झारखंड विकासापासून दूर

jharkhand
झारखंड हे २००० साली अस्तित्वात आलेले छोटे राज्य आहे. नोव्हेंबर २००० मध्ये केंद्रातल्या वाजपेयी सरकारने बिहारचे विभाजन करून झारखंड या छोट्या राज्याची निर्मिती केली. भारतीय जनता पार्टी देशात छोटी राज्ये असावीत या मताची आहे. त्यामुळे २००० साली भाजपाचे सरकार केंद्रात अस्तित्वात असताना त्यांनी बिहारमधून झारखंड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातून छत्तीसगड ही तीन नवी राज्ये निर्माण केली. त्याचवेळी आंध्रातून तेलंगणा आणि महाराष्ट्रातून विदर्भ ही दोन राज्ये वेगळी करता आली असती. परंतु तेलंगण निर्मितीला तेलुगू देसमचा आणि विदर्भ निर्मितीला शिवसेनेचा विरोध होता. हे दोन पक्ष भाजपाचे मित्र पक्ष होते. त्यामुळे त्यांची नाराजी पत्करून ही दोन राज्ये निर्माण करण्याचे धाडस भाजपाने दाखवले नाही. छोटी राज्ये मॅनेेजेबल असतात आणि त्यांचा विकास वेगाने होतो असा भाजपाचा दावा आहे. छत्तीसगड आणि उत्तराखंड यांनी तसा विकास केलेलाही आहे. परंतु झारखंड हे छोटे राज्य मात्र विकासापासून दूर आहे.

हे छोटे राज्य विकास तर करू शकलेले नाहीच, पण छोट्या राज्यांच्या बाबतीत व्यक्त केली जाणारी राजकीय अस्थैर्याची भीती झारखंडमध्ये खरी ठरली आहे. गोवा आणि झारखंडमध्ये सातत्याने सरकारे पडणे आणि मुख्यमंत्री बदलणे अशी खेळ जारी राहिले. कारण अशा छोट्या राज्यांमध्ये विधानसभेच्या सदस्यांची संख्या कमी असते. गोव्यात ३० सदस्यांची विधानसभा आहे. अशा विधानसभेचे स्थैर्य म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे बहुमत हे एखाद्या दुसर्‍या सदस्याच्या मर्जीवर अवलंबून असते आणि त्यामुळे एक-दोन अपक्ष आमदार सुद्धा सरकारवर डोळे वटारू शकतात. गोव्यात असेच झाले. पण प्रदीर्घ काळच्या अस्थैर्यानंतर तिथे भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेवर आली आहे आणि त्यामुळे तिथले राजकीय अस्थैर्याचे पर्व तूर्तास तरी संपुष्टात आल्याचे दिसत आहे. झारखंडमध्ये हे पर्व अजून संपलेले नाही.

झारखंड विधानसभेत ८१ जागा आहेत आणि कोणताही एक पक्ष विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवत नाही असे दिसत आहे. भारतीय जनता पार्टी झारखंडमध्ये ताकदवान आहे, परंतु एक निवडणूक वगळता या पक्षाला कधीही स्पष्ट बहुमताएवढ्या जागा मिळालेल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या खालोखाल तिथे झारखंड मुक्ती मोर्चाची ताकद आहे. सध्या झारखंड विधानसभेत भाजपाचे १७ आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे १५ आमदार आहेत. कॉंग्रेसचे १२ आमदार या सदनात आहेत. त्याशिवाय लालूप्रसादांचा राजद पक्ष (५), जनता दल यू (२), झारखंड विकास मोर्चा (६), तृणमूल कॉंग्रेस (२) आणि ऑल झारखंड स्टुडंटस् युनियन (६) एवढ्या पक्षांची गर्दी तिथे झालेली आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि अनेक पक्षांची गर्दी यातून अस्थैर्याशिवाय दुसरे काय निर्माण होणार? स्थापनेपासूनच्या १३ वर्षात या राज्यात १२ मुख्यमंत्री होऊन गेले. तूर्त या राज्यात कॉंग्रेस आणि झामुमो या पक्षांचे अन्य तीन-चार पक्षांच्या पाठींब्यावर उभे राहिलेले सरकार सत्तेवर आहे. झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने कधी भाजपाची मदत घेऊन तर कधी कॉंग्रेसची मदत घेऊन सातत्याने सत्ता मिळवली आहे. खरे म्हणजे भाजपा आणि झामुमो यांची युती झाल्यास केवळ या युतीचे स्थिर सरकार तिथे येऊ शकते आणि राज्याला स्थैर्य मिळून प्रगती करता येते.

असे असले तरी भाजपा आणि झामुमो यांची युतीच अस्थिर आहे. त्यामुळे स्थैर्य लाभत नाही. काही काही वेळा बहुमतासाठी एक-दोन आमदारांचेही पाठबळ निर्णायक ठरू शकते. त्याचा फायदा घेऊन काही अपक्ष आमदारांनी सातत्याने सौदेबाजी करून सत्ताधारी पक्षाला आणि सरकारला वेठीस धरलेले आहे. त्यांचा पाठींबा एवढा निर्णायक असतो की, तो न मिळाल्यास सरकारच बनत नाही. त्यामुळे सत्तेवर येऊ पाहणार्‍या आघाडीला या सौदेबाज आमदारांच्या कसल्याही मागण्या मान्यच कराव्या लागतात. एकदा कॉंग्रेस-झामुमो यांचे सरकार बहुमतासाठी एका सदस्यावर अवलंबून होते. त्या सदस्याने आपल्याला मुख्यमंत्री केले तरच पाठींबा देऊ अशी विचित्र अट घातली आणि त्या एका अपक्षाला केवळ सरकार बनावे म्हणून मुख्यमंत्री करावे लागले. हा आमदार म्हणजे मधु कोडा. हा आधी भाजपात होता, परंतु त्याने लोह खाणींमध्ये खूप पैसा कमावला आणि नंतर तो बाहेर पडून पैशाच्या जोरावर सौदेबाजीचे राजकारण करायला लागला. या राज्यात भाजपाला मागेच स्थिर सरकार देता आले असते. परंतु या पक्षाच्या श्रेष्ठींनी बाबुलाल मरांडी या आदिवासी नेत्याचे महत्व उगाच वाढवून ठेवले. उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांचे जे झाले तेच मरांडीचे झाले. त्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आणि येडीयूरप्पा प्रमाणेच तेही राज्यातला पक्ष म्हणजे आपणच अशा आविर्भावात वावरायला लागले. परिणामी ते पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी झारखंड विकास मोर्चा हा स्वत:चा पक्ष काढला. त्याचा फटका भाजपाला बसला आणि त्यामुळे भाजपाचा झारखंडच्या राजकारणातला वरचष्मा संपला. आता नव्या वातावरणात आणि मोदींच्या प्रभावाखाली तो पुन्हा निर्माण होईल की काय अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment