महाराष्ट्रात भाजपा पर्व सुरू

bjp
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने २८८ पैकी १२० जागा मिळवल्या आहेत. त्याला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही पण जे कोणते संमिश्र सरकार येणार आहे ते भाजपाच्या नेतृत्वाखाली येईल आणि त्याचा मुख्यमंत्री भाजपाचा असेल. या अर्थाने महाराष्ट्रात भाजपाचे राज्य सुरू होणार आहे. भाजपाने आपली ताकद सिद्ध केली आहे आणि शिवसेनेसह अन्य तीन पक्षांनाही आपण किती पाण्यात आहोत याची कल्पना आली आहे. कॉंग्रेसला लोकसभेत जशा ४४ जागा मिळाल्या आहेत तशाच विधानसभेतही ४४ जागा मिळाल्या आहेत. या पक्षाला हरियाणातही पराभवाचा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या एक महिना आधी अजित पवार यांनी चारही पक्षांनी एकदाची आपापली शक्ती आजमावून पहावीच आणि त्यासाठी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी सूचना केली होती. त्यावेळी सर्वांना ती गंमत वाटली. पण खरेच चारही पक्ष स्वबळावर लढले. त्या अर्थाने राज्यातल्या चारही पक्षांना आपापली खरी ताकद कळली. भारतीय जनता पार्टीला १२० जागा मिळाल्या. शिवसेना आणि भाजपा यांच्यात मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण याचाही निकाल लागला. भारतीय जनता पार्टीने आपण मोठा भाऊ आहोत हे दाखवून दिले. भाजपाला शिवसेनेच्या नेमक्या दुप्पट जागा मिळाल्या. जागांच्या वाटपात भाजपाला जेवढ्या जागा द्यायलाही शिवसेना तयार नव्हती तेवढ्या जागा भाजपाने स्वबळावर जिंकून दाखवल्या आहेत. आता तरी शिवसेना नेते ही वस्तुस्थिती मानतील आणि युतीमध्ये आपण भाजपावर उपकार करतो या आविर्भावातून बाहेर पडतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

अर्थात तसे त्यांनी बाहेर पडणे त्यांच्या स्वत:च्याच कल्याणासाठी आवश्यक आहे. भाजपाला शिवसेनेची गरज आहेच पण शिवसेनेलाही भाजपाशी पुन्हा हातमिळवणी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवसेनेला वस्तुस्थिती ओळखावी लागेल. राज्यातले गेल्या पंधरा वर्षे सत्तेवर असलेले सरकार हाकलून लावणे हा या निवडणुकीतला मुख्य विषय होता. कारण ते सरकार जनतेला नको होते. त्यासाठी ही युती टिकावी अशी जनतेची भावना होती. युती तुटून शिवसेना आणि भाजपा यांचे काहीही नुकसान झालेले असो किंवा फायदा झालेला असो पण या फुटीचा फायदा घेऊन पुन्हा कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर आले नाही हे बरे झाले. आघाडीचे सरकार गेले याचा आनंद जनतेला आहे. भाजपाला स्वबळावर सरकार स्थापन करण्या एवढया जागा मिळाल्या नाहीत आणि त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

भाजपाला पूर्ण बहुमतासाठी कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात कितीही मैत्रीच्या गोष्टी होत असल्या तरीही आता त्यांना आता नाइलाज म्हणून का होईना पण युतीचे भागीदार म्हणून काम करावे लागणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच या दृष्टीने राजकारण सुरूही झाले आहे. शिवसेनेने भाजपाविषयी आपल्या मनात अनादर नाही असे म्हणून युतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे. पण भाजपाला शिवसेनेशी युती करताना अनेक अडचणी येणार आहेत. शिवसेना सहजासहजी दुय्यम भूमिका घ्यायला तयार होणार नाही. प्रत्येक पावलाला या भावनेतून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची योग्य जाणीव असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक चतुर चाल टाकली आहे. आपला पक्ष भाजपाला बाहेरून पाठींबा देईल असे आपणहून जाहीर केले आहे. भाजपाला जनतेने सर्वात अधिक जागा देऊन सरकार बनवण्याचा आदेश दिला आहे पण राज्य करण्याचा स्पष्ट आदेश दिलेला नाही. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपाच्या मागे उभे राहून त्यांना मदत करील. असे झाले तरच राज्याला स्थैर्य लाभेल आणि राज्याची प्रगती होईल असे आपले धोरण राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. जनतेने भाजपाला स्पष्ट आदेश दिला आहे पण तो पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा देण्याची काही गरज नाही कारण याच जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधी बाकावर बसण्याचा स्पष्ट आदेेश दिलेला आहे. पण जनादेशाचा आपल्या सोयीने अर्थ काढून कोणत्याही पद्धतीने सत्तेच्या परीघात जाण्याचा हा राष्ट्रवादी प्रयत्न आहे.

अर्थात राष्ट्रवादीने तसे जाहीर केले असल्याचा फायदा भाजपाला होत आहे. शिवसेनेने भाजपाशी युती करताना फारच अटी घालायला सुरूवात केली आणि भाजपाशी अडवणुकीचे धोरण अवलंबायला सुरूवात केली तर आता भाजपाला शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देता येणार आहे. आता भाजपाचे नेते राष्ट्रवादीची भीती दाखवून शिवसेनेला नमवू शकतात. राष्ट्रवादीच्या या पवित्र्याने शिवसेनेची सौदा शक्ती कमी होणार आहे आणि तो पवित्रा भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. पण प्रत्यक्षात राष्ट्रवादीचा हा पाठींबा घेणे भाजपासाठी घातक ठरणार आहे. तेव्हा भाजपाने या ऑफरकडे दुर्लक्ष केलेलेच चांगले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष संधीसाधू आहे हा पक्ष नेहमी सत्तेच्या वळचणीला राहण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी वाटेल त्याच्याशी घरोबा करतात आणि नंतर त्या घरोब्याला काही तरी नाव देतात. आता भाजपाशी युती करायला ते काय नांव देतील?

Leave a Comment