दलित हत्याकांडाच्या निमित्ताने

javkheda
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा या गावातील दलित कुटुंबातील तिघांची एकदम झालेली हत्या ही तर दुःखदायक आणि निषधार्ह आहेच परंतु या हत्याकांडाचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी चळवळ वाढवण्याचा सुरू असलेला प्रयत्न तितकाच निषेधार्ह आहे. नक्षलवादी चळवळीच्या नेत्यांनी आदिवासी तरुणांमध्ये आपली मुळे रुजवली आहेत आणि आपली चळवळ वाढवण्यासाठी ते बर्‍याच दिवसांपासून दलित तरुणांवर लक्ष लावून बसले आहेत. मात्र त्यांना यश येणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचा आधार हा नक्षलवाद्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. पण असे असले तरी झालेल्या हत्या काही कमी निषेधार्ह ठरत नाहीत. कारण त्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. यापूर्वी जामखेड तालुक्यातला खर्डा या गावी असाच प्रकार घडला होता आणि एका मुलाची हत्या झाली होती. त्यानंतर नेवासा तालुक्यातील सोनई गावी दलित समाजातल्या तीन तरुणांचा केवळ खूनच करण्यात आला असे नाही तर त्यांच्या शरीराचे विळीने कापून तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्या गाजत असलेल्या जवखेडा खालसा या गावातील जाधव कुटुंबातील तिघांचे जीव घेण्यात आले.

३५ वर्षे वयाचे मोहन जाधव आणि त्यांची पत्नी त्याबरोबरच तरुण मुलगा अशा तिघांचे खून करून त्यांची प्रेते कापलेल्या अवस्थेत विहिरीत टाकण्यात आली. या हत्याकांडामागे ज्यांचा हात आहे त्यांनी विलक्षण त्वेषाने आणि चिडीने त्यांचे खून केले असावेत असे प्रेताची विटंबना केल्याच्या प्रकारावरून दिसून येते. हा त्वेष कसला आहे याचा अजून शोध लागला नाही. परंतु हत्या करणारे लोक निर्ढावलेले आणि तयारीचे तसेच सराईत असावेत असे दिसते. कारण निव्वळ रागापोटी कोणी कोणाचे खून करतात तेव्हा ते भावनेच्या भरात खून करतात आणि खून करून पळून जातात मात्र सराईत नसतील तर मागे कसला तरी पुरावा ठेवून जातात. जवखेडाच्या प्रकरणात कसलाही पुरावा मागे ठेवलेला नाही. याचा अर्थ खून केल्यानंतर पुरावा मागे राहणार नाही याचे भान ठेवून आणि पूर्ण नियोजन करून हे खून केले आहेत. प्रेते विहिरीत टाकण्याची कृती सुध्दा सराईतपणाचे दर्शन घडते. त्यामुळेच पोलिसांना अजून आरोपी सापडलेले नाहीत. परंतु महाराष्ट्राला हादरवून टाकणार्‍या या वर्षातल्या या तीन घटना नगर जिल्ह्यातच का घडाव्यात असा प्रश्‍न मनाला सतावतो. एकाच वर्षात या जिल्ह्यामध्ये अशा लहान मोठ्या ७४ घटना घडल्या आहेत.

दलित अत्याचाराच्या घटना नगर जिल्ह्यात जास्त घडतात. म्हणून नगर जिल्हा हा अत्याचार प्रवण जिल्हा म्हणून जाहीर करावा अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केली आहे. नवे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्यासमोर शपथ घेतल्यानंतर काही तासातच हा प्रस्ताव येऊन पडला. त्यामुळे त्यांना पटकन या प्रस्तावाला प्रतिसाद देता आला नाही. पण रामदास आठवले यांची मागणी अगदीच निराधार आणि अप्रस्तुत नाही. कारण नगर जिल्ह्यात आश्‍चर्य वाटावे इतक्या संख्येने दलितावर अत्याचार होत आहेत. असे काही प्रकार घडले की दलित नेत्याने निषेध करायचा आणि सत्ताधार्‍यांनी आश्‍वासने द्यायची. हा नित्याचा प्रकार होऊन बसला आहे. परंतु जवखेडा प्रकरणातील आरोपी अजून सापडत का नाहीत हा प्रश्‍न अस्वस्थ करणारा आहे. आरोपीला अटक झाली की लोकांचा राग थोडासा निवळतो. कारण आता काहीतरी न्याय मिळेल अशी आशा त्यांच्या मनात निर्माण होते. नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारसमोर हे एक आव्हानच आहे. कारण एका बाजूला त्यांचे सरकार सत्तेवर यायची प्रक्रिया चालू होती आणि त्याचवेळी दुसर्‍या बाजूला राज्यातील सामाजिक वातावरणाला कलंक लावणारी ही घटना घडत होती. आता सत्तेवर आल्याबरोबर या हत्यांचा तपास करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी, तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा निर्वाळा दिला आहे. हत्या झालेल्या कुटुंबातील काही व्यक्तींनी हत्येच्या मागे कोणाचा हात असेल या विषयी काही सूचक माहिती दिली आहे आणि त्या माहितीवरून पोलिसांचा तपास सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे. हा तपास सुरू असतानाच पोलिसांनी एक नवीच माहिती समोर आणली. या अत्याचारावरून दलित तरुणांच्या मनात निर्माण झालेल्या असंतोषाचा गैरफायदा घेऊन राज्यात जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न नक्षलवादी कार्यकर्ते करत आहेत. असा सुगावा पोलिसांना लागला आहे. म्हणून त्यांनी आता सर्वांना सावधानतेचे इशारे दिले आहेत. दलित तरुण अशा चिथावणीला बळी पडणार नाहीत आणि एखाद्या घटनेवरून जातीय असंतोष पसरवण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. खैरलांजी प्रकरणातही असा प्रकार झाला होता. मात्र आपण अधिक आक्रमकपणे कोणत्याही घटनेला जातीय वळण देऊन समाजात हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला तर आपलेच नुकसान होते हे त्यांना माहीत आहे. अशा प्रकारची पेटवापेटवी करण्यापेक्षा समाजामध्ये जातीपातीची बंधने ढिली करण्यासाठी समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपल्या समाजात अजूनही जातीय विषमतेची भावना बलवत्तर आहे. दलित समाजातील लोक आपली आर्थिक परिस्थिती सुधरवून ऐटीत राहतात याचा राग काही सवर्णांना येतो. दलितांनी नेहमी लाचारीनेच जगले पाहिजे अशा हिणकस भावना अजूनही समाजाच्या काही वर्गांमध्ये कायम आहे. अशा प्रकारची भावना वाढीस लागून आपली राजकीय पोळी भाजून घेणारे लोकही समाजात असतात आणि ते असा हिंसाचार पेटवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापासून केवळ दलित तरुणानेच नव्हे तर समाजाच्या सगळ्याच वर्गांनी दूर राहण्याची गरज आहे.

Leave a Comment