अपयशातूनही शिकता येते

sucess
नवा उद्योग उभारताना आपल्याला काही सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात. त्यांच्यापासून काही तरी शिकून आपल्यालाही आपला स्वत:चा काही धंदा उभारण्याची प्रेरणा मिळू शकते. म्हणून अनेक नियतकालिकांत आणि दैनिकांत अनेक सक्सेस कथा दिलेल्या असतात. पण उद्योगाच्या क्षेत्रात सक्सेस स्टोरीज सोबत काही अनसक्सेस स्टोरीजही असतात. किंबहुना यशोगाथांपेक्षा अपयशोगाथाच जास्त असतात. या क्षेत्रात असे मानले जाते की, नवा धंदा सुरू करण्याचा प्रयत्न करणारांत ९० टक्के लोकांचे धंदे ते सुरू झाल्यानंतरच्या तीन वर्षात बंद पडलेले असतात. अर्थात ते बंद पडले असले तरीही त्यापासून बरेच काही शिकता येते. अशा अपयशामागे काही चुका असतात आणि अपयश आले असले तरीही काही चांगल्या गोष्टीही त्यांनी केलेल्या असतात. त्यांची प्रत्येक गोष्ट ही चुकीचीच असते असे काही नाही. अपयश आलेल्या उद्योगांच्या अपयशातून धडा घेऊन काय शिकता येते पाहिले पाहिजे.

प्रदिप गोयल यांनी स्कूल जेनी हे पोर्टल सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला. त्यांनी आपली ही अपयश कथा सांगितली असून तिच्यातून आपण सर्वांनी काय शिकले पाहिजे हेही सांगितले आहे. त्यांनी हा उपक्रम २०१३ साली सुरू केला आणि २०१४ साली बंदही केला. पालकांना आपल्या मुलांना कोणत्या शाळेत घालावे याबाबत बराच संभ्रम असतो. म्हणून सगळया शाळांची माहिती देणारे हे पोर्टल होते. मग ते बंद का पडले?

पालकांना या बाबतीत संभ्रम असतो हे आपल्याला माहीत होते पण तरीही या कल्पनेचा मार्केट सर्वे करायला हवा होता. पण तो न करताच उपक्रम सुरू करण्यात आला. नंतर असे लक्षात आले की, पालकांना ही माहिती हवी असते पण, ती वर्षात कधीही हवी असते असे नाही. पालक शाळांच्या प्रवेशाच्या काळात म्हणजे मे जूनमध्येच अशा पोर्टलला व्हिजिट करीत असतात. आपण तर हा मुद्दा विचारातच घेतला नव्हता.

अशा रितीने हा उपक्रम सुरू केला. त्यात ग्राहकांच्या गरजा काय आहेत याचा फार तपशीलाने विचार केला नाही. पण त्या अर्धवट माहितीच्या आधारावर परिपूर्ण पोर्टल तयार करण्याचा अट्टाहास केला. त्यात वेळ तर गेलाच पण गरजा विचारात घेतल्या नसल्याने जे काही तयार केले ते परिपूर्ण नव्हते. त्यामुळे ते जेव्हा लॉंच केले तेव्हा ते लोकांच्या फार उपयोगाचे नाही हे लक्षात आले. याचा अर्थ असा की, पोर्टल तयार करताना ते आधीच परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. जसे जमेल तसे तयार करा आणि त्याला मिळणार्‍या प्रतिसादावरून लोकांना नेमके काय हवे आहे हे जाणून घ्या. त्या आधारावर त्याला परिपूर्ण करा. त्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक होईल आणि त्याची परिपूर्णता गरजांवर आधारलेली असल्याने ते अधिक उपयुक्त ठरेल.

स्पर्धेचा विचार करा पण स्पर्धकांची नक्कल करू नका. या पोर्टलला हा धडा मिळाला कारण त्यांनी आपले स्पर्धक काय विकत आहेत हे पाहिले, त्यांचेच कर्मचारी फोडून घेतले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुरूवात केली. खरे तर तसे न करता. आपला असा एक ठसा निर्माण करायला हवा होता. त्यालाच मार्केटिंगच्या क्षेत्रात यूएसपी ( युनिक सेलिंग पॉइंट) असे म्हणतात. तो विकसित केला पाहिजे. त्याला वेळ लागेल पण ते आपले खास वैशिष्ट्य असते. केवळ याच पोर्टलच्या संचालकांनी नाही तर अनेकांनी अनेक वेळा केलेली एक चूक म्हणजे धंदा चांगला चालायला लागण्याच्या आतच आलिशान ऑफिस, फर्निचर, सजावट यावर हजारो रुपयांचा अनुत्पादक खर्च करणे. चांगल्या कार्यालयाचा रुबाब असतो आणि त्यावर ग्राहक अवलंबून असते पण ते दुकानाला गरजेचे असते. पोर्टलच्या ऑफिसला हे खर्च करण्याची काय गरज ? त्याऐवजी आपले सॉफ्ट वेअर वेगवान कसे होईल यावर ही गुंतवणूक करायला हवी होती.

आपल्या कंपनीच्या वाढीचे कसलेही नियोजन केले नव्हते. त्यामुळे आगामी पाच वर्षात आपण कोठे असणार आणि त्यासाठी आता कोठे असायला हवे याचे काही गणितच जमत नव्हते. एकंदरित लांब पल्ल्याचा दृष्टीकोन नव्हता. आम्ही याबाबत अशा लोकांचा सल्ला घेतला की ज्यांना या कामाची कसलीच कल्पना नव्हती. त्यामुळेही आम्हाला तोटा सहन करावा लागला. अशा वेळी याच कामात काही तरी केलेल्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरूवात करताना प्रयेक बाब विलंबाने ठरायला लागली. निर्णयातला विलंब हा प्रकार केवळ आपल्यालाच नाही तर आधीच नेमून ठेवलेल्या कर्मचार्‍यांच्याही मनस्थितीवर परिणाम करीत असतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धंदा सुरू करण्याच्या सुरूवातीच्या टप्प्यावरच आपल्याला वारंवार हिताचा सल्ला देईल आणि आपल्या योजना तयार करील असा ज्येष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सोबत घेतला पाहिजे. अशा मॅनेजमेंट गुरू मुळे आपल्या धंद्याच्या उभारणीतले किती तरी खर्च वाचतात. दिशा सापडते आणि कंपनी फायद्यात चालते.

Leave a Comment