काय होणार मनसेचे ?

mns
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष होण्यास पात्र नव्हता पण राज ठाकरे यांनी उसने अवसान आणून आणि त्यांच्या भोवती काही भोळे कार्यकर्ते जमले म्हणून मोठा राजकीय पक्ष असल्याचे दाखवायला सुरूवात केली होती. ते बोलतानाही आपल्या खांद्यावर महाराष्ट्राच्या कल्याणाचा मोठा भार आहे आणि आपण तो भार सहन करण्यास पात्र असणारे फार मोठे नेते आहोत अशा ऐटीत बोलत होते पण प्रत्यक्षात त्यांना एखाद्या ग्रामपंचायतीच्याही कारभाराचा अनुभव नव्हता आणि तसा तो चालवण्याची त्यांच्यात कुवतही नाही पण त्यांनी मनसे हा पक्ष स्थापन केला. माध्यमांनी त्यांनी उचलून धरले. एखादा राजकीय पक्ष स्थापन करायचा झाला तर त्याला काही विचारसरणी असली पाहिजे. समाजाच्या एका वर्गाला आपलासा वाटेल असा काही तरी व्यापक कार्यक्रम त्या पक्षाकडे असला पाहिजे. शिवाय अशा कार्यक्रमाचा आग्रह धरणार्‍या आणि सामाजिक, राजकीय कामाचा अनुभव असलेल्या अभ्यासू कार्यकत्यार्ंंचा तसेच नेत्यांचा एक गट सोबत असला पाहिजे पण तसा काही प्रकार मनसेत नाही.

आभासी प्रतिमा आणि अफाट बोलण्याची खोड या जोरावर माध्यमांच्या साह्याने राज ठाकरे यांनी राजकारणात एक खळबळ उडवून दिली. माध्यमांनी दिलेल्या अनावश्यक प्रसिद्धीमुळे राज ठाकरे यांनाही आपला काही उजेड पडणार असे वाटायला लागले आणि त्यांनी स्वत:विषयी भलत्याच कल्पना तयार केल्या. शिवसेनेत आपण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपण हुशार असताना त्यांचे महत्त्व वाढत आहे हे पाहून निराश झाल्यामुळे ते बाहेर पडले होते. हाच त्यांच्या पक्षाचा आधार. उद्धव ठाकरे तर काय चीज आहे हे लोकांना दिसत आहेच पण राज ठाकरेही काय आहेत हे दिसत आहे. अशाच कल्पनेने नारायण राणेही बाहेर पडले पण त्यांनी बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढण्याचा असा अविचार करण्यापेक्षा कॉंग्रेसची वाट धरली. त्यांनी कुवत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त आहे आणि त्यांनी बाहेर पडून एका राष्ट्रीय पक्षाचा आधार घेतला आहे पण तरीही त्यांचे राजकीय करीयर आता संपत आले आहे. मग राज ठाकरे यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला असेल तर तो पक्ष टिकणे कसे शक्य आहे ?

अपेक्षेप्रमाणेच घडत आहे. त्यांच्यावर आगापिछा नसलेला हा पक्ष गुंडाळण्याची पाळी आली आहे. नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यालाच भगदाड पडायला लागले आहे. जिल्हा शाखेचे सचिव वसंत गीते यांनी आपल्या अनेक सहकार्‍यांसह मनसेच्या पदांचा त्याग करण्याचा निर्णय घेऊन ते राजीनामे राज ठाकरे यांच्याकडे पाठवले. त्यांनी मुंबईत बसूनच ते सारे राजीनामे स्वीकारले असल्याचे जाहीर केले. या पक्षात हे राजीनामे स्वीकारावेत की नाही यावर विचार करणारी कसलीही यंत्रणा नाही. सारे निर्णय राज ठाकरेच घेतात आणि प्रत्येक प्रसंगाला तेच हजर असतात. दौरेही तेच करतात. कथित ब्ल्यू प्रिंट तेच जारी करतात आणि छोटे मोठे प्रसंग आले की तेच धावून जाऊन काही तरी निर्णय घेेतात. आपल्या विधानसभेच्या उमेदवारांची निवडही तेच करतात आणि पक्षाचा प्रचारही तेच करतात. त्यांच्या पक्षाची स्थापना होऊन दहा वर्षेे होत आली आहेत पण त्यांना या पक्षात संघटनात्मक यंत्रणाही निर्माण करता आल्या नाहीत. ते महाराष्ट्रात काय करणार आहेत हे सांगायलाही त्यांना नऊ वर्षे लागली.

पक्षाला लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांत मोठे अपयश आले. या पार्श्‍वभूमीवर पक्षाला गळती लागली. नाही तर राज ठाकरे छान भाषण करतात म्हणून त्यांच्याभोवती काही भोळेभाबडे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला. ते आता बाहेरचा रस्ता पकडायला लागले आहेत. त्यांना राज ठाकरे यांनी थोपवावे असे अपेक्षित आहे. पण ते या लोकांना कशाच्या जोरावर थोपवणार आहेत ? त्यांचा पक्ष कोणत्या विचारावर उभा आहे हेच कळत नाही. पक्षाला स्थापन होऊन दशक उलटले तरीही मनसे हा पक्ष या तत्त्वासाठी, या विचारासाठी किंवा या कार्यक्रमासाठी उभा आहे असे सांगता येत नाही. त्यांनी शिवसेनेत आपल्याला काही स्थान नाही या नैराश्याने बाहेर पडून आधी आपला पक्ष स्थापन केला आणि नंतर ते आपल्या पक्षाला कोणत्या विचारावर उभे करावे याच्या शोधात राहिले. त्यांचा व्यासंग आणि सामाजिक कार्याची पार्श्‍वभूमी अगदीच बेतासबात असल्याने त्यांना एक दशक झाले तरीही आपल्या पक्षाची विचारसरणी कोणती हे सांगता येत नाही. तेव्हा ते आपल्या या बाहेर पडणार्‍या कार्यक्रमाला कोणत्या विचाराचे आणि तत्त्वज्ञानाचे आवाहन करून थोपवणार आहेत ?

राज ठाकरे यांनी गीते यांचा राजीनामा स्वीकारल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना आणि त्यावर चर्चा सुरू असतानाच जळगावात मनसेला एक टोला बसला. तिथले मनसेचे नेते ललित कोल्हे हेही राजीनामा देणार असल्याची बातमी आली. कोल्हे केवळ राजीनामाच देण्याच्या मन:स्थितीत आहेत असे नाही तर त्यांनी आपल्या नगरसेवक असलेल्या मातोश्रींसह भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. कोल्हे खडसे यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार करीत असल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. उत्तर महाराष्ट्रातला मनसेचा बालेकिल्ला असा ढासळत आहे. ठाणे वगैरे भागातले त्यांचे अस्तित्व नाहीसे होणे हा आता काही दिवसांचाच प्रश्‍न आहे. पक्षातल्या काही ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनीही आधीच बाहेरची वाट पकडली आहे. राज ठाकरे समोर आलेल्या प्रत्येक माणसाला तुच्छ लेखून बोलत असतीत. त्यांना एकदा भेटल्यानंतर पुन्हा म्हणून भेटू नये असे त्याला वाटते. या अफलातून संभाषण कौशल्यामुळे हा पक्ष रसातळाला चालला आहे. कार्यकर्त्यांशी सलगीने बोलणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कल्पना संयमाने ऐकून घेणे हा कोणतीही संघटना बांधण्याचा पहिला पाठच त्यांना कोणी शिकवलेला नाही.

Leave a Comment