कॉंग्रेसचे स्थान काय?

congress
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाने १५ वर्षे सत्ता गाजवली. परंतु या काळात या पक्षाने केलेल्या वाईट कारभारामुळे पक्षाचा एवढा दारूण पराभव झाला आहे की राज्यातला पहिल्या क्रमांकाचा हा पक्ष आता तिसर्‍या स्थानावर ढकलला गेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा एक जागा जास्त मिळाल्यामुळे कॉंग्रेसचा तिथे तिसरा तरी क्रमांक आला. ही एक जागा कमी पडली असती तर तो हा क्रमांक चौथा ठरला असता. अन्य राज्यातही कॉंग्रेसची अशीच वाताहत झालेली आहे. कॉंग्रेस हा देशव्यापी संघटना असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. असे वारंवार सांगितले जाते. परंतु आता पक्षाची अवस्था एवढी वाईट झाली आहे की देशाची तीन चतुर्थांश लोकसंख्या ज्या राज्यांत राहते त्या सर्व मोठ्या राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाची एवढी पीछेहाट झाली आहे की तिथे पक्षाला कसाबसा तिसरा क्रमांक मिळाला आहे आणि स्थानिक परिस्थिती अशी भयंकर आहे की पक्ष या अधःपतनातून पुन्हा उभारू शकणार नाही असे कॉंग्रेसचे नेतेच म्हणायला लागले आहेत. गांधी कुटुंबावरचा कॉंग्रेसजनाचा विश्‍वास उडत चालला आहे आणि पक्षात गांधी कुटुंबाच्या विरोधात हळूहळू वातावरण तयार होत आहे.

सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून विक्रमी काळ काढलेला आहे. त्यांच्या या विक्रमी अध्यक्षपदाच्या काळात पक्षाला काही चांगले दिवस बघायला मिळाले. मात्र आता पक्षाची सर्वंकष अवनती झालेली दिसत आहे. अशा काळात पक्षामध्ये नेतृत्वावरून असे उलटसुलट विचार व्यक्त होणे हे साहजिकच आहे. पक्षातला एक गट गांधी कुटुंबाशिवाय पर्याय नाही असे मानणारा आहे. तर एक गट आता नेतृत्वबदल झाला पाहिजे अशा विचाराचा आहे. गांधी कुटुंबाचे समर्थन करणार्‍या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कॉंग्रेसला पुन्हा गांधी कुटुंबच चांगले दिवस दाखवू शकेल अशी आशा वाटत आहे. १९९१ साली गांधी कुटुंबाबाहेरचा पहिला पंतप्रधान कॉंग्रेसने दिला. परंतु हे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९६ सालपर्यंत पंतप्रधान पदावर राहून शेवटी पक्षाला पराभवाच्या खाईत लोटले. १९९६ पासून २००४ सालपर्यंत असे ९ वर्षे कॉंग्रेस सत्ताहीन होती. तिला सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता मिळाली. त्यामुळे सोनिया गांधीच पक्षाला चांगले दिवस दाखवू शकतात अशी कॉंग्रेसजनांची खात्री पटली आणि अनेक कॉंग्रेसजन त्यांच्याकडे आशेने पहात असतात. याउलट पक्षात एक मोठा गट असा संघटित होत आहे की ज्यांना आता कॉंग्रेस पक्ष या घराण्यापासून दूर जाईल तर बरे असे वाटायला लागले आहे. मात्र या दुसर्‍या गटाचा दृष्टिकोन योग्य आहे.

कारण एकेकाळी सोनिया गांधी यांनी पक्षाला केंद्रातली सत्ता मिळवून दिली असली तरी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये पक्षाला जी पीछेहाट झाली आहे ती पीछेहाट सोनिया गांधी पुन्हा भरून काढू शकणार नाहीत असा त्यांचा ग्रह झाला आहे. अर्थात, या मंडळीची ही भावना अगदीच काही निराधार नाही. देशाच्या राजकीय नकाशावर नजर टाकली तर असे दिसून येते की कॉंग्रेसने राजकारणातले आपले स्थान बरेच गमावले आहे. सोनिया गांधी अध्यक्ष होण्याच्या पूर्वीही अनेक राज्यात कॉंग्रेस भूईसपाट झाली होती. तिथे तर सोनिया गांधींनी पक्षाला कसलाही दिलासा दिलेला नाही. जिथे कॉंग्रेस मागे होती तिथे तिला पुढे आणले नाही आणि जिथे पुढे होती तिथे मागे नेले आहे. इतके मागे की अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेस तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. काही छोट्या छोट्या राज्यांमध्ये कॉंग्रेस आता नंबर १ ला आहे. ती राज्ये म्हणजे आसाम, केरळ, कर्नाटक. त्याशिवाय ईशान्य भारतातल्या काही चिमुकल्या राज्यात कॉंग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र जी राज्ये मोठी आणि अधिक लोकसंख्येची आहेत तिथे कॉंग्रेस सोनिया गांधींच्या कृपेने तिसर्‍या क्रमांकावर गेलेली आहे.

तामिळनाडूत १९६७ साली कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करून द्रमुक पक्ष सत्तेवर आला. तेव्हापासून तिथे कॉंग्रेसला कधीच सत्ता प्राप्त करता आली नाही. तिथे द्रमुकमध्ये फूट पडून अण्णाद्रमुक हा पक्ष स्थापन झाला आणि याच दोन पक्षांमध्ये आलटून पालटून सत्ताबदल होत गेला. कॉंग्रेस कायम तिसर्‍या क्रमांकावर राहिला. उत्तर प्रदेशात तर सपा, बसपा, भाजपा आणि कॉंग्रेस अशी पक्षाच्या प्रभावाची क्रमवारी असून कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तिथे जनता दल (ए), भाजपा, लालूप्रसाद यादव यांचा राजद पक्ष आणि कॉंग्रेस अशी तिथेही क्रमवारी असून कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस पहिला, डावी आघाडी दुसरा आणि कॉंग्रेस तिसरा पक्ष आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू त्या मागोमाग आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या सर्व मोठ्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची दुसर्‍या कोणातरी पक्षाबरोबर तिसर्‍या स्थानासाठी लढाई चाललेली आहे. योगायोगाने त्या लढाईत सरशी झाली तर कॉंग्रेसला तिसरा क्रमांक मिळतो. या राज्यांमध्ये कॉंग्रेस पहिल्याच काय दुसर्‍या क्रमांकावरसुध्दा येण्याची स्वप्ने बघू शकत नाही. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात १५ वर्षांपासून कॉंग्रेस सत्तेबाहेर आहे. गुजरातमध्ये तर कॉंग्रेसला १९८० पासून कधीच सत्ता मिळालेली नाही.

Leave a Comment