काळ्या पैशाचे वास्तव

black-money
भारतातले २५ लाख कोटी रुपये परदेशात ठेवण्यात आले आहेत आणि ते परत आणले की, प्रत्येकाला पाच लाख रुपये मिळणार आहेत असे रामदेवबाबांनी सांगितले होते. माणसाला फुकटचा आणि कष्टाविना पैसा मिळणार म्हटले की भुरळ पडते. तसे आश्‍वासन देणारा कोण आहे आणि तो ते पैसे खरेच देणार आहे का याचा विचार कोणी करीत नाहीत. तशीच लोकांना त्या पाच लाख रुपयांची भुरळ पडली. पण आता हे काम तसे सोपे तर नाहीच पण हे सारे काळ्या पैशाचे प्रकरण विलक्षण गुंतागुंतीचे आहे ही बाब आता लक्षात आली आहे. काळा पैसा लवकरच भारतात परत आणला जाईल अशा कल्पनेत असलेल्या लोकांना आता या प्रश्‍नाची खरी गुंतागुंत कळायला लागली आहे आणि हे काम म्हणावे तसे सरळ, सोपे आणि गोष्टीत सांगितल्यासारखे नाही. हे सत्य समजून यायला लागले आहे. २००९ साली भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुरूवातीला हा विषय उपस्थित केला. तेव्हापासून या प्रश्‍नाची खरी कायदेशीर बाजू काय आहे याच्याबाबतीत लोकांचे खरे प्रबोधन झालेच नाही. परिणामी, आपण या पैशाच्या बाबतीत वरवरच्या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढले आणि त्यावरून आपली काही समजूत झाली.

आपण जोपर्यंत त्या काळ्या पैशाच्या साठ्यापर्यंत पोहोचलो नव्हतो तोपर्यंत आपल्याला आपल्या समजुतीनुसार काहीही बोलणे सोपे होते. परंतु काळ्या पैसा जमा करणे, परदेशी बँकेत खाते उघडणे त्याचबरोबर हा पैसा उघड करून भारतात परत आणणे या गोष्टी कायद्याच्या कक्षेत बसणार्‍या आहेत आणि ते कायदे एवढे किचकट आहेत की आता या पैशाबाबत चर्चा करणार्‍यांनासुध्दा नेमके काय चालले आहे हे कळेनासे झाले आहे. भारताचा कित्येक कोटी रुपये इतका काळा पैसा काही लोकांनी परदेशी बँकांत नेऊन ठेवला आहे आणि त्यामुळे भारत देश गरीब झाला आहे, सरकारने अशा लोकांवर कारवाई करावी आणि मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन जाऊन तो पैसा परत आणावा, तो देशातल्या गरीब लोकांना समान वाटून टाकावा, त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला पाच लाख रुपये येतील असे रामदेवबाबांचे म्हणणे होते. त्यांनी हा आकडा कोठून काढला आणि हा पैसा आणण्यात किती अडचणी आहेत याची रामदेव बाबांना काहीही माहिती नाही. रामदेवबाबा हे अर्थ तज्ज्ञही नाहीत आणि कायदेतज्ज्ञही नाहीत. परंतु त्यांनी सांगितलेल्या आकड्यांचा मोह लोकांना पडला आणि आता हे प्रकरण किती किचकटआहे हे लक्षात आल्यावर काळ्या पैशाचा हा ऍटमबॉम्ब किती फुसका आहे हे लक्षात यायला लागले आहे.

काळ्या पैशाच्या विषयाचे असे रामदेवबाबांनी जनरलायझेशन केले आणि सस्ती प्रसिध्दी मिळवली. परंतु त्यांना ते सोपे गेले. त्यावर त्यांना कोणी जाब विचारला नाही. म्हणून त्यांनी ठोकून देतो ऐसा जे या न्यायाने बर्‍याच गोष्टी बोलून टाकल्या. हा काळा पैसा परत आणणे सोपे आहे पण सरकार तसे करीत नाही कारण या सरकारात बसलेल्या लोकांचेच हे पैसे आहेत असा प्रचार करणे तर त्यांना काहीच अवघड गेले नाही कारण निवडणुकीच्या मैदानात एकमेकांवर आरोप करताना काही पुरावे द्यावेत असा प्रघात नाही. बाबांच्या अशा प्रचाराने जनतेत सरकारच्या विरोधात असंतोष पसरत आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे हे भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात आले आणि त्यांनीही बाबांच्या सुरात सूर मिसळून दिला. त्याचा लाभ भाजपाला झाला. पण आता या काळ्या पैशाची वस्तुस्थिती समोर येत आहे आणि भाजपाच्या नेत्यांना सरकार म्हणून ती स्वीकारावी लागत आहे. आता मात्र रामदेवबाबा एक चकार शब्दही बोलत नाहीत.

सर्वोच्च न्यायालयात हा पैसा नेऊन ठेवणार्‍यांची नावे जाहीर करण्याचा प्रश्‍न आला. भारतीय जनता पार्टी तर ही नावे जाहीर करायला उत्सुकच असणार असे सर्वांना वाटले होते. पण भाजपा सरकारने ती नावे जाहीर करण्यास नकार दिला. आता या मागे नेमके कारण काय असा प्रश्‍न अनेकांना पडला. कॉंग्रेसचे सरकार ही नावे जाहीर करत नव्हते कारण त्यांचेच पैसे परदेशात आहेत असा लोकांचा समज झाला होता. मग आता भाजपचे सरकारही ही नावे जाहीर करत नाही तेव्हा भाजपाच्या नेत्यांचेच पैसे परदेशात आहेत की काय असा प्रश्‍न अनेकांना पडला. असे असेल तर ही नावे कधीच उघड होणार नाहीत असा लोकांचा समज झाला. या संबंधातल्या ज्या गुंतागुंती समोर येत आहेत त्यानुसार झालेली काही माहिती सोप्या शब्दात सांगायची तर असे म्हणावे लागेल की परदेशात पैसे ठेवणे हा गुन्हा नाही. भारतातले अनेक लोक परदेशात व्यापार करतात तेव्हा त्यांना परदेशी बँकांत पैसे ठेवणे आवश्यकच असते. पण या प्रश्‍नावर सवंगपणे बोलणार्‍यांनी ही वस्तुस्थिती लोकांना कधी सांगितलीच नाही. या पैसे ठेवणार्‍यांपैकी कोणी करचोरी करून पैसे ठेवले असतील तर मात्र तो अपराध ठरतो. या अपराधाबद्दल त्यांच्यावर खटला भरला गेला तरच त्या निमित्ताने त्यांचे नाव जाहीर होईल आणि त्यांच्यावरचा खटला त्यांच्याविरुध्द गेला तर त्यांना भारतात शिक्षा होऊ शकेल. आपण नेहमी परदेशी बँका म्हटल्या बरोबर स्वीस बँकांचा उल्लेख करतो. पण भारतीयांचे पैसे अनेक देशातल्या बँकांत आहेत आणि त्या देशातले कायदे भारतापेक्षा वेगळे आहेत. तेव्हा करचोरी करून पैसे ठेवणार्‍यांना भारतात शिक्षा झाली तरी त्या देशात तो अपराध ठरत नाही. त्यामुळे त्याला भारतात शिक्षा होईल, तो तुरुंगात जाईल, त्याची भारतातली मालमत्ता जप्त होईल पण त्याचे परदेशातले पैसे परत आणता येतीलच असे नाही. इतक्या ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत.

Leave a Comment