
नवी दिल्ली : आशियाई फुटबॉल संघटनेच्या हॉल ऑफ फेममध्ये फुटबॉलचा माजी भारतीय कर्णधार वाय्चुंग भुतियाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने केली. आशियाई फुटबॉल संघटनेचे महासचिव डॅटो ऍलेक्स सुसाय यांनी याबाबत पत्र पाठवले असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने नमूद केले.
हॉल ऑफ फेममध्ये वाय्चुंग भुतियाचा समावेश
यंदा दि. ३० नोव्हेंबर रोजी फिलीपाईन्स येथे आशियाई फुटबॉल संघटना आपला ६० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. यानिमित्त आयोजित सोहळय़ात आशियातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंचा गौरवही केला जाणार आहे. भारताच्या वाय्चुंग भुतियाचा यात आवर्जून समावेश असेल, असे डॅटो यांच्या पत्रात म्हटले आहे. भुतियासह आशियातील आणखी ९ दिग्गज खेळाडूंचा यावेळी सन्मान केला जाईल. आशियाई फुटबॉल संघटनेकडून वैयक्तिक पुरस्कार दिले जाण्याची ही पहिलीच वेळ असून असा सन्मान लाभलेला भुतिया हा यंदा एकमेव भारतीय फुटबॉलपटूही ठरला आहे.
