भाजपाचे वाढते प्रभाव क्षेत्र

amit-shah
महाराष्ट्र आणि हरियाना या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून भाजपाने आपल्या प्रभाव क्षेत्रात दोन राज्यांची भर टाकली आहे. एखादा पक्ष किती बळकट आणि समर्थ आहे हे केवळ केंद्रात सत्ता आहे की नाही एवढ्यावरच ठरत नाही, तर देशातल्या किती राज्यांमध्ये या पक्षाकडे सत्ता आहे यालाही महत्व असते. आता भारतीय जनता पार्टीने राज्यातले आपले प्रभाव क्षेत्र वाढवायला सुरुवात केली आहे. हरियाना आणि महाराष्ट्र या दोन राज्यातली सत्ता मिळत असतानाच त्यांनी जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. हरियानातला भाजपाचा विजय अधिक देदिप्यमान आहे. सत्तेच्या राजकारणात एखाद्या राजकीय पक्षाने कितीही चांगली कामगिरी केली असली तरी जोपर्यंत त्याला विजय मिळत नाही आणि सत्ता हस्तगत होत नाही तोपर्यंत त्याला कोणी यशस्वी मानत नाही. हरियाना आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजपाला तसे यश मिळालेले आहे. परंतु हरियानात मिळालेले यश डोळे दिपवणारे आहेत. कारण हरियानामध्ये भारतीय जनता पार्टी हा दखलपात्र पक्ष नव्हता. यापूर्वी हरियानात भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेवर आलेली नाही.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत तर ९० सदस्यांच्या या विधानसभेत भाजपाकडे केवळ ४ जागा होत्या. त्या आता ४७ पर्यंत वाढल्या आहेत आणि एकट्या भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता गेलेली आहे. महाराष्ट्रात असे यश मिळू शकले नाही. खरे म्हणजे हरियानापुढे महाराष्ट्रातले भापजाचे यश अगदीच फिके वाटते. कारण स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. हरियानात मात्र भाजपाच्या हाती कधीच सत्ता नव्हती, तरीही स्पष्ट बहुमत प्राप्त करता आले आहे. या दोन राज्यांच्या रूपाने भाजपाच्या खात्यातील राज्यांची संख्या वाढली आहे. आता गुजरात,आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा इत्यादी राज्यात भाजपाच्या हाती सत्ता आहे. पंजाबमध्ये भाजपा आणि अकाली दलाचे संमिश्र सरकार आहे. यापूर्वी ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, कर्नाटक एवढ्या मोठ्या भू प्रदेशावर कधी ना कधी भाजपाची स्वतंत्र किंवा युतीची सरकारे येऊन गेलेली आहेत. त्यामुळे भाजपाच्या प्रभाव क्षेत्रात अलीकडच्या काळात वाढ होत चालल्याचे दिसत आहे. १९८० सालपर्यंत भारतीय जनता पार्टी ही राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये अस्तित्व असलेला पक्ष समजला जात होता. परंतु आणीबाणीनंतरच्या राजकारणात आणि आघाड्यांच्या पर्वामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत गेली.

आता सध्या तमिळनाडू, केरळ ही दक्षिणेतली दोन राज्ये, जम्मू-काश्मीर, प. बंगाल ही राज्ये वगळता बहुतेक राज्यांत भाजपाने पाय रोवले आहे. आता सध्या भाजपाच्या हातात आठ राज्ये आहेत. कॉंग्रेसच्या हातातली राज्येही संख्येने खूप आहेत, परंतु त्या राज्यांमध्ये मिझोराम, अरुणाचल अशा छोट्या राज्यांचाच समावेश आहे. त्या अर्थाने विचार केला तर आज भारतीय जनता पार्टी कॉंग्रेसपेक्षा किती तरी पुढे गेलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची कॉंग्रेसची वाटचाल आणि १९८० साली झालेल्या स्थापनेपासूनची भाजपाची वाटचाल या दोघांची तुलना केली तर भाजपाचा वाढीचा वेग कॉंग्रेसपेक्षा मोठा असल्याचे दिसून येते. हरियाना हे राज्य नव्यानेच भाजपाच्या प्रभावक्षेत्रात आलेले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियानात अतीशय आक्रमक प्रचार केलेला होता. हरियानातील मुख्य तीन राजकीय पक्ष पूर्णपणे घराणेशाहीवर अवलंबून आहेत. एक राजकीय पक्ष भजनलाल यांच्या मुलाकडून चालवला जातो तर बन्सीलाल आणि ओमप्रकाश चौताला या दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुले आपल्या बापजाद्यांचे पक्ष चालवतात.

मावळते मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनीही आपल्या वारसांना पुढे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अशा प्रकारे हरियानामध्ये सारे राजकारणच प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या हातात गेलेले आहे. गांभीर्याने राजकारण करून विकासाची प्रक्रिया गतीमान करण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यातला कोणताच राजकीय पक्ष करत नाही ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे लोकांनी मोदींच्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार केला. भजनलाल आणि बन्सीलाल यांच्या मुलांना आपापल्या मतदारसंघातही विजय मिळवता आला नाही. इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्या कुटुंबातील तिघे निवडून आले, परंतु पक्षाला चांगले यश मिळवता आले नाही. मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांना बाहेरचे तर आव्हान होतेच, पण त्यांना आतून सुद्धा मोठा विरोध होता. त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांनी हुडा यांच्यावर नाराज होऊन आधीच पक्ष सोडला होता. उरलेल्या हुडा विरोधकांनी पक्षात राहून त्यांना घातपात केला. त्यामुळे घरातल्याच विरोधाने घायाळ झालेल्या हुडा यांना पराभव पत्करावा लागला. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या व्यवसायाला गती यावी आणि त्यांना बकळ कमाई करता यावी यासाठी भूपिंदरसिंग हुडा यांनी आपल्या सत्तेचा वापर केला आणि त्यांच्या या स्वार्थी वृत्तीचा पर्दाफाश करणार्‍या अधिकार्‍यांचा छळ केला. परिणामी त्यांची प्रतिमा मलीन झाली आणि त्यांना निवडणूक गमवावी लागली. कॉंग्रेस पक्षाच्या हातातून दोन राज्ये गेली. या दोन्ही राज्यांमध्ये सत्ता टिकवता येणे मुश्कील होतेच, परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यापेक्षा सरस कामगिरी करता आली असती. मात्र इच्छाशक्ती गमावलेल्या नेत्यांनी केंद्रातून फारशी रसद पाठवली नाही, केंद्रीय नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांवर जबाबदारी टाकली. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.

Leave a Comment