भाजपातला स्वागतार्ह बदल

bjp
भारतीय जनता पार्टी हा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे मुस्लीम कार्यकर्ते आणि नेते भाजपाच्या जवळ येत नाहीत. याबाबत भाजपा नेत्यांना वारंवार छेडलेही जाते. देशातल्या मुस्लिमांना दूर ठेवून भाजपा देशाची उभारणी कशी करणार, असा प्रश्‍न विचारला जातो आणि त्यावर भाजपाच्या नेत्यांचे उत्तरही ठरलेले असते. भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्याचा हिंदुत्ववाद मुस्लिमांच्या विरोधात नाही असे त्यांचे म्हणणे असते. एकवेळ हे म्हणणे मान्य केले तरी प्रश्‍न उरतोच. भाजपाचा हिंदुत्ववाद मुस्लिमांच्या विरुद्ध नाही तर मग भाजपातर्फे विधानसभा आणि लोकसभेला मुस्लीम उमेदवार का उभे केले जात नाहीत? प्रश्‍न बिनतोड आहे, पण भाजपा नेत्यांच्या मते केवळ उमेदवार उभे करण्यावरून याचा निर्णय घेता कामा नये. कारण केवळ आपला पक्ष मुुस्लिमांचा द्वेष करत नाही हे दाखवून देण्यासाठी म्हणून उमेदवार उभे करून चालत नाही. तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता असली पाहिजे. केवळ लाक्षणिक अर्थाने मुस्लीम उमेदवार उभा करायचा आणि ती जागा गमवायची हे परवडत नाही. याही म्हणण्यात तथ्य आहे.

भाजपाशिवाय अन्य काही सेक्युलर पक्ष मुस्लिमांचा पाठींबा असल्याचा दावा करतात, परंतु ते पक्ष सुद्धा या समाजाला फार प्रतिनिधीत्व देत नाहीत. ते सुद्धा निवडून येण्याची क्षमता आणि शक्यता असेल तरच मुस्लीम उमेदवार उभा करतात. भारतीय जनता पार्टीने आता निवडून येण्याची शक्यता असल्यास आपणही मुस्लीम उमेदवार उभे करू शकतो हे दाखवून दिले आहे. पूर्वी भाजपात मुस्लीम कार्यकर्ते सुद्धा नसत, पण आता अनेक ठिकाणी मुस्लीम समाजातले कार्यकर्ते भाजपात सक्रिय झालेले आहेत. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीवरून भाजपाला आणि नरेंद्र मोदी यांना कट्टर मुस्लीमविरोधी ठरविण्यात आले. परंतु याच गुजरातमध्ये भाजपाचे काम करणारे हजारो मुस्लीम कार्यकर्ते आहेत आणि जिथे ते निवडून येऊ शकतात तिथे त्यांना निवडून सुद्धा आणलेले आहे. आता इतरही राज्यांमध्ये ठिकठिकाणी मुस्लीम कार्यकर्ते भाजपात आलेले आहेत. त्यांनी आपले इलेक्टोरल मेरिट दाखवून दिले तर त्यांनाही भाजपातर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता दिसत आहे. भाजपाच्या या दाव्याची खरी परीक्षा जम्मू-काश्मीरमध्ये होत आहे. या मुस्लीमबहुल राज्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे.

मुस्लीमबहुल असूनही भारतीय जनता पार्टी तिथे सत्ता प्राप्त करण्याच्या तयारीने कामाला लागली आहे. ८७ सदस्यांच्या या विधानसभेत ४५ जागा काश्मीर खोर्‍यातल्या आहेत आणि काश्मीर खोर्‍यात ९० टक्के मतदान मुस्लिमांचे आहे. अशा राज्यात भाजपाला सत्ता प्राप्त करायची असेल तर उमेदवार मुस्लीमच असले पाहिजेत आणि ते निवडून येण्याची शक्यता असली पाहिजे. विशेष म्हणजे भाजपाने अनेक मुस्लीम नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आपण मुस्लीमविरोधी नाही हे तर दाखवून दिले आहेच, परंतु निवडून येण्याची शक्यता असलेलेही काही मातबर उमेदवार उभे केले आहेत. पक्षाची पहिल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यात १३ मुस्लीम आहेत आणि हा भाजपामध्ये झालेला स्वागतार्ह बदल मानला जात आहे. कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या काश्मीरमधील तीन मुख्य पक्षातील अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत दाखल झालेले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या माजी आमदारांची कन्या डॉ. हिना भट भाजपात दाखल झाली असून ती काश्मीर खोर्‍यातील अमिराकडाल या मतदारसंघातील उमेदवार आहे. त्याशिवाय काश्मीर खोर्‍यातील राजौरी मतदारसंघात चौधरी तालिब हुसेन यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. ते नॅशनल कॉन्फरन्सच्या पूर्वीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्याव्यतिरिक्त पीडीपी मधून आलेले ताज मोहंमद हे सुरनकोट मतदारसंघात भाजपाचे उमदेवार असणार आहेत.

नामवंत पीडीपी नेते मियॉं अल्ताफ यांचे जावई अब्दुल घनी कोहली हे उच्च विद्याविभूषित तंत्रज्ञ हे भाजपाचे कालकोटे मतदारसंघातले उमदेवार असणार आहेत. युवक कॉंग्रेसचे नामवंत नेते आर.एस. पठानिया यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. ४५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत १३ मुस्लीम उमेदवार आहेत. पुढच्या यादीतही आणखी काही उमेदवार असतील. भाजपामध्ये मुस्लीम नेते मोठ्या संख्येने असल्याचे दृश्य निदान काश्मीरमध्ये तरी दिसेल. कधी काळी हे शक्य होईल असे कोणाला वाटलेही नव्हते. खरे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसचीही अवस्था थोड्याबहुत फरकाने अशीच होती. देशात मुस्लीम लीग हा मुस्लिमांचा पक्ष मानला जायचा आणि कॉंग्रेस हा हिंदूंचा पक्ष समजला जायचा. पण स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणात मुस्लिमांनी कॉंग्रेसला जवळ केले. तशीच किमया भाजपाच्या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीने मुस्लीम समाजाच्या बाबतीत कसलाही पक्षपात न केल्यास मुस्लीम मतदार भाजपाकडे आकृष्ट होऊ शकतात. नरेंद्र मोदी यांनी तशी काही धोरणे जाहीरही केली आहेत. आपण मुस्लिमांचा अनुनय करणार नाही हे त्यांनी जेवढे निक्षून सांगितले आहे तेवढ्याच कटाक्षाने मुस्लिमांशी पक्षपातही करणार नाही हेही सांगितले आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे.

Leave a Comment