भोपाळचा कर्दनकाळ

anderson
१९८४ साली भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायूच्या दुर्घटनेस जबाबदार असणारा संबंधित युनियन कार्बाईड या कंपनीचा भूतपूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन ऍन्डरसन याचा वयाच्या ९२ व्या वर्षी मृत्यू झाला. १९८४ ची ती घटना घडून आता तीस वर्षे होत आहेत. परंतु त्या काळात जे लोक हयात होते म्हणजे ज्या लोकांनी या दुर्घटनेच्या बातम्या विस्ताराने वाचलेल्या आहेत त्यांना या घटनेच्या फार कटू आठवणी सतावत असतात. कारण भोपाळची दुर्घटना हा देशाच्या औद्योगीकरणाचा एक परिणामच आहे असे मानले गेले होते. ही घटना होतीच तशी भयानक. भोपाळ शहराच्या जुन्या भागात हा कारखाना होता आणि त्यात काही कीटकनाशके तयार केली जात होती. मुळात कीटकनाशकेच विषारी असतात. मग ती तयार करण्यासाठी त्यापेक्षाही विषारी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा प्रचंड मोठा साठा कारखान्यात केलेला असतो. त्या साठ्याचा काही दुष्परिणाम होऊ नये यासाठी त्याच्या संबंधात काही दक्षता घेतल्या पाहिजेत. पण या कारखान्यात तशा त्या घेतलेल्या नव्हत्या. त्यामुळे तिथून विषारी वायू बाहेर पडला आणि भोपाळ शहराच्या हवेत मिसळला, ज्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. हा मृतांचा आकडा सरकार तीन हजार असल्याचे सांगते मात्र अनधिकृत माहितीनुसार १५ हजार लोक मृत्युमुखी पडले. शिवाय पाच लाख लोक विषारी वायूचे भयानक परिणाम सोबत घेऊन जगण्याची शिक्षा भोगत राहिले.

या गोष्टीला जबाबदार कोण? वॉरन ऍन्डरसन हा अमेरिकेतला अधिकारी या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता. त्याची ही जबाबदारी होती. परंतु त्याने पुरेशी काळजी घेतली नाही. प्रत्यक्षात ज्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्यावर त्याने नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे या अपघातास तोच कारणीभूत होता. या घटनेला खरेच जबाबदार कोण, याबाबत बरेच वाद-विवाद होत राहतील. परंतु वॉरन ऍन्डरसन याची जबाबदारी टळत नाही आणि त्याला कसलीही शिक्षा झाली नाही. तो शिक्षा न भोगताच मरण पावला. प्रत्यक्षात या गॅसचा साठा सांभाळण्याचे काम त्याचे नव्हते असा काही लोकांचा युक्तीवाद वादासाठी मान्य केला तरी एक गोष्ट पुन्हा उरतेच. या अपघाताला दुसरेच कोणी तरी जबाबदार होते पण त्यातल्याही कोणाला एका दिवसाच्या कारावासाची सुद्धा शिक्षा झाली नाही. भारत सरकार अमेरिकेकडे तसा आग्रह धरू शकले नाही. त्यासाठी अमेरिकेवर दबाव आणू शकले नाही ही गोष्ट अपघातापेक्षाही जास्त क्लेशदायक आहे.

या वायूचा परिणाम म्हणून नंतर काही महिलांच्या पोटी विकृत मुले जन्माला आली. म्हणजे विषारी वायू दुर्घटना १९८४ ला झाली असली तरी नंतरच्या दोन पिढ्यांना तिचे परिणाम भोगावे लागत आहेत. म्हणूनच औद्योगिक जगतातला हा सर्वात विनाशकारी अपघात मानला जातो. पण असे असूनही तिला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्या एकाही व्यक्तीला साधी शिक्षा सुद्धा झाली नाही. कारण अपघातास जबाबदार असणारे अमेरिकन होते आणि मरण पावलेले लोक अविकसित देशातले होेते. प्रगत देशातल्या लोकांना तिसर्‍या जगातले लोक म्हणजे बोलणारी जनावरेच वाटतात. या प्रगत देशातल्या लोकांना आरामात जगता यावे आणि त्यांना निसर्गाला ओरबाडून आपल्या सुखसोयी निर्माण करता याव्यात यासाठी भारतासारख्या देशातले काही हजार लोक मेले तरी त्यांना काही वाटत नाही. हाच प्रकार अमेरिकेत घडला असता आणि १५ हजार नव्हे तर केवळ १५ लोक मेले असते तरीही त्याला जबाबदार असणारांना फाशीची शिक्षा झाली असती. सार्‍या प्रगत देशात फाशीची शिक्षा रद्द झाली असली तरीही अमेरिकेत रद्द झालेली नाही. तिथे अजूनही ही शिक्षा दिली जाते. ती अशा माणसाला दिली गेली असती. पण त्याचा अपराध भारतात झाला आहे त्यामुळे त्याला कसलीही शिक्षा देण्याची गरज नाही असेच अमेरिकेत मानले गेले.

तीन डिसेंबरला हा प्रकार घडला आणि अँडरसन पाच डिसेंबरला भोपाळला आला. भोपाळच्या एका न्यायालयाने त्याच्या अटकेचा आदेश काढला पण तो ताबडतोब विमानाने दिल्लीला गेला आणि तिथून अमेरिकेला पळाला. तो नंतर भारतात आलाच नाही. त्याला भारतात आणावे यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पण त्याला कधीच यश आले नाही. कारण त्याला अमेरिकेच्या सरकारचेच संरक्षण होते. भारत सरकार काही अमेरिकेवर त्यासाठी दबाव आणू शकले नाही. त्याच्यावर नंतर दहा वर्षांनी नाममात्र वॉरंट्स काढण्यात आली पण ती वॉरंट बजावण्यातच आली नाहीत. सरकारच्या आशीर्वादाने तो सहीसलामत राहिला. भारतात तर त्याच्यावर खटला भरला गेलाच नाही निदान अमेरिकेत तरी त्याच्यावर कसली तरी कारवाई व्हायला हवी होती पण तसेही घडले नाही. तिथल्या सरकारने त्याला १५ हजार खून माफ केले. त्याच्यावर तर कारवाई झालीच नाही पण त्याच्या सोबतच्या अन्य संचालकांनाही कधी न्यायालयासमोर उभे रहावे लागले नाही. गरिबांचे जीव हे जीव नसतात असेच अमेरिका मानते. अँडरसन याला काळाने मात्र चांगलीच शिक्षा दिली. भोपाळचा अपघात झाल्यापासून तो चांगले जीवन जगू शकला नाही.