भाजपामध्ये साठमारी

bjp
महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले होते. त्यांच्या नावाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचाही हिरवा कंदील होता. असे सारे समजले जात असतानाच अचानकपणे पक्षात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष उद्भवला आहे. नितीन गडकरी यांचा हत्ती या गर्दीत अचानकपणे घुसला आहे. आपल्याला राज्यात अजिबात रस नाही असे म्हणत म्हणत त्यांनी हळूहळू आपली टोपी या रिंगणात भिरकावून दिली. विदर्भातल्या भाजपा आमदारांमध्ये असलेल्या गडकरी विरुध्द फडणवीस या गटबाजीचे स्वरूप गडकरींच्या या प्रवेशाने अधिकच गडद झाले. गडकरी यांचे या स्पर्धेत उतरणे अगदीच अनपेक्षित नाही परंतु त्याच्या मागे अनेक रंग दिसत आहेत. विशेषतः शरद पवार आणि गडकरी यांचे सख्य असल्यामुळे गडकरी यांच्या या प्रवेशामागे पवारांची खेळी आहे की काय असा संशय यायला लागला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते भ्रष्टाचार्‍यांना माफ करणार नाहीत आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची तड लावली तर आपल्याला ते महागात पडणार आहे. याची जाणीव पवारांना आहे. त्या मानाने नितीन गडकरी यांचा सदरा फडणवीस यांच्यापेक्षा कमी पांढरा आहे.

त्यातूनच पवारांच्या प्रेरणेने गडकरी किंवा पवारांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून गडकरी या मैदानात प्रविष्ट झाले असावेत असे दिसते. महाराष्ट्राच्या भाजपाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे, फडणवीस आणि खडसे हे एका गटात होते. गडकरी यांनी मुंडेंना पर्याय म्हणून विनोद तावडे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आता गडकरी स्वतःच या मैदानात उतरत आहेत असे दिसताच तावडे यांनी त्यांच्या नावाचा निःसंदिग्ध पुरस्कार केला. आता गडकरी यांचे पारडे जड होत आहे असे दिसायला लागताच फडणवीस यांची माघार गृहित धरून एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्री पदावर दावे सांगायला सुरूवात केली आहे. पंकजा मुंडेंच्या दाव्याला ओबीसीचा आधार आहे. तर खडसे यांच्या दाव्याला बहुजन समाज, उत्तर महाराष्ट्र आणि अनुभव या तिन्हींचा आधार आहे. ते असा दावा सांगतील असा अंदाज आधी आला होताच परंतु त्यांना सभापती करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आले. परंतु गडकरी यांचे पारडे जड व्हायला लागताच खडसे यांनी आता या स्पर्धेत उतरायचे ठरवले आहे. येत्या २८ तारखेला फडणवीस यांचा शपथविधी होईल असे जवळजवळ जाहीरच झाले होते पण आता या निवडीतले नाट्य वाढत आहे.

दुसर्‍या बाजूला शिवसेनेने आता भाजपाशी युती व्हावी म्हणून पडती भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. गंमत म्हणजे ते सुरूवातीला जेवढे ताठ होते आणि ताठपणाच्या बाबतीत अतिरेक करत होते तेवढा अतिरेकी मवाळपणा दाखवायलाही त्यांनी सुरूवात केली आहे. शिवसेनेने साष्टांग नमस्काराचा प्रयोग सुरू केला आहे. उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण याचा अंदाज आला नाही. हे आपण एकवेळ समजून घेऊ. कारण निवडणुकीच्या मैदानात उतरलेला प्रत्येक पक्ष आपल्याला सत्ता मिळणार असे समजतही असतो आणि तसे दावेही करत असतो. त्याच न्यायाने उध्दव ठाकरे यांनीसुध्दा निवडणुकीच्याआधी महाराष्ट्रात शिवसेनेचीच लाट आहे असे मानले असेल तर त्याबद्दल त्यांना आपण माफ करूया. परंतु निवडणुकीनंतर मोठा भाऊ कोण हे सिध्द झाले असतानासुध्दा ते सुरूवातीला त्याच ऐटीत वागत होते. हे वागणे मात्र कोड्यात टाकणारे आणि उध्दव ठाकरे यांच्या कुवतीचे दर्शन घडवणारे होते. म्हणूनच सुरूवातीला त्यांनी भारतीय जनता पार्टीसमोर ताठाने वागायची भूमिका घेतली.

भारतीय जनता पार्टीला बहुमत सिध्द करण्यासाठी आपली गरज लागणारच आहे तेव्हा थोडे ताणून धरू असा अवाजवी विचार त्यांनी केला. पण नंतर त्यांच्या पक्षातच हा ताठरपणा अनावश्यक असल्याचे मत व्यक्त व्हायला लागले आणि भारतीय जनता पार्टीनेही त्यांना किंमत दिली नाही. तेव्हा मात्र उध्दव ठाकरे यांनी जास्तच पडती भूमिका घ्यायला सुरूवात केली. निवडणुकीच्या आधी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी त्यांनी आदित्य ठाकरेंना पुढे केले होते. खरे म्हणजे हा भाजपा नेत्यांचा अपमान करण्याचा प्रकार होता. तो जाणूनबुजून केला गेला होता. परंतु उध्दव ठाकरे यांनी त्याचेही समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे असे म्हणतात मग आम्ही चर्चेसाठी एक तरुण पाठवला तर त्यांना राग का यावा असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला. ते त्या काळामध्ये कोणत्या मनःस्थितीत वागत होते हे काही समजत नाही. यातला त्यांचा युक्तीवाद हा अतीशय उथळ, अविचारीपणाचा आणि आत्मघातकीपणाचाही होता. परंतु त्यांना त्याचे भानच नव्हते. आपल्याला स्पष्ट बहुमत मिळणार आणि भाजपाचे नेते आपल्यामागे सत्तेत वाटा मिळावा म्हणून लाळघोटेपणा करत फिरणार. असे कसलेतरी चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होते की काय असे वाटते. आता मात्र आदित्य ठाकरे कोठे आहेत आणि ते भाजपाशी वाटाघाटी करायला का पुढे येत नाहीत हे काही समजेनासे झाले आहे.

Leave a Comment