शुभ बोल नार्‍या

rane
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे विधानसभा निवडणुकीतले प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार चांगलेच अपयशी ठरेल अशी अभद्र वाणी उच्चारली आहे. या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्री नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. नारायण राणे हे स्वत: १९९५ साली मंत्री झाले होते. त्यांच्याकडे दुग्ध विकास खाते होते. तेव्हा तरी त्यांच्याकडे अनुभव कोठे होता? मग त्यांच्याकडे अनुभव नव्हता म्हणून त्यांचा कारभार वाईट झाला का? किंवा राणे मंत्री झाले तेव्हा त्यांना, अनुभव नसल्यामुळे त्यांना त्यांचे काम चांगले करता येणार नाही असा अशुभ आशिर्वाद कोणी दिला होता का? आयुष्यात एखादा माणूस मंत्री होतो तेव्हा मंत्री होण्याच्या आधी त्याला अनुभव नसतोच आणि अनुभव नाही म्हणून कोणाला काम करता येत नाही असे काहीही नसते. परंतु ते अस्थानी स्पष्टवक्तेपणा आणि अविचारी फटकळपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्येच आहेत. त्यामुळेच त्यांनी नव्या सरकारचे अभिनंदन करण्याच्या ऐवजी हे सरकार लवकरच अडचणीत येईल असे शिव्याशाप दिले. अभद्र बोलून पत्रकारांचे लक्ष वेधून घेण्यात नारायण राणे वाकबगारच आहेत. त्यांच्या स्वभावाला धरूनच त्यांची ही पत्रकार परिषद झाली.

‘तोल मोल के बोल’ हे त्यांना मान्यच नसते. त्यामुळे त्यांना माध्यमे थोडा वेळही देतात आणि जागाही देतात. आपल्याला मिळणार्‍या या प्रसिद्धीचे रहस्य त्यांना कळते आणि त्यामुळे ते अधिकच बेताल बोलायला लागतात. राणे २००५ सालपासून मुख्यमंत्रीपदावर आशाळभूतपणे नजर लावून बसलेले होते. परंतु तेव्हापासून चार मुख्यमंत्री बदलूनही राणेंची गाडी चुकली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एवढी कटुता आलेली आहे की, ते जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देण्याइतकी सभ्यता त्यांच्यात राहिलेली नाही. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असतानाही एकदा विलासराव देशमुख यांना, नंतर अशोक चव्हाण यांना आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केले गेले. राजकारणामध्ये आपला कट्टर वैरी मुख्यमंत्री झाला तरी त्यांना शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. तेवढे मन मोठे करता आले नाही तर निदान मौन तरी पाळावे. पण लग्नाच्या मांडवात जाऊन लवकरच या नवरा-नवरीचा घटस्फोट होईल अशी अभद्रवाणी तरी बोलू नये. पण नारायण राणे यांना द्वेषाचा विंचू चावला असल्यामुळे हेही भान राहिलेले नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांची प्रतिक्रिया, ‘यांची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही’ अशी होती. त्यांना एवढीही दूरची दृष्टी नाही की, आपण अशोक चव्हाण यांची लायकी काढतो तेव्हा नकळतपणे आपल्याच पक्षाच्या श्रेष्ठींना डिवचत असतो आणि पुढे-मागे आपले भवितव्य याच श्रेष्ठींच्या हातात असते.

अशा डिवचलेल्या श्रेष्ठींमुळेच नारायण राणे यांचे राजकीय करिअर जवळजवळ संपुष्टात येत आले आहे. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून जाळे टाकले. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांचा कसा कचरा केला हा इतिहास ताजा आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देईन अशा बढाया मारणार्‍या राणे यांना आपल्या मतदारसंघात सुद्धा निवडून येता आले नाही. राणे यांच्या स्वत:च्या राजकीय भवितव्यावर असे प्रश्‍नचिन्ह लागलेले असतानाच ते मोठे राजकारण धुरंधर असल्याचे सोंग आणून देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अपयशी ठरणार आहे असे शिव्याशाप द्यायला लागले आहेत. एखादा माणूस काय बोलतो यापेक्षा तो कोणत्या मन:स्थितीत बोलतो याला फार महत्व असते. त्याचे चित्त थार्‍यावर असेल तर तो विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध बोलत असतो. परंतु त्याच्या मनामध्ये काही तरी खदखदत असेल, तो लोकांच्या द्वेषाने पेटला असेल तर मात्र तर्कशुद्धही बोलू शकत नाही आणि तो शुभही बोलू शकत नाही. नारायण राणे यांची सद्दी संपत आलेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत. त्या अस्वस्थतेपोटी ते अशुभ बोलायला लागले आहेत.

शिवसेना ही लाचार झाली आहे ही त्यांची टिप्पणीही अशीच अनावश्यक आणि त्यांच्या मनोवृत्तीची द्योतक ठरली आहे. युतीच्या संदर्भात शिवसेनेची धोरणे निश्‍चितपणे चुकलेली आहेत. परंतु युतीमध्ये कोणी कोणाशी जमवून घेण्याची भूमिका घेतली तर ती लाचारी ठरत नसते. मात्र शिवसेनेच्या धोरणांना लाचारी म्हणणार्‍या नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून आणि आपल्या मुलांना तिकिटे मिळावीत म्हणून दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींच्या दारांचे उंबरठे झिजवले ती लाचारी होती नाही तर काय होती? मात्र अशा प्रकारे पत्रकारांजवळ काही तरी बोलून येनकेन प्रकारेन प्रसिद्धी मिळविण्याची चटक लागलेल्या लोकांना कधी लोकांवर आरोप करताना आपणही आपल्याकडे पाहिले पाहिजे हे कळत नाही. नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलून आता प्रसिद्धी मिळवली हे खरे आहे. परंतु यापुढच्या काळात पत्रकार त्यांच्याशी बोलतील आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया नोंदवतील अशी शक्यता दिसत नाही. कारण मुळात कॉंग्रेसचे स्थान उरलेले नाही. राज्याराज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षात असंतोष, दुफळी माजलेली आहे. पक्षश्रेष्ठींना पराभवाच्या खाईतून वर येण्याचा मार्ग सापडत नाही. पक्षाची अवस्था तर वाईट आहेच, पण आहे त्या उरल्या सुरल्या पक्षात राणे यांची अवस्था आणखी वाईट झाली आहे.

Leave a Comment