विदर्भातील नेत्यांना मिळणार मुख्यमंत्रीपद!

trio
नागपूर – भाजप महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने मुख्यमंत्री भाजपचाच राहील, हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या यशात सर्वाधिक वाटा विदर्भाचा असल्याने मुख्यमंत्रिपदावर विदर्भाचा प्रबळ दावा असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या नागपुरातील दोन्ही नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. नागपूरकरांना पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यामुळे भाजपच्या निर्णयाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. गडकरी युतीच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाममंत्री होते. अवघ्या चार वर्षांत महाराष्ट्रात रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे त्यांनी विणले. त्यांच्या कामाचा झपाटा बघून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्या कामांची प्रशंसा केली होती. तसेच केंद्र शासनानेसुद्धा दखल घेतली होती. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या नियोजनाची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांच्यावर सोपवली होती. सर्वच पक्षांत त्यांचे चाहते आहेत. अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांचा अनुभव आणि कामाची हातोटी लक्षात घेता गडकरी हेच मुख्यमंत्री होतील, असे त्यांचे समर्थक दाव्याने सांगत आहेत.