मोदींचे मिशन काश्मीर

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे एक वैशिष्ट्य असे की, ते नेहमी लो एम इज क्राईम असे म्हणत असतात. आपल्याला काय साध्य होईल की न होईल याचा कंजुषीने विचार न करता आपले ध्येय उच्च प्रतीचे ठेवले पाहिजे. उच्च प्रतीचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करायला काही पैसे पडत नाहीत. मग ध्येय समोर ठेवायचेच आहे तर ते लहान-सहान कशाला ठेवायचे? लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला १२० जागा मिळतील की १६० जागा मिळतील यावर राजकीय पंडितांची गणिते मांडली जात होती. त्या काळात नरेंद्र मोदी भारतातल्या जनतेकडे ३०० जागा मागत होते. भाजपाचे नेते सुद्धा नरेंद्र मोदींना सबुरीचा सल्ला देत होते आणि जनतेकडे जागा मागताना अतीशयोक्ती करू नये असे बजावत होते. पण मोदींनी ३०० जागा मागितल्या आणि जनतेने ३१५ जागा दिल्या. नरेंद्र मोदी यांनी १५० जागांचे ध्येय ठेवले असते, तेवढ्याच जागा मिळविण्याची योजना आखली असती आणि तेवढ्याच जागा लढवल्या असत्या तर त्यांना ३१५ जागा मिळणे शक्य होते का? कोणताही व्यवहारी माणूस त्यांच्या ध्येयावर आधी हसला असता पण ध्येयपूर्ती झाल्यानंतर मोदी हसले.

जम्मू-काश्मीर हे मुस्लीम बहुसंख्यकांचे राज्य आहे. गेल्या ६५ वर्षात तिथे कधी हिंदू मुख्यमंत्री झालेला नाही आणि हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या पक्षाला तिथे विधानसभेच्या ८७ जागांपैकी दोन आकडी संख्या सुद्धा कधी गाठता आलेली नाही. आजवरच्या भाजपाच्या नेत्यांनी जम्मू-काश्मीर हे आपले वर्चस्व असलेले राज्य होऊ शकेल अशी कधी कल्पनाही केलेली नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी मात्र जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या हाती सत्ता यावी असे धाडसी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. ते सकृतदर्शनी वेडेपणाचे वाटेल, पण तो नरेंद्र मोदी यांच्या धाडसी राजकारणाचा एक भाग आहे. झारखंड आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. तिथे पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरला मतदानाची पहिली फेरी होईल आणि डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात निवडणुकीचा धिंगाणा संपून २० डिसेंबरला शेवटचे मतदान होईल. २३ तारखेला मतमोजणी होऊन या दोन राज्याचे भवितव्य निश्‍चित होईल. आता या दोन राज्यांकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. सध्या कोणत्याही विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की, सर्वांच्या मनामध्ये एकच प्र्रश्‍न येतो की, या निवडणुकीत मोदी काय करणार? लोकसभेच्या निवडणुकीत दिसलेली मोदींची जादू या विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार का? या प्रश्‍नांची उत्तरे या दोन राज्यांच्या संदर्भात वेगळी आहेत.

झारखंड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि जम्मू-काश्मीर हे राज्य भाजपाच्या बाबतीत दुष्काळी राज्य आहे. तिथे भाजपाची ताकद एवढी कमी आहे की, कोणताही भाजपाचा नेता जम्मू-काश्मीरवर राज्य करण्याचे स्वप्न सुद्धा पाहू शकणार नाही. अशी भिन्न स्थिती असूनही नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दुकलीने या दोन्ही राज्यांमध्ये स्वबळावर भाजपाचे सरकार स्थापन व्हावे एवढी ताकद मिळविण्याचा पण केला आहे. त्यादृष्टीने दोघांनीही मोठे क्षेत्ररक्षण करून ठेवलेले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये ताकद असो की नसो, पण भाजपाच्या या मोठ्या योजनेमुळे तिथली निवडणूक कधी नव्हे एवढी उल्लेखनीय ठरत आहे. झारखंडमध्ये एकेकाळी भाजपाने राज्य केलेले आहे. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यातल्या १४ पैकी १४ जागा भाजपाने जिंकलेल्या होत्या. २००३ आणि २००९ असे दोन वेळा तिथे भाजपाचे सरकार होते. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा तिथे भाजपाने १२ जागा जिंकलेल्या आहेत.

झारखंडमधील ८१ विधानसभा मतदारसंघांपैकी ५६ मतदारसंघात भाजपाला मताधिक्क्य मिळालेले आहे. २३ मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली आहेत. केवळ चार मतदार संघात भाजपा तिसर्‍या क्रमांकावर राहिलेली आहे. ही आकडेवारीच स्पष्ट सांगते की, येत्या विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४१ जागा भाजपाला सहज मिळू शकतात. झारखंडचा काही प्रश्‍न नाही. झारखंडाची निवडणूक हरियानासारखीच एकतर्फी भाजपाच्या बाजूने होणार आहे. पण प्रश्‍न आहे जम्मू-काश्मीरचा. कारण या राज्याच्या काश्मीर खोर्‍यात विधानसभेच्या ४५ जागा आहेत. या जागांवर मुस्लिमांची बहुसंख्या असल्यामुळे तिथून भाजपाचा आमदार निवडून येण्याची शक्यता फारच कमी आहे. विधानसभेच्या ८७ जागांपैकी ४५ जागांवर अशी अवस्था आहे. मग मोदी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा सरकार आणण्याची स्वप्ने कशी पहात आहेत? बहुमतासाठी ४४ जागा आवश्यक आहेत आणि जिथून भाजपाचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा जम्मू भागात एकूण जागा ४२ आहेत. म्हणजे अशक्य असलेली एक गोष्ट शक्य करण्यासाठी मोदी कंबर बांधून उभे आहेत. त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून या राज्यावर लक्ष ठेवलेले आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत जम्मू भागातल्या ४२ जागांपैकी ३७ विधानसभा जागांवर भाजपाला मताधिक्क्य मिळालेले आहे. राज्यातली सत्ताधारी पार्टी म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला लोकसभेच्या सहा पैकी एकही जागा मिळाली नाही. तीन जागा भाजपाला मिळाल्या आणि तीन जागा पीडीपीला मिळाल्या. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांच्या युतीचे सरकार तिथे लोकांच्या मर्जीतून उतरले आहे. त्यामुळे पीडीपीचे सहकार्य घेऊन किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने जम्मू-काश्मीर सर करायचेच असा निर्धार मोदी यांनी केला आहे.

Leave a Comment