तमिळनाडू कॉंग्रेसमधील फूट दुर्दैवी

gk-vasan
तमिळनाडूतील कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय नौकानयन मंत्री जी. के. वासन यांनी पक्षाचा त्याग केला असून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या नव्या पक्षाचे नाव अजून जाहीर झालेले नाही, परंतु ते नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यांची घोषणा लवकरच केली जाईल असे त्यांच्या गटाचे नेते ज्ञानदेसिकन यांनी सांगितले. तमिळनाडूतल्या कॉंग्रेसमध्ये पडलेली ही फूट पाहिली म्हणजे १९९६ सालच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. कारण त्यावर्षी तमिळनाडूच्या कॉंग्रेस पक्षात अशीच फूट पडली होती आणि जी.के. वासन यांचे वडील जी. के. मूपण्णार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तमिळ मनिला कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. यथावकाश हा पक्ष नंतर कॉंग्रेसमध्ये विलीन झाला, परंतु तरी सुद्धा त्या पक्षाचा विचार स्वीकारलेला एक गट तमिळनाडू कॉंग्रेसमध्ये कायमच राहिला. तोच आता पुन्हा बाहेर पडून नवा पक्ष स्थापन करत आहे. या घटना पाहिल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या शरद पवार यांच्या राजकारणाची आठवण होते. शरद पवार यांनी सुद्धा दोन वेळा पक्षातून बाहेर पडून आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पण ते जेव्हा जेव्हा कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा कॉंग्रेसमध्ये त्यांचा एक वेगळा गट सातत्याने कार्यरत राहिलेला होता.

तमिळनाडूमधल्या या गटाचे नेमके म्हणणे काय आहे? १९९६ साली हा गट तमिळ मनिला कॉंग्रेस हे नाव घेऊन पक्षातून बाहेर पडला तेव्हाचे कारण वेगळे होते. कॉंग्रेसचे त्यावेळचे सर्वोच्च नेते होते तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून जयललिता यांच्या अण्णा द्रमुकशी युती केली होती. ही युती करताना त्यांनी राज्यातल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना विश्‍वासात घेतले नव्हते हे मूपण्णार गटाला आवडले नाही. केवळ विश्‍वासात घेणेच नव्हे तर जयललिता यांच्याशी युती करणेच चुकीचे आहे असे या गटाचे म्हणणे होते. आता जयललिता यांना ज्या भ्रष्टाचाराबद्दल चार वर्षे कारावासाची आणि १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा झालेली आहे त्या भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यावेळी उघड झालेली होती. अशा भ्रष्ट जयललिताशी युती करणे मुपण्णार यांना मान्य नव्हते. त्याशिवाय त्यांच्या अलगतेचे आणखी एक महत्वाचे कारण होते. कॉंग्रेसने तमिळनाडूमध्ये कधी ना कधी तरी स्वतंत्रपणे उभे रहावे असा या गटाचा आग्रह आहे. १९६७ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तमिळनाडूतली कॉंग्रेसच्या हातातली सत्ता गेली. त्यानंतर पुन्हा पक्षाला कधीच सत्ता मिळाली नाही आणि कॉंग्रेस पक्षाने तिथे कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून सातत्याने दुय्यम भूमिका स्वीकारली.

अशी भूमिका स्वीकारण्यापेक्षा कधी ना कधी तरी कॉंग्रेस पक्षाने राज्यात स्वबळावर उभे रहावे असा मूपण्णार यांच्या गटाचा आग्रह होता. नरसिंह राव किंवा सोनिया गांधी यांना तो मान्य नाही. नरसिंह राव यांनी अण्णा द्रमुकशी युती केली होती तर सोनिया गांधी यांनी द्रमुकशी हातमिळवणी केली. १९९५ साली जयललिता भ्रष्ट असल्यामुळे त्यांच्याशी युती करणे मूपण्णार गटाला मंजूर नव्हते आता त्यांचे चिरंजीव जी. के. वासन यांनाही भ्रष्ट द्रमुकशी म्हणजे करुणानिधी यांच्याशी समझोता करणे मान्य नाही. याशिवाय कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचे एकंदरीत वर्तन आणि पक्षाला उभारणी देण्याबाबत व्यक्त केली झालेली श्रेष्ठींची असमर्थता यामुळे वासन यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार सुरू झालेला आहे. त्यातून ही फूट पडली आहे. परंतु १९९६ साली पडलेली फूट आणि आता पडू पाहणारी फूट यामध्ये मोठा फरक आहे. पूर्वी फूट पडून तमिळ मनिला कॉंग्रेस स्थापन झाली तेव्हा राज्यात कॉंग्रेसला १५ टक्के मते मिळालेली होती. कॉंग्रेसमधला मोठा गट तमिळ मनिला कॉंग्रेसमध्ये गेला होता आणि या पक्षाचे २० खासदार निवडून आले होते. विधानसभेत सुद्धा कॉंग्रेसचे ३२ आमदार होते.

म्हणजे त्यावेळी पडलेली फूट चांगल्या स्थितीत पडलेली होती, पण आताची फूट फार वाईट अवस्थेत आहे. राज्यातली केवळ साडेचार टक्के मते कॉंग्रेसच्या मागे आहे. त्यात दोन गट पडत आहेत. लोकसभेत या पक्षाचा एकही खासदार नाही आणि विधानसभेत केवळ पाच आमदार आहेत. त्यातले तीन आमदार वासन यांच्या गटात जाणार आहेत तर दोन आमदार कॉंग्रेसमध्ये जाणार आहेत. म्हणजे तिथे कॉंग्रेसमध्ये पडणारी फूट ही गरिबीत पडणारी फूट आहे. जी. के. मूपण्णार हे प्रभावी नेते होते. त्यामुळे ते तमिळ मनिला कॉंग्रेस स्थापन करू शकले, पण नंतर त्यांना सुद्धा आपला पक्ष पुन्हा कॉंग्रेसमध्ये विलीन करावा लागला. वासन हे तसे प्रभावी नेते नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातले कॉंग्रेसचे नेते ज्यांना थोडाफार मान देतात ते माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् १९९६ साली तमिळ मनिला कॉंग्रेसमध्ये गेले होते. आता मात्र ते वासन यांच्या नव्या पक्षात जाणार नाहीत. उलट आता तमिळनाडूत जेवढा काही कॉंग्रेस पक्ष टिकून आहे त्याचे नेतृत्व चिदंबरम् करणार आहेत.

तमिळनाडूमध्ये १९६७ साली कामराज नाडर हे अतीशय प्रभावी असे कॉंग्रेस नेते मुख्यमंत्री होते. पण त्यावर्षी देशभरातच कॉंग्रेसविरोधी लाट आली, तमिळनाडूत ती अधिक तीव्र होती. देशाचा पंतप्रधान कोण असावा याचा निर्णय घेणारे कॉंग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ नेते होते त्या पाच वरिष्ठ नेत्यांमध्ये कामराज यांचा समावेश होता. पण अशा या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याला द्रमुकच्या उमेदवाराने पराभूत केले. हा उमेदवार कॉलेजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी होता. तेव्हापासून कॉंग्रेसची तमिळनाडूतली सद्दी संपली. तिथे कॉंग्रेस तिसर्‍या क्रमांकावर गेली. पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकासाठी द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यातच गेली ४० वर्षे स्पर्धा होत राहिली. आता या दोन्हीही तमिळ पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जयललिता तुरुंगात जाऊन आल्या आहेत आणि पुन्हा त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे कारण त्या आता जामिनावर सुटल्या आहेत. द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्या पत्नी आणि मुलीवर भ्रष्टाचाराचे खटले दाखल झाले आहेत आणि या कुटुंबाचे पाय कधी तुरुंगाकडे वळतील याचा नेम नाही. आजवर त्यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी संरक्षण दिले, पण आता नरेंद्र मोदी त्यांची गय करणार नाहीत. असे हे दोन तमिळ पक्ष भ्रष्टाचारामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि या वातावरणात कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी आहे. परंतु नेमकी ही संधी हाताशी येत असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांना फुटीचे वेध लागले आहेत.

Leave a Comment