गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणार मुख्यमंत्री निवडीची बैठक

rajnath-singh
मुंबई – उद्या भाजप मुख्यमंत्र्याची निवड करणार असून त्यानंतर शपथविधी सोहळा ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री हा नागपूरचाच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून दरम्यान ऑक्टोबरच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये नागपूर-मुंबई विमान प्रवास दरात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

आज वानखेडे स्टेडियमची भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ३१ ऑक्टोबरला भाजपचा राज्यातील पहिला मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली.

पक्षाचे निरीक्षक केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री निवडीसाठीची बैठक उद्या चार वाजता होईल. निवडणूक निकालानंतर पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री निवडीसाठी राजनाथ सिंह आणि नड्डा यांना निरीक्षक नेमले जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हे दोन्ही नेते भाजपच्या मुख्यमंत्री निवडीच्या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत.

Leave a Comment