भाजपा-शिवसेना अगम्य संबंध

yuti
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती होणार की नाही, या प्रश्‍नाची चर्चा सातत्याने सुरू आहे. परंतु शिवसेनेच्या काही अगम्य धोरणांमुळे या दोन पक्षातल्या वाटाघाटींना मोठे हास्यास्पद स्वरूप यायला लागले आहे. शिवसेनेला युतीची गरज तर आहे आणि म्हणूनच केंद्रातला शिवसेनेचा मंत्री अजून बाहेर पडलेला नाही. भाजपा-सेनेची महाराष्ट्रातली युती मोडली तेव्हा नरेंद्र मोदी परदेशात होते. तेव्हा युती मोडल्यामुळे केंद्रातल्या मंत्र्याने राजीनामा द्यावा की नाही, याचा निर्णय मोदींशी चर्चा करून घेतला जाईल असे शिवसेनेने म्हटले. मोदी परदेशातून परत आले आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली हे काही कळले नाही, परंतु या चर्चेच्या दुसर्‍या दिवशीच शिवसेनेच्या मुखपत्रात नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा (शिवसेनेच्या भाषेत बापाचा) अनावश्यक उल्लेख करून त्यांचा जाणीवपूर्वक अवमान करण्यात आला. मोदींविषयी इतका अनादर असूनही त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचा एक मंत्री अजूनही आहे. पण अशी ही मैत्री सुरू असतानाच आणि राज्याच्या सरकारमध्ये जाण्यास शिवसेना उत्सुक असतानाच सामनामधून भाजपावर मोठी विखारी टीकाही केली जात आहे. शिवसेनेला नेमके काय म्हणायचे आहे आणि काय करायचे आहे याचा काहीच पत्ता लागत नाही. मोठ्या गोंधळलेल्या मन:स्थितीत शिवसेनेची पावले चुकीच्या दिशेने अर्थात विनाशाकडे पडायला लागली आहेत.

युतीच्या वाटाघाटीमध्ये शिवसेनेची अवस्था मोठी संभ्रमाची झालेली आहे आणि त्यामुळेच भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे पाणी जोखले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पूर्ण मनोभंग करायचे ठरवले आहे. घटकेत युती करण्याची तयारी दाखवायची, घटकेत अटी चालणार नाहीत असे म्हणायचे तर कधी मध्येच उठून त्यांच्याशिवाय आमचे सरकार छान चालू शकेल असे म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची असा खेळ भाजपाच्या नेत्यांनी सुरू केला आहे. शिवसेना काही गरज नसताना स्वाभीमानाचे राजकारण करत असेल आणि अस्थानी, अनाठायी ताठा दाखवत असेल तर तो ताठा उतरवलाच पाहिजे असे भाजपा नेत्यांनी ठरवले आहे आणि त्यानुसार ते शिवसेनेला खेळवायला लागले आहेत. शिवसेनेला युतीच हवी असेल तर त्यांनी ती मनमोकळेपणाने करावी. यात त्यांचे आणि राज्याचे भले आहे. पण ते उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही. सामनामधून भाजपावर जी टीका केली जात आहे ती आवश्यक असती तर एकवेळ समर्थनीय ठरली असती. पण ती अनावश्यक, अनाठायी आणि अस्थानी आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून भाजपावर टीका करून भाजपा नेत्यांचा रोष ओढवून घ्यायला सुरुवात केली आहे.

खरे म्हणजे विदर्भाचा मुद्दा आज उपस्थित झालेला नाही. देशाची छोटी राज्ये असली पाहिजेत ही भाजपाची भूमिका आहे आणि त्यामुळेच भाजपाचा स्वतंत्र विदर्भाला पाठींबा आहे. शिवसेनेचा विदर्भाला विरोध आहे. या दोन्ही या भूमिका अशा ठाम असतानाही या दोघांची युती २५ वर्षे टिकली होती. तेव्हा भूमिका भिन्न असल्या तरी त्या आपण कायम ठेवायच्या आणि त्या भिन्न भूमिकांचा युतीवर काही परिणाम होऊ द्यायचा नाही ही समजूत दोन्ही पक्षांनी २५ वर्षे पाळली होती. आज या दोन पक्षात पुन्हा युती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशावेळी तो मुद्दा पुढे करून शिवसेनेचे नेते भाजपाला महाराष्ट्रद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा काहीही फायदा शिवसेनेला होणार नाही. तरीही ते हा मुद्दा का उचलत आहेत हे समजत नाही. शिवसेनेचे राजकारणच अगम्य होऊन बसले आहे.

महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पमतातल्या सरकारला शरद पवार यांनी विनाविलंब, विनाशर्त बाहेरून पाठींबा दिला. शिवसेनेला ते जमले नाही. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला पूर्ण नमवून पाठींबा द्यायचा असा पण केला आणि भारतीय जनता पार्टीशी डावपेच खेळायला सुरुवात केली. भाजपाला शिवसेनेशिवाय पर्यायच नसता तर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेसमोर गुडघे टेकून, त्यांच्या सगळ्या अटी मान्य करून, पूर्ण शरणागती स्वीकारून त्यांच्या पाठींब्याची याचना केली असती आणि तशा अवस्थेत शिवसेनेच्या नेत्यांनी चढेलपणा केला असता तर तो चढेलपणा, ते अटी लादणे, तो ताठा आणि तो कथित स्वाभीमान या गोष्टींना काही तरी अर्थ होता. पण शिवसेनेच्या पाठींब्याची भाजपाला गरजच नाही, उलट शिवसेनेलाच भाजपाच्या सरकारमध्ये जाण्याची गरज आहे पण तरीही शिवसेनाच अटी लादत आहे आणि आपले हसे करून घेत आहे. शिवसेनेच्या या राजकारणाला शहाणपणा म्हणावे की बालीशपणा म्हणावे हे कळत नाही. शरद पवार यांनी भाजपाला बहुमतासाठी बिनशर्त बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा केली तेव्हा अनेकांनी आपापल्यापरीने त्याचा अन्वयार्थ लावला. कोणी त्याला लाचारी म्हटले तर कोणी भ्रष्टाचारविरोधी कारवाई होऊ नये म्हणून केलेली एकतर्फी दोस्ती म्हटले. काही लोकांनी पवार कसे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत हे सांगितले. परंतु या त्यांच्या एकतर्फी घोषणेमागे काय दडलेले होते हे आता लक्षात यायला लागले आहे.

युती करण्यासाठी तडजोड करणे आणि नमते घेणे या गोष्टी शिवसेनेच्या स्वभावात बसत नाहीत. त्यांची सारी भाषा आणि आविर्भाव हा अशा प्रकारच्या तडजोडीच्या राजकारणाला अनुकूल नाही. त्यामुळे ते स्वत:चीच गोची करून घेत आहेत आणि भाजपावरच वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे मनाने अजूनही तीनशे वर्षांपूर्वीच्या शिवशाहीतच वावरत आहेत. त्यांना सद्य:स्थितीचे भान आलेले नाही. लोकशाहीमध्ये दोन पक्षांची युती ही अगदी साहजिक बाब आहे. भाजपाला बहुमताला काही जागा कमी पडल्या आहेत आणि तेवढ्या जागा आपल्याकडे आहेत. आपण २५ वर्षे भाजपाशी नांदलेलोच आहोत. तेव्हा निवडणुका होताच पवारांनी जितक्या सहजपणे आपला पाठींबा भाजपाला दिला तितक्याच सहजपणे आपणही भाजपाला पाठींबा द्यायला पाहिजे होता हे शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षातच आले नाही, अजूनही येत नाही. हा पाठींबा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा आहे ही साधी गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही. औरंगजेबाला भेटायला आगर्‍याला गेलेले शिवाजी महाराज आणि तिथे त्यांनी दाखविलेला स्वाभीमान असल्या इतिहासातल्या घटनांशी ते सध्याच्या या युतीचा संबंध जोडत आहेत. हे अनैर्सिगक आहे, अपरिपक्वपणाचे आहे पण त्याचे भान अजून उद्धव ठाकरे यांना येईना. त्यामुळे दोन पक्षाची युती होण्याची एक साधी घटना विनाकारण गुंतागुंतीची होऊन बसली आहे.

Leave a Comment