आत्मचिंतन की आत्मवंना

vidhansabha
निवडणुकीत पराभव होओ की विजय होओ पण त्या मागची कारणे शोधली पाहिजेत आणि त्या कारणांच्या पार्श्‍वभूमीवर आपण आपली वाटचाल नक्की केली पाहिजे. असाच नेता समाजाला मार्गदर्शन करू शकतो. पण काही नेते असा विचारच करीत नाहीत. नारायण राणे कोकणातल्या त्यांच्या कुडाळ मतदारसंघात पराभूत झाले. त्यामागे त्यांची त्या भागातली दादागिरी होती पण तिचा विचार न करता त्यांनी जनतेलाच दोष दिला. आपण, ज्या जनतेसाठी २५ वर्षे काम केले त्या जनतेनेच आपल्याला दगा दिला असा त्यांनी जनतेवरच दोषारोप केला आहे. आता याला आत्मचिंतन म्हणावे की आत्मवंचना म्हणावे ? उद्धव ठाकरे यांनीही असेच चिंतन करायला सुरूवात केली आहे. ते चिंतन म्हणजे आत्मपरीक्षण नसून स्वत:ची फसवणूक आहे. त्यांनी या आत्मचिंतनात स्वत:चे काही चुकले आहे का याचा तपास करायलाच नकार दिला आहे. नरेन्द्र मोदी यांनी आपल्या विरोधात सारी केन्द्रातली ताकद मैदानात उतरवली तरीही आपण ६१ जागा मिळवल्या असा त्यांचा दावा आहे.

खरे तर ठाकरे जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा त्यांच्या विरोधातला पक्ष केन्द्रात सत्तेवर असेल तर तो पक्ष आपली सारी ताकद पणाला लावूनच लढणार आहे. उद्धव ठाकरे यांना आपली खरी ताकद दाखवता यावी म्हणून आपण आपली ताकद जरा बाजूला ठेवू या असे कोणताच पक्ष म्हणणार नाही. तेव्हा त्यांना आपल्या पक्षाला जे काही चांगले दिवस दाखवायचे आहेत ते विरोधकांच्या सार्‍या ताकदीच्या विरोधात लढूनच दाखवावे लागणार आहेत. पण उद्धव ठाकरे अशा पद्धतीने आत्मपरीक्षण करीत असतील तर ते आत्मपरीक्षण फसवे ठरेल. किंबहुना ठरतच आहे. भारतातले राजकीय नेते निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने दिलेला कौल शिरोधार्य मानतात आणि जनतेने आपल्याला असाच कौल का दिला याचा तपशीलात विचार करायला लागतात. पण उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारच्या आत्मचिंतनाची सवय नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना १८ जागा मिळाल्या आणि विधानसभा निवडणुकीत युती तुटून सुद्धा ६१ जागा मिळाल्या. यावरून आपण पक्षाचे योग्य पद्धतीने नेतृत्व करत आहोत असा भास त्यांना झाला आहे. पण हा त्यांचा विजय नसून मोदी लाटेचा तसेच राज्यातल्या विशिष्ट वातावरणाचा विजय आहे हे त्यांना कळेना. कारण त्यांनी विश्‍लेषणच केलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी सामनामधून व्यक्त केलेली प्रतिक्रिया अतार्किक आणि आत्मकेंद्रित वृत्तीतून आली आहे.

आपल्या अपयशामागे आपले धोरण, आपली वक्तव्ये आणि आपले संवाद कौशल्य हे कोठे आडवे आलेले आहे काय याचा शोध त्यांनी घ्यायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांनी आपल्या अपयशाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेलाच दोष दिला आहे. आपण दिल्लीपती पुढे झुकणार नाही असा महाराष्ट्राचा स्वाभीमान आपण जागा केला, पण जनतेला या स्वाभीमानाची पत्रास का वाटली नाही, असा त्यांनी जनतेलाच सवाल केला आहे. बदललेल्या काळामध्ये आपले असले युक्तीवाद लोकांनी चक्क नाकारले आहेत, ते का नाकारले याचा त्यांनी विचार करायला हवा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान केंद्र सरकार करत आहे हा धोका आपण लोकांना समजावून सांगितला, पण लोकांनी तो समजून घेतला नाही याचे वैषम्य त्यांना वाटत आहे आणि ती भावना त्यांनी सामनातल्या लेखातून व्यक्त केली आहे. खरे म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणी प्रयत्नच केलेला नाही. उद्धव ठाकरे तसे म्हणतात म्हणून लोक त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. कारण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचेेच असेल तर तशी काही पावले तरी पडायला पाहिजेत. पण तशी काही पडली नाहीत.

रिझर्व्ह बँकेतले एक किरकोळ कार्यालय मुंबईतून काढून दिल्लीत नेले असा एक ‘ठोस’ पुरावा ठाकरे आणि काही कॉंग्रेसचे नेते सुद्धा द्यायला लागले होते. परंतु एक कार्यालय दिल्लीत नेणे ही मुंबईला केंद्रशासित करण्याची तयारी असू शकते यावर कोणीच विश्‍वास ठेवणार नाही. ठाकरे दिल्लीपती म्हणून कोणाचा उल्लेख करत होते हे काही शेवटपर्यंत कळले नाही कारण त्यांच्या डोळयासमोर दिल्लीपती म्हणजे कोण याची काहीच कल्पना नसावी. केवळ बाळासाहेब जे वाक्य उच्चारत असत तेच वाक्य आपण उच्चारावे अशी काहीतरी त्यांची नक्कल करण्याची भावना त्यांच्या मनात असावी असे दिसते. महाराष्ट्रात ते विनोद तावडे, पंकजा मुुंडे, एकनाथ खडसे, देवेन्द्र फडणवीस यांच्या विरोधात लढत होते. पण, यातले कोणीही दिल्लीपती या संज्ञेस पात्र नाही. यातला प्रत्येकजण मराठीच आहे. उद्धव ठाकरे जेवढे मराठी आहेत तेवढेच हेही नेते मराठी आहेत मग ठाकरे झुकणार नाहीत म्हणजे कोणाच्या पुढे झुकणार नाहीत हे काही कळले नाही आणि त्यांनी दिल्लीपती म्हणजे कोण हे जाहीर केले नाही. केन्द्र सरकार म्हणजे दिल्लीपती असे मानले तर शिवसेना त्या दिल्लीस्थित सरकारचाच एक भाग आहे. त्यांचा एक मंत्री दिल्लीपतीच्या दरबारात आहे. याचा विसर त्यांना पडतो पण जनतेला पडत नाही हा काय जनतेचा दोष आहे का?

Leave a Comment