भ्रष्टाचार कमी होईल ?

devendra-fadnavis
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपण भ्रष्टाचार कमी करू असे जाहीर केले आहे. अर्थात आपली ही घोषणा पोकळ वाटू नये यासाठी त्यांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकायुक्तांना नखे आणि दात देऊ असे म्हटले आहे. याचा अर्थ ते महाराष्ट्रातली लोकायुक्त ही यंत्रणा सक्षम करणार असा होतो. त्यांनी अशी नेमकी घोषणा केली तेव्हाच आपल्या या राज्यात लोकायुक्त नावाची काही यंत्रणा आहे हे आपल्या लक्षात आले. नाही तर ही यंत्रणा असून अडचण आणि नसून खोळंबा अशी आहे. अन्यथा महाराष्ट्रातल्या या यंत्रणेचे काम जवळजवळ असे काही ठप्प झाले आहे की, या राज्यात अशी काही यंत्रणा आहे का असा प्रश्‍न पडावा. इतर राज्यापैकी काही राज्यांत ती यंत्रणा चांगलीच सक्रिय आहे. काही राज्यातल्या त्यांच्या बातम्याही वाचायला मिळतात. तेव्हा महाराष्ट्रात पिकलेला एवढा भ्रष्टाचार नाहीसा करणारा कोणीच का नाही अशी शंका मनात येते.

उत्तर प्रदेशात लोकायुक्तांच्या फटक्यामुळे तिथल्या शिक्षकांच्या भरतीतला भ्रष्टाचार उघड झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांना ती भरती रद्द करावी लागली. कर्नाटकात लोकायुक्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी भाजपाचे मुख्यमंत्री असलेले बी. एस. येदियुरप्पा यांचा भ्रष्टाचार असा काही उघड्यावर आणला की येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि दोन दिवस जेलची हवा खावी लागली. यानंतरसुध्दा त्यांना कधीही शिक्षा होण्याची शक्यता आहे. एका एका राज्यातील असे सक्रीय लोकायुक्त पाहिले म्हणजे महाराष्ट्रात लोकायुक्त नावाची यंत्रणा अस्तित्वात तरी आहे की नाही अशी शंका यायची. महाराष्ट्रातल्या कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लोकायुक्ताचे नावसुध्दा ऐकू येत नव्हते. पण लोकांच्या माहितीसाठी हे सांगितले पाहिजे की केंद्रामध्ये लोकपाल नावाची यंत्रणा नेमण्यासाठी अण्णा हजारे यांचा प्रचंड संघर्ष चाललेला होता. अर्थात, केंद्रात अजूनही लोकपाल नेमले गेलेले नाहीत. पण लोकपालांच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात मात्र लोकायुक्त नावाची यंत्रणा आहे. महाराष्ट्रातही ती आहे. उत्तराखंडात भाजपाचे सरकार असताना तिथे पहिल्यांदा लोकायुक्त कायदा केला गेला. नंतर अन्य राज्यांमध्ये लोकायुक्त नेमले गेले. लोकायुक्त ही यंत्रणा राज्यातल्या भ्रष्टाचाराची नोंद घेण्यासाठी आहे आणि महाराष्ट्रात तर भ्रष्टाचाराच्या नद्या वाहत आहेत. त्यामुळे फार गांभिर्याने लोकायुक्त म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचा निश्‍चय लोकायुक्तांनी केलाच तर महाराष्ट्राच्या लोकायुक्तांना भरपूर काम आहे.

मात्र भ्रष्टाचाराच्या एवढ्या कहाण्यामध्ये महाराष्ट्राचे लोकायुक्त फार चमकलेच नाहीत. लोकायुक्ताचे दौरे होतात, शासकीय विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम असतो. काही ठराविक लोक त्यांना निवेदने देतात आणि पुन्हा त्या निवेदनाचे काय होते हे कळत नाही. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातल्या लोकायुक्तांना नखे आणि दात दिले जातील, असे उद्गार काढले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर केलेली ही सर्वात महत्त्वपूर्ण घोषणा आहे. महाराष्ट्रातला भ्रष्टाचार निपटून काढण्याचा निर्धार या घोषणेतून व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी बेसुमार भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांच्यावर आता कारवाया केल्या जातील. हे तर या घोषणेतून स्पष्ट होतेच पण या पुढच्या काळामध्ये राज्यात होणार्‍या भ्रष्टाचाराला राज्यातली लोकायुक्त यंत्रणा अंकुश लावेल हेही यातून सूचित होते. तसे करण्याची गरजसुध्दा आहे. कारण महाराष्ट्रात शासकीय पातळीवर भरपूर भ्रष्टाचार माजला आहे. कोणीतरी हे सारे वातावरण स्वच्छ करण्याची गरज आहे.

आजवर सत्तेचा वापर करून भरपूर संपत्ती कमावण्यास सोकावलेल्या नेत्यांचे कॉंग्रेस गवतासारखे गवत लातूरसह सगळ्या ठिकाणी खूप उगवून माजले आहे. आपण कितीही पैसा खाल्ला आणि सत्तेचा वापर करून अमाप जायदाद कमावली तरीसुध्दा कोणी आपले काही वाकडे करत नाही अशा कल्पनेत हे सारे सत्ताधारी नेते वावरत होते. आपल्याला जाब विचारणारा आणि आपल्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडणारा कोणीतरी स्वच्छ मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळेल असे त्यांना वाटतच नव्हते पण आता नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने कार्य करणार्‍या आणि त्यांच्याच शैलीने प्रशासन चालवण्यास उत्सुक असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत आणि त्यांनी तसा निर्धारही व्यक्त केलेला आहे. केंद्रात निरनिराळ्या खात्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पंतप्रधान कार्यालय असते. तसे कार्यालय राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय म्हणून कार्यरत करण्याची कल्पना फडणवीस यांनी मांडली आहे आणि ती स्वागतार्ह आहे. पण त्यांचा सामना बराच अवघड आहे. कारण महाराष्ट्रातच्या प्रशासनात आणि नोकरशाहीमध्येसुध्दा भ्रष्टाचाराची पाळेमुळे खूप खोलवर रुजली आहेत. सचिवालयात त्यांचेच राज्य आहे. या राज्याखाली फडणवीस यांना जबरदस्त सुरूंग पेरावे लागणार आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया.

Leave a Comment