कोण आहेत हे सत्यार्थी?

kailash
भारतात बाल हक्कांच्या प्रस्थापनेसाठी कार्य करणार्‍या बचपन बचाव आंदोलनाचे प्रणेते कैलास सत्यार्थी यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. एका भारतीयाला जागतिक पातळीवरचा असा पुरस्कार मिळावा हे भारतासाठी अभिमानाचेच असणार. त्यामुळे भारतीयांचा आनंद स्वाभाविक आहे. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आणि आजपर्यंत किती भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे याची यादीही प्रसिद्ध झाली. परंतु असा आनंदोत्सव साजरा करणार्‍यांपैकी बहुतेकांना कैलास सत्यार्थी कोण हेच माहीत नव्हते. मात्र असतील कोणीतरी, त्यांनी उत्तम काम केले असेल म्हणूनच त्यांना हा पुरस्कार मिळाला असेल, नोबेल पुरस्कारात काय वशिलेबाजी थोडीच चालते असा विचार बर्‍याच भारतीयांनी केला आणि कैलास सत्यार्थी हे कोण आहेत हे माहीत नसून सुद्धा त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला.

विविध सामाजिक कामे करणार्‍या काही कार्यकर्त्यांना मात्र कैलास सत्यार्थी हे नाव ऐकून माहीत होते. त्यांनी चालवलेल्या बचपन बचाओ आंदोलनाचीही माहिती काही लोकांना होती. त्यांना मात्र या पुरस्काराबद्दल आश्‍चर्य वाटले. श्रीमती जया जेटली यांनी तर एक गोष्ट उघडपणेच बोलून दाखवली. कैलास सत्यार्थी यांनी लहान मुलांच्या हक्कांविषयी काही काम केलेले आहे हे निश्‍चित आहे. परंतु ते काम नोबेल पुरस्कार मिळावा एवढे मोठे नाही. असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. भारतात कैलास सत्यार्थी यांच्यापेक्षाही अधिक परिणामकारकपणे हेच काम करणारे किती तरी लोक आहेत. शांता सिन्हा हे नाव या क्षेत्रात सत्यार्थी यांच्यापेक्षाही मोेठे आहे. त्याशिवाय अलीकडच्या काळात वेठबिगार म्हणून कामे करणार्‍या मुलांची त्या कामातून सुटका करण्यासाठी संघर्ष करण्याच्या बाबतीत स्वामी अग्निवेश यांचे नाव आघाडीवर आहे. असे असताना कैलास सत्यार्थी या तुलनेने कमी काम करणार्‍या माणसाला हा पुरस्कार कसा जाहीर झाला याचे या क्षेत्रातल्या अनेकांना आश्‍चर्य वाटले.

शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार महात्मा गांधींसारख्या महापुरुषाला दिला पाहिजे. शिवाय देशांदेशांमध्ये सुरू असलेली युद्धे टळावीत यासाठी प्रयत्न करणार्‍या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शांतीदूतांना, काही बड्या देशांच्या राष्ट्र प्रमुखांना हा पुरस्कार देणे योग्य ठरते. शिवाय सध्या सारे जग दहशतवादाच्या सावटाखाली जगत आहे. या जगाची या सावटातून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणारे काही कार्यकर्ते या पुरस्काराचे मानकरी ठरू शकतात. परंतु अलीकडच्या काही वर्षात अशा कार्यकर्त्यांना सोडून भलत्याच लोकांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जात आहे. जागतिक कीर्तीचे कृषितज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांना एक नव्हे तर दोन वेळा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला गेला. रुढ अर्थाने त्यांनी शांततेसाठी काहीच केलेले नव्हते. त्यांनी वनस्पती शास्त्रात केलेले संशोधन हे अजोड होते ही गोष्ट खरी. परंतु नोबेल पुरस्कार ज्या ज्या विषयात दिला जातो त्या विषयात वनस्पती शास्त्राचा समावेश नाही. मात्र नोबेल पुरस्कार देणार्‍या निवड समितीला बोरलॉग यांचा गौरव करायचाच होता. म्हणून त्यांनी शांततेसाठी या शब्दाचा बादरायण अर्थ काढून बोरलॉग यांना हा पुरस्कार दिला. बोरलॉग यांनी गव्हाचे नवीन वाण शोधून काढले नसते तर मानवतेला उपासमार आणि कुपोषण या संकटांना तोंड द्यावे लागले असते आणि धान्यावरून दंगली झाल्या असत्या. मात्र बोरलॉग यांनी गव्हाच्या आणि तांदळाच्या नव्या जाती शोधून काढल्या आणि भरपूर धान्य उपलब्ध झाले आणि दंगली टळल्या, त्यामुळे बोरलॉग यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जात आहे अशा शब्दात निवड समितीने या पुरस्काराचे समर्थन केले.

या अर्थाने कैलास सत्यार्थी यांना बाल हक्कांसाठी केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. परंतु शांततेसाठीचा हा पुरस्कार आणि बाल हक्कांची चळवळ यांचा प्रत्यक्ष काहीच संबंध नाही. मात्र या दोन गोष्टींचा बादरायण संबंध जोडून सत्यार्थी यांना हा पुरस्कार जाहीर झाला. एक तर हा विषय या पुरस्काराचा नाही आणि असला तरी सत्यार्थी यांचे काम त्या तोडीचे नाही. मग त्यांना हा पुरस्कार मिळाला कसा? याचे उत्तर आहे वशिला. कैलास सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानातल्या मलाला युसूफझाई या १६ वर्षाच्या मुलीला सुद्धा हा पुरस्कार मिळणार आहे. तिला मिळालेला पुरस्कार हा तिने तालिबान्यांच्या विरुद्ध केलेल्या संघर्षामुळे मिळत आहे. तिने मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्याबद्दल तिच्यावर तालीबान संघटनांच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यातून ती बचावली आणि तरीही न घाबरता ती आपले काम करतच आहे. अर्थात तिचा सामना दहशतवाद्यांशी आहे म्हणून तिच्या कामाचा संबंध तसा शांततेशी जोडता तरी येतो. प्रत्यक्षात तिचे काम शांततेसाठी नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी आहे. पण तिला हा पुरस्कार दिला गेला आहे. ती निदान जगाला माहीत तरी होती, पण कैलास सत्यार्थी हे नाव भारतात तर कोणाला माहीत नव्हतेच, पण परदेशात मात्र काही विशिष्ट पुरस्कार देणार्‍या समित्यांपर्यंत हे नाव पोचविण्यात आलेले होते.

पुरस्कार देणार्‍यांची या पुरस्कारामागची भावना किती विपरित आहे हे पुरस्काराच्या घोषणेवरून लक्षात येते. ही घोषणा करताना एक हिंदू आणि एक मुस्लीम यांना हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. यापूर्वीही अनेकांना हे पुरस्कार दिले गेले आहेत. परंतु त्यातल्या कोणाच्याही धर्माचा उल्लेख त्यांच्या घोषणेत करण्यात आला नव्हता. सत्यार्थी आणि मलाला यांच्याच बाबतीत हा उल्लेख का करण्यात आला, हा प्रश्‍न कोणाच्या मनात आला नाही. पण या उल्लेखातून निवड समितीची भावना लक्षात येते. खरे म्हणजे या दोघांनी काही धार्मिक काम केलेले नव्हते आणि केलेल्या धार्मिक कामाबद्दल हा पुरस्कार नव्हता. उलट मदर तेरेसा यांचे काम धर्मासाठी होते. धर्मासाठी म्हणजे धर्माच्या प्रसारासाठी होते. नेमकेपणाने सांगायचे तर हिंदू धर्मियातील उपेक्षित घटकांमध्ये बाटवाबाटवी करून त्यांना ख्रिश्‍चन करण्यासाठीचे काम होते. त्यांनी लहान मुलांचा सांभाळ केला हे त्यांच्या कामाचे वरवरचे स्वरूप होते. परंतु त्यांचा अंतस्थ हेतू धर्मांतर हाच होता. त्यांनी या हेतूनेच काम केले असतानाही त्यांना पुरस्कार देताना त्यांच्या धर्माचा उल्लेख झाला नाही. उलट अनाथ-निराधार मुलांसाठी केलेल्या कामाबद्दल म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला.

मलाला आणि सत्यार्थी यांचे काम साधारण तसेच असतानाही आणि मदर तेरेसा प्रमाणे त्यांच्या कामाचा धर्माशी प्रत्यक्ष संबंध नसतानाही त्यांच्या मात्र धर्मांचा उल्लेख केला गेला. यातून हिंदू धर्माविषयीची हिणकस भावना प्रकट होते. मलाला युसूफझाई मुलींच्या शिक्षणाबाबत आग्रही आहे, परंतु तिला विरोध होत आहे. कारण इस्लामला मुलींचे शिक्षण मान्य नाही. तालीबान अतिरेकी इस्लामचे जे स्वरूप आदर्श मानतात त्यात तरी मुलींचे शिक्षण बसत नाही. इस्लामच्या कोणत्या का स्वरूपात होईना पण मुलींच्या शिक्षणाला विरोध आहे त्यामुळे मलालाचे काम एक प्रकारे धर्मसुधारणेचे आणि इस्लाममधील एक विसंगती काढण्याचे आहे. त्यामुळे तिचा मुस्लीम म्हणून उल्लेख झाला तो वेगळ्या संदर्भात का होईना पण काही प्रमाणात का होईना पण समर्थनीय आहे. पण सत्यार्थी त्यांचे बाल हक्कांचे आंदोलन आणि हिंदू धर्म यांचा कसलाही संबंध नाही. बाल मजुरी हा काही हिंदू धर्मातला दोष नाही. परंतु त्यांना पुरस्कार देताना हिंदू असा उल्लेख करून नोबेल समितीने बाल मजुरी हा हिंदू धर्मातला दोष आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांना हे सारे अनुमान तर्कट वाटेल किंवा कोणत्याही गोष्टीचे विश्‍लेषण करण्याची ही अतिशयोक्ती सुद्धा वाटेल. परंतु कैलास सत्यार्थी यांच्या आजवरच्या कामांवर नजर टाकल्यास या सार्‍या गोष्टी पटायला लागतात. कैलास सत्यार्थी यांच्यासारखे साम्यवादी आणि मदर तेरेसा यांच्यासारखे ख्रिश्‍चन मिशनरी भारतीय समाजातली काळी बाजू जगासमोर आणण्याचा सतत प्रयत्न करत असतात. भारत देश जगातली मोठी आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत असताना तिच्या या वाटचालीत बिब्बा घालण्याच्या हेतूने जगातल्या काही संस्था आणि संघटना केवळ मत्सरापोटी भारताची ही काळी बाजू मांडणार्‍यांना डोक्यावर घेत असतात.

भारतातल्या काही दलीत लेखकांना भारतात पुरस्कार कमी मिळतात, परंतु रॉकफेलर किंवा फोर्ड फौंडेशन अशा संस्था मात्र त्यांना भरभरून मदत करतात. त्यांना दलितांच्या दु:खाविषयी काहीही देणेघेणे नसते, पण भारतीय जीवनातील वैगुण्य जगासमोर येऊन जगातली भारताची आर्थिक उन्नती बाधित व्हावी यासाठी या संघटना अशा लेखकांना मदत करतात. या संस्था साहित्य संस्था नाहीत, त्या परदेशातल्या भांडवलदारांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्या या पुरस्कारांमागे आर्थिकच हेतू असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कैलास सत्यार्थी हे असेच उपद्व्यापी गृहस्थ आहेत. अशा उपद्व्यापी लोकांना काही यूरोपीय देशातून हमखास पुरस्कार मिळत असतात. सत्यार्थी यांना असेच परदेशातले पुरस्कार मिळाले आहेत. भारताची प्रतिष्ठा कमी करण्यात ज्यांना रस आहे त्यांनीच हे पुरस्कार दिलेले आहेत. १९९४ पासून असे एक डझन पुरस्कार सत्यार्थी यांना मिळालेले आहेत. त्यातले पाच पुरस्कार अमेरिकेतले आहेत, शिवाय जर्मनी, इटली, स्पेन, नेदरलँडस् या देशातले काही पुरस्कार आहेत. आशिया खंडामध्ये निरलसपणे सामाजिक काम करणार्‍यांना रेमन मॅगॅसेसे पुरस्कार दिला जातो. तो कधी सत्यार्थी यांना मिळालेला नाही. यूरोप आणि अमेरिकेतल्याच संघटनांनी त्यांना सातत्याने पुरस्कार दिलेले आहेत. सत्यार्थी यांचे काम भारतातला कोणता पुरस्कार मिळावा या लायकीचे नाही, पण त्यांना यूरोपातले हे पुरस्कार का मिळतात? सत्यार्थी यांचे नाव बहुसंख्य भारतीयांना माहीत सुद्धा नसताना हे पुरस्कार का मिळतात? यामागचे इंगित समजून घेतले पाहिजे. कैलास सत्यार्थी यांची मुलगी अमेरिकेत शिक्षण घेते आणि ती ज्या संस्थेत शिक्षण घेत आहे त्या संस्थेशी हिलरी क्लिंटन यांचा निकट संबंध आहे. हिलरी क्लिंटन २००१ सालपासून सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस करत आहेत या गोष्टी भारतीयांना माहीत नसतात.

नोबेल पुरस्कार हा सुद्धा गुणवत्तेचा विचार न करता दिला जाऊ शकतो हे या प्रकरणातून तर दिसतेच, पण यापूर्वीही तसे ते दिसून आले आहे. मलाला आणि सत्यार्थी यांच्या सामाजिक कामाचे अवमूल्यन करण्याचा हेतू या लिखाणामागे नाही. परंतु त्यांची ती अनमोल कामे शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळण्या इतक्या उंचीची नाहीत हे सत्य सांगितलेच पाहिजे. ते सत्य तरी का सांगायचे? या पुरस्कारामागे अमेरिके सारख्या वसाहतवादी आणि विस्तारवादी देशाचे राजकीय हितसंबंध गुंतायला लागले आहेत. त्यातून भारताची बदनामी केली जात आहे, हिंदू धर्माला कमीपणा आणला जात आहे म्हणून हे सत्य सांगणे गरजेचे आहे.

(मासिक विवेक विचार वरून साभार)

Leave a Comment