी संबंध तोडले आहेत. सध्याचे देशभरातले राजकारण विचारात घेतले तर आज कोणीही म्हणेल की, जो कोणी आज मोदींशी जमवून घेईल तो आपले हित साधू शकेल. शरद पवार यांना ही गोष्ट समजली पण उद्धव ठाकरे यांना समजली नाही. भाजपाशी फारकत घेतली पण त्याला पर्याय काय आहे? देशात पर्यायी अशी राजकीय शक्ती उभी आहे का की भाजपाला सोडून त्या शक्तीशी युती करता येईल? तशी काही शक्ती दिसत नाही. ज्यांनी आजवर मोदींना शिव्या दिल्या तेही आज राजकीय लाभाच्या दृष्टीने भाजपाशी जमवून घेत आहेत पण शिवसेना नेते आहेत ते संबंध बिघडावेत म्हणून रोज सामनातून त्यांना डिवचत आहेत आणि तरीही भाजपाने आपल्याला सन्मानाची वागणूक दिली नाही म्हणून त्यांच्याशी पंगा घेऊन उलट त्यांच्यापासून दूर जात आहेत. यात कसले राजकीय शहाणपण आहे हे काही कळत नाही. शिवसेना नेते भाजपाकडून सन्मानाची वागणूक अपेक्षित आहेत. भाजपाने आपल्याला सन्मानाने वागवावे असा आग्रह धरत आहेत. सन्मान असा मागून मिळत नसतो. तो आपल्या वागण्यातून मिळवावा लागतो.

शिवसेनेचे नेते त्यांना सन्मान द्यावा असे वागत नव्हते. आपल्याला सन्मान दिला जावा अशी मागणी करतानाच रोज भाजपाच्या सन्मानावर तडाखे मारत होते. गेल्या काही दिवसात असा एकही दिवस गेलेला नाही की ज्या दिवशी सामनातून भाजपाच्या विरोधात विष ओकलेले नाही. भाजपाला आपली गरज नसताना आपण त्यांच्याकडून सन्मानाची वागणूक अपेक्षित करतोय आणि त्यांचा सन्मान मात्र रोज पायदळी तुडवतोय तरीही भाजपाने त्यांना शब्दानेही दुखावले नाही. या उपरही शिवसेना आज भाजपालाच शिव्याशाप देत भाजपापासून वेगळी होत आहे. काय म्हणावे या कर्माला? सारा उद्धव ठाकरे यांच्या अपरिपक्वपणाचा परिणाम आहे. त्यांनी स्वाभीमानाचे एवढे एकतर्फी अवडंबर माजवले की, त्यामुळे आपल्या हातातून सत्तेची संधी सुटतेय याचेही भान राहिले नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांनी हीच भूमिका कायम ठेवली. ज्या पक्षाकडे स्वबळावर १२३ जागा जिंकण्याची ताकद आहे त्या पक्षाला ठाकरेंनी मोठे उपकार केल्यागत ११० जागा देऊ केल्या. त्यांचा अपमानच करायचा या हेेतूने त्यांनी भाजपाच्या केन्द्रीय नेत्यांना भेटायला आणि त्यांच्याशी वाटाघाटी करायला आदित्य ठाकरे यांना पाठवले.

एवढा अपमान करूनही भाजपाने शिवसेनेला मानाची वागणूक दिली पाहिजे असा ठाकरे यांचा आग्रह होता. एकदा तुटलेली युती पुन्हा व्हायला हवी असेल तर आता तरी भाजपाच्या नेत्यांशी गोड बोलले पाहिजे हेही त्यांना कळले नाही. एवढे होऊनही भाजपाच्या कोणाही नेत्याने शिवसेनेवर कसलाही आरोप केला नाही. युती मोडताना असेच झाले होते. युती मोडताना आपली जी चूक झाली तीच आपण पुन्हा एकदा करीत आहोत. हे त्यांना कळले नाही. आता तर भाजपाला आपल्या पाठींब्याची गरज नाही हे लक्षात आले असूनही तेच भाजपावर डाफरत राहिले. हा सारा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर प्रश्‍नचिन्ह उभे करणारा आहे. आता त्यांनी याच कुवतीवर विरोधी पक्षात बसून स्वबळावर शिवसेनेचे भवितव्य घडवण्याचा निर्णय घेेतला आहे. या सार्‍या राजकारणात भाजपाची काही चूक झाली का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. भाजपा हा धूर्त लांडग्यांचा पक्ष आहे आणि त्याचे नेते प्रादेशिक पक्षाशी असेच वागत असतात असे म्हटले जाते. पण आता भाजपाची रामविलास पासवान यांच्या जनलोकपार्टीशी आणि तेलुगु देसम पार्टीशीही युती आहे. त्यांना भाजपाशी व्यवहार करताना शिवसेनेसारखी काही अडचण नाही. ही अडचण शिवसेनेचीच आहे याचा अर्थ शिवसेनेचा कसला तरी भावनिक गंड आडवा येत आहे.

आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत आहे हा समस्त मराठी माणसाचा अपमान आहे असा युक्तिवाद करून ते आपल्या अपरिपक्व वागण्याशी मराठी माणसाला उगाच गोवत आहेत. पण शिवसेना म्हणजे समस्त मराठी माणूस हे त्यांचे समीकरणही पूर्णपणे तकलादू आहे. महाराष्ट्रातला भारतीय जनपा पक्ष म्हणजे दिल्लीचा आणि शिवसेना म्हणजे मराठी माणसाची असा त्यांचा दावा आहे जो बालबुद्धीतून उगम पावला आहे कारण महाराष्ट्रात भाजपाचे म्हणून निवडून आलेले सगळे आमदार मराठीच आहेत. केवळ आपण म्हणजे मराठी माणूस हे ठाकरेे यांचे म्हणणे पटण्यासारखे नाही. आपला अपमान तो मराठी माणसाचा अपमान हा त्यांचा पवित्राही चुकीचा आहे आणि त्या मार्गाने आपण महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात रान पेटवू अशी त्यांची योजना असेल तर ती पूर्ण फसवी आणि भ्रामक आहे. त्यांनी पकडलेला हा मार्ग शिवसेनेला संपवण्यास कारणीभूत ठरणारा आहे. कारण आज तरी केन्द्रात भाजपाचे सरकार आहे आणि शिवसेनेचे घोडे मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी भाजपाखाली अडकलेले आहे. शिवसेनेला विपरीत बुद्धी सुचली आहे.

Leave a Comment