नव्या मुख्यमंत्र्यांपुढील आव्हाने

devendra
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्र फडणवीस यांची निवड सर्वानुमते झाली असली आणि ती स्वागतार्ह असली तरीही ती जेवढी स्वागतार्ह आहे तेवढीच अधिक आव्हाने त्यांच्यासमोर उभी राहणार आहेत. खरे म्हणजे सगळ्यात मोठे आव्हान बहुमताचे आहे. कारण हे सरकार अल्पमतातले आहे. आपले बहुमत शिवसेनेला सोबत घेऊन सिद्ध करावे की, राष्ट्रवादीच्या बाहेरच्या पाठींब्याने सिद्ध करावे असा तिढा मुख्यमंत्र्यांच्या समोर उभा आहे. खरे म्हणजे शिवसेनेला सोबत घेण्यात कमी आव्हान आहे, पण त्यात एक धोका आहे आणि तो शिवसेनेच्या मनोवृत्तीचा आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे परिपक्व नाहीत ही अडचण आहे. पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे घटक पक्ष ३५ वर्षे एकत्र नांदले होते. त्यातल्या कोणत्याही एका पक्षाने आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे तिथे घटक पक्षात कसलीही चढाओढ नव्हती. तशी शिवसेना या युतीमध्ये सुखाने नांदली आणि महाराष्ट्राला सुशासन देण्याच्या एकाच उदात्त हेतूने कार्यरत राहिली तर युती सुखाने नांदणार आहे. परंतु शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंचे कान भरतात आणि तेही जो सांगेल त्याचा सल्ला मानून आपण भाजपापेक्षा मोठे आहोत हे सातत्याने सिद्ध करण्याचा खटाटोप करतात.

या खटाटोपामागे एक प्रकारचा न्यूनगंड दडलेला आहे. भारतीय जनता पार्टी आपल्याला दडपून टाकणार या भीतीपोटी शिवसेनेच्या अशा हालचाली होत असतात. त्यांना जर खरोखर ही भीती वाटत असेल तर त्यांनी भाजपाशी पूर्ण फारकत घ्यावी आणि एक वेगळा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उभे राहण्याचा प्रयत्न करावा. पण तीही हिंमत होत नाही आणि अशा संभ्रमात असलेली शिवसेना ही नव्या मुख्यमंत्र्यांसमोरची समस्या आहे. नवे मुख्यमंत्री निवडले गेले की त्यांची जुन्या म्हणजे मावळत्या मुख्यमंत्र्यांशी अभावितपणेच तुलना होते. आता तशी होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ हाताचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी केवळ आपलेच हात स्वच्छ ठेवले होते. भ्रष्ट हातांना शिक्षा सुनावण्याचे धाडस त्यांनी केले नव्हते. स्वत: भ्रष्टाचार केला नाही पण इतरांचा भ्रष्टाचार उघड्या डोळ्यांनी पाहिला. हातात भ्रष्टाचार निर्मूलनाचे अधिकार असतानाही ते अधिकार न वापरणे आणि भ्रष्टाचारावर पांघरूण घालणे हे वर्तन भ्रष्टपणाचेच आहे. फडणवीस हेही स्वच्छ आहेत. पण त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे स्वच्छपणा स्वत:पुरता न ठेवता तो व्यापक केला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण हे पक्षश्रेष्ठींच्या इशार्‍यावर नाचणारे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठींच्याच सांगण्यावरून भ्रष्टाचार डोळ्यांनी पाहूनही गप्प बसावे लागले, तशी अवस्था फडणवीस यांची होऊ नये अन्यथा त्यांना महाराष्ट्राला पारदर्शक प्रशासन देता येणार नाही.

फडणवीस हे तरुण आहेत. त्यांना मंत्रिपदाचा अनुभव नसतानाही मुख्यमंत्री करण्यात आले आहे असा आक्षेप काही लोक घेत आहेत. कोणालाही मुख्यमंत्री करताना त्याला मंत्रीपदाचा अनुभव आहे का हे पाहिलेच पाहिजे पण आपण हे विसरत आहोत की फडणवीस हे नागपूरचे महापौर होेते. आपल्या देशात मोठ्या शहरांच्या महापौरांना प्रशासनाचा चांगला अनुभव येत असतो पण तो अनुभव मंत्रिपदासाठी पात्रता म्हणून का गृहित धरला जात नाही असा प्रश्‍न पडतो. नागपूर ही काही लहान महापालिका नाही. तिचे बजेट एखाद्या छोट्या राज्याएवढे आहे. त्यांनी महापौर म्हणून चांगले काम केले आहेच पण विरोधी नेता म्हणून विधानसभेत आपल्या अभ्यासूपणाची चुणूक दाखवली आहे. नरेन्द्र मोदी आणि अमित शहा यांची पसंती देवेन्द्र हीच आहे. कारण याह दोघांना प्रशासनाला जे आधुनिक आणि डिजिटल स्वरूप देऊन प्रशासनातल्या भ्रष्टाचाराचे निर्मुलन करायचे आहे ते स्वरूप देण्याची क्षमता फडणवीस यांच्यातच आहे असे या दोघांना वाटले. राज्यातल्या भाजपा आमदारांनाही तसाच विश्‍वास वाटला.

फडणवीस ही मोदी आणि अमित शहा यांची निवड आहे असे म्हटले जाताच काही हितशत्रूंनी ते या दोघा नेत्यांच्या हातचे बाहुले बनून काम करणार असा प्रचार सुरू केला आहे. फडणवीस यांनी अजून शपथही घेतलेली नाही. अजून त्यांचा कारभारही सुरू झालेला नाही. अजून त्यांनी आपल्या या नव्या अधिकारात एखादाही निर्णय घेतलेला नाही. पण त्याच्या आतच अशी कुचाळकी सुरू झाली आहे. यामागचा हेतू चांगला नाही. बाहुले सरकार नेमणे ही कॉंग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कधी सुखाने कारभार करू शकत नाहीत. ते आपल्या खुर्चीत बसतात न बसतात तोच त्यांच्या पक्षातल्या विरोधकांकडून श्रेष्ठींकडे कागाळ्या सुरू होतात. मग श्रेष्ठी त्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीस पाचारण करतात आणि तिथे त्यांना आपल्या दारात तिष्ठत बसायला लावतात. आपल्या लेखी मुख्यमंत्री म्हणजे किस झाड की पत्ती हे दाखवण्याचा कॉंग्रेस श्रेष्ठींचा हेतू असतो. नरेन्द्र मोदी यांना पंतप्रधान होऊन पाच महिने झाले आहेत, अनेक राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मोदी यांनी अशी कॉंग्रेस स्टाईल वागणूक कधीच दिलेली नाही. मोदी यांना आपल्या मुख्यमंत्र्यांनी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे काम करू नये असे वाटते. म्हणूनच कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या कामात पंतप्रधानांचा हस्तक्षेप झाला असल्याचे एकही उदाहरण झालेले नाही. देवेन्द्र फडणवीस यांनीही आता आपल्या कल्पनेप्रमाणे काम करून आपल्या हुशारीची झलक दाखवली पाहिजे. त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्यात पाण्याचे, शेतीचे आणि शिक्षणाचे अनेक जटील प्रश्‍न आहेत. ते मोठ्या कौशल्याने सोडवावे लागणार आहेत.

Leave a Comment