असे आहे मोदींचे कार्यालय

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाधिकारशाहीवादी आहेत अशी त्यांच्यावर टीका होते. परंतु अजून तरी त्यांचा कारभार नेमका कसा आहे याचा निश्‍चित अंदाज आलेला नाही. त्यांच्या डोळ्यासमोर हुकूमशाही नसली तरी केंद्र सरकारच्या सगळ्या कारभारावर आणि सगळ्या खात्यांच्या निर्णयावर पंतप्रधान कार्यालयाचे नियंत्रण असावे निदान या कार्यालयाला सगळ्या खात्याचे निर्णय माहीत असावेत अशी त्यांची कल्पना असावी असे वाटते. विविध खात्यांना मंत्री असतील परंतु त्यांनी निर्णय कसे घ्यावेत याची एक निश्‍चित दिशा मोदींच्या मनात आहे आणि त्या दिशेने कारभार होत आहे की नाही यावर ते नजर ठेवून असतात. ही गोष्ट पंतप्रधानाच्या कार्यालयाच्या रचनेवरून उघड झाली आहे. केंद्राच्या कार्यपध्दतीमध्ये पंतप्रधान कार्यालय एक स्वतंत्र कार्यालय असते आणि त्या कार्यालयाचा कार्यभार एका राज्यमंत्र्यांच्या हातात असतो. हे कार्यालय किती महत्त्वाचे असते हे त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या संख्येवरून ठरते. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयात ३५६ कर्मचारी आहेत.

या ३५६ पैकी ६४ अधिकारी मोदी यांचे स्वीय सहाय्यक आहेत. आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाने एवढ्या मोठ्या संख्येने स्वीय सहाय्यक नेमलेले नव्हते. अगदी अलीकडच्या काळातील पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे ११ स्वीय सहाय्यक होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वीय सहाय्यकांची संख्या १२ होती तर एच. डी. देवेगौडा यांना केवळ २ स्वीय सहाय्यक होते. नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ लहान आहे. त्यांनी केंद्रातल्या काही खात्यांचे विलिनीकरण करून खात्यांची संख्या कमी केली आहे आणि मंत्र्यांची संख्याही कमी केली आहे. पण एका बाजूला मंत्र्यांची संख्या कमी करताना पंतप्रधानांचे कार्यालय मात्र त्यांनी मोठे केले आहे. मंत्र्यांची संख्या कमी ठेवण्यामागे नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळावर आपले नियंत्रण असावे हा हेतू आहे आणि असे नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे त्यांनी आपल्या कार्यालयात मात्र अधिकार्‍यांची संख्या वाढवलेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वीय सहाय्यकांमध्ये दोन व्यक्तीगत सचिव आहेत. एक जनसंपर्क अधिकारी आहे आणि चौघे विशेष कार्य अधिकारी आहेत. या चौघांकडे चार जबाबदार्‍या सोपवलेल्या आहेत. त्यातला एकजण केवळ संशोधन आणि धोरण हा विभाग सांभाळतो. त्यातल्या एका िवशेष कार्य अधिकार्‍याकडे माहिती तंत्रज्ञानाचा कार्यभार सोपवलेला आहे. तो विशेष कार्य अधिकारी पंतप्रधानांना केवळ माहिती तंत्रज्ञानाचा सल्ला देत असतो. तिसरा विशेष कार्य अधिकारी नियुक्त्या आणि दौरे हाच विषय हाताळतो.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीय सहाय्यकांमध्ये चौथा विशेष कार्य अधिकारी एका वेगळ्या कामासाठी नेमलेला आहे. ते काम म्हणजे ज्ञान आणि नवोपक्रम. अशा प्रकारचा विशेष कार्य अधिकारी आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी नेमलेला नाही. आता स्वीय सहाय्यकांमध्ये एक स्वीय सहाय्यक केवळ माहिती अधिकारी म्हणून काम करतो. शिवाय तीन ज्येष्ठ मुख्य स्वीय सचिव आहेत. एक मुख्य खाजगी सचिव आहे. एक अप्पर सचिव आणि चार कार्यकारी सहाय्यक आहेत. दोघे विभागीय अधिकारी आणि सात खाजगी सचिव नेमलेले आहेत. शिवाय तीन सहाय्यक, नऊ स्वीय सहाय्यक आणि एक हिंदी अनुवादक आहे. हे सगळे कर्मचारी अप्पर सचिव किंवा मुख्य सचिव या दर्जाचे आहेत. या व्यतिरिक्त चार ड्रायव्हर्स, तीन कनिष्ठ श्रेणी लिपिक आणि एक लघुलेखक त्यांच्या दिमतीला असतो. पंतप्रधानांच्या या गोतावळ्यात सोळा चपराशी आहेत आणि एक सहाय्यक आहे. एवढे या पंतप्रधानांचे कार्यालय माणसांनी भरलेले आहे. नरेंद्र मोदी यांना सगळ्या कारभारावर सगळ्या ठेवण्याची किती तीव्र इच्छा आहे हे यावरून दिसून येते.

त्यांच्या कार्यालयामध्ये ३५६ कर्मचारी असले तरी त्यातले ३४ अधिकारी इतके व्यापक अधिकार असणारे आहेत की ते ३४ लोकच केंद्र सरकार चालवतात असे वाटावे. विशेष या ३४ पैकी केवळ दोघेच गुजरात केडरचे अधिकारी आहेत आणि एक सेवा निवृत्त आयएएस अधिकारी मोदींनी गुजरातमधून आणलेला आहे. या सगळ्या नियुक्त्यांच्याबाबतीत आणि रचनांच्या बाबतीत कमालीची गोपनियता पाळली जाते. नरेंद्र मोदी यांनी सारा देश स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली असली तरी त्यांच्या कार्यालयात मात्र पाच सफाई कामगार आहेत. पंतप्रधानांच्या या ३४ अधिकार्‍यांमध्ये तिघे महिला आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये ५२५ लोकांना नेमता येते. तेवढ्या जागा मंजूर आहेत. परंतु २०११ ते २०१३ या कालावधीत केवळ ४०७ जागा भरल्या गेल्या. मनमोहनसिंग यांच्या कालावधीत शेवटी शेवटी ही संख्या ३८५ पर्यंत गेली होती. त्या तुलनेत मोदींच्या कार्यालयाची ३५६ ही संख्या कमीच आहे असा नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे. तो एकवेळ मानला तरी मोदींच्या स्वीय सहाय्यकांची ३४ ही संख्या मोठी बोलकी ठरणारी आहे.

Leave a Comment