
पुणे – आता राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याच्या चौकशीची कुऱ्हाड काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर कोसळली आहे. बँकेचे तत्कालीन संचालक अजित पवार यांच्यासह ५० संचालकांविरुद्ध दीड हजार कोटींच्या या घोटाळ्याप्रकरणी वैयक्तिक चौकशीच्या नोटिसा काढण्यात आल्यामुळे सत्ता जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मानगुटीवर चौकशीचे भूत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नोटिसीला १५ दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे.
आता अजित पवारांच्या मानगुटीवर चौकशीचे भूत!
अपर निबंधक शिवाजी पहिनकर यांची घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमणूक झाली होती. तत्कालीन संचालक मंडळाला प्राथमिक चौकशीत बँकेच्या दीड हजार कोटींच्या तोट्यासाठी दोषी धरण्यात आले होते. पण राज्यात आघाडीचे सरकार असल्याने आजवर कार्यवाही होऊ शकली नव्हती. पण आता राज्यात सत्ताबदलाची चाहूल लागताच सहकार विभागाने वेगाने पावले उचलली असून दोषी संचालकांविरुद्ध नियम ८८ अंतर्गत वैयक्तिक चौकशी लावण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे साखर कारखाने, सुत गिरण्यांना बँकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्यामुळे बँकेचे शेकडो कोटींचे नुकसान झाले. पण सत्ताधारी तेच, संचालकही तेच आणि कर्जदार संस्था त्यांच्याच अशी स्थिती असल्याने अनेक वर्षांत बँकेतील गैरकारभाराला तोंड फुटले नव्हते.
